‘क्रिसालिस’ हा अनुजा व्हर्गीस यांचा कथासंग्रह भारतातही उपलब्ध आहे आणि या संग्रहातल्या १५ कथांचा संबंध कॅनडाप्रमाणेच भारताशीही आहे. या पुस्तकासाठी अनुजा व्हर्गीस यांना कॅनडाचा अतिप्रतिष्ठित आणि २५ हजार कॅनेडियन डॉलर (किमान १५ लाख रुपये) रकमेचा ‘गव्हर्नर जनरल लिटररी अ‍ॅवॉर्ड’ परवाच्या बुधवारी मिळाला. अटलांटिकच्या दुसऱ्या टोकावर, ब्रिटिश अकॅडमीनं ३१ ऑक्टोबर रोजी नंदिनी दास यांच्या ‘कोर्टिग इंडिया’ या पुस्तकाला जागतिक सांस्कृतिक सलोखा पुरस्कार (अ‍ॅवॉर्ड फॉर ग्लोबल कल्चरल अंडरस्टॅण्डिंग) जाहीर केला, त्याची रक्कम २५ हजार ब्रिटिश पौंड (सुमारे २५ लाख ४५ हजार रुपये) आहे. ‘कोर्टिग इंडिया : इंग्लंड, मुघल इंडिया अ‍ॅण्ड द ओरिजिन्स ऑफ एम्पायर’ हे पुस्तक भारतात उपलब्ध आहेच आणि गेल्या सहा महिन्यांत त्याचं चांगलं स्वागत झालं आहे.

‘कोर्टिग इंडिया’मध्ये थॉमस रो याची कहाणी आहे.. हा थॉमस रो म्हणजे ब्रिटनचे राजे पहिले जेम्स यांचा दूत म्हणून मुघल दरबारात आलेला आणि चार वर्ष भारतात राहिलेला पहिला इंग्रज. सुरत बंदरात १८ सप्टेंबर १६१५ रोजी तो आला आणि मजल-दरमजल करत १६१६ मध्ये जहांगीराच्या दरबारात पोहोचला. ‘ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी’ला सुरतमध्ये वखार स्थापण्यासाठी जागा हवी होती. त्यासाठी राजे जेम्स यांच्याआधी, राणी पहिल्या एलिझाबेथ यांचा दूत म्हणून १६०८ मध्ये विल्यम हॉकिन्स याने अपयशी प्रयत्न केला होता. या हॉकिन्सला आल्या पावली परत जावे लागून, सुरतेत पोर्तुगीजांनी पाय रोवल्यानंतर थॉमस रो भारतात आला, त्यामुळे त्याच्यापुढले आव्हान मोठे होते. पण भारताकडे उघडय़ा डोळय़ांनी पाहण्याची तयारी, हे रो यांचे मोठे भांडवल ठरले आणि त्या बळावर त्याने ब्रिटिश व्यापारकंपनीला तर प्रवेश मिळवून दिलाच, पण या थॉमस रोच्या पायपिटीवर आणि त्याने जमवलेल्या साधनांवर भिस्त ठेवून भारताचा नवा, अद्ययावत नकाशा त्या काळच्या ब्रिटिशांना तयार करता आला. ‘द व्हाइट मुघल्स’ हे विल्यम डालम्पल्री यांचे पुस्तक गेले दशकभर गाजते आहे, त्याच्याही आधीचा कालखंड ‘कोर्टिग इंडिया’मध्ये येतो. वास्तविक, ‘सीबीएसई’च्या ११ वी १२ वी इयत्तांच्या मुघल इतिहासाच्या पुस्तकांतही थॉमस रो आहे आणि प्रशासकीय सेवा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांनाही हे नाव माहीत असते, पण त्यावर कादंबरीमय इतिहास लिहिण्याचे काम नंदिनी दास यांनी केले!

Meet who is MBBS Dr Pinki Haryana
Who is Pinki Haryan : इच्छा तिथे मार्ग! भिक्षा मागणारी मुलगी बनली डॉक्टर, झोपडपट्टीत राहिलेल्या पिंकीची यशोगाथा तुम्हालाही देईल प्रेरणा!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
amit kumar dalit student iit
सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक आदेशानं दलित विद्यार्थ्यासाठी ‘IIT’चे दार खुले; नेमकं प्रकरण काय? कोण आहे अतुल कुमार?
mixers juicers and tabs distribution to bandra women
‘खनिज क्षेत्र’ निधीतून मिक्सर, टॅबचे वाटप; खाणकाम उद्योगाने बाधित झालेल्यांचा निधी इतरत्र वळवण्यास विरोध
IIT Mumbai, JEE toppers, IIT Mumbai latest news,
जेईईत अव्वल गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची आयआयटी मुंबईला पसंती
dr Ajit Ranade
डॉ. अजित रानडे यांची नियुक्ती रद्द केल्याने बुद्धिवंतांमध्ये नाराजी
cbi arrests rg kar ex principal and psi
कोलकाता बलात्कार प्रकरणी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यासह पोलीस निरीक्षकाला अटक; पुराव्याशी छेडछाड केल्याचा आरोप
A 17 year old student committed suicide by hanging herself in the hostel in Chandrapur
“आई-बाबा सॉरी, मला अभ्यासाचे टेन्शन…” विद्यार्थिनीच्या आत्महत्येने चंद्रपुरात खळबळ

हेही वाचा >>> ‘टाटा लिटरेचर लाइव्ह’ पुरस्कार प्रदान

अनुजा व्हर्गीस यांच्या ‘क्रिसालिस’ या कथासंग्रहात १५ कथा आहेत. या सर्व कथा, ‘नेहमीचे’ मानले जाणाऱ्या लैंगिक वर्तनापेक्षा निराळे वर्तन असणाऱ्यांची सुखदु:खे मांडतात. पण त्या प्रत्येक कथेची धाटणी निरनिराळी आहे. काही कथा वास्तववादी आहेत, तर अन्य कथांमध्ये अतिवास्तवाचा, जादूई वास्तवाचा वापर लेखिकेने केला आहे. उदाहरणार्थ ‘द वेतालाज साँग’ ही दोन मैत्रिणींची कथा. दोघींनाही हेमा मालिनी आवडत असते, दोघी एकत्रच शिकतात, पुढे होस्टेलवर दोघींचे ‘संबंध’ दृढावतात आणि यापैकी जी मैत्रीण चारचौघांदेखत दुसरीचे चुंबन घेण्यात पुढाकार घेते, तिच्या घरचे तातडीने तिचे लग्न लावून तिला नवऱ्याघरी- म्हणजे कॅनडात- पाठवतात. ही गोष्ट सांगते आहे, ती भारतात उरलेली.. ती म्हणते, मी आता वेताळ बनून फिरते आहे, येणाऱ्या-जाणाऱ्यांपैकी काहींना मी हेरते, त्यांना भुलवते आणि त्यांचे रक्त शोषते! किंवा मैत्रिणीने पाठ फिरवलेल्या एका मुलीला एकसारखे एक दु:स्वप्न पडू लागते, त्याचा अर्थ लावून ती त्यावर मात करते, अशी कथा.. समाजानं, कुटुंबीयांनी अपयशी ठरवल्यानंतरही जिद्द न सोडणाऱ्या मुलीची कथा..  अशा कथा या संग्रहात आहेत. अनुजा व्हर्गीस या कॅनडातच जन्मल्या, तिथेच वाढल्या. विवाह, संसार, दोन मुले यांत रमणाऱ्या अनुजा यांची ओळख ‘शी/ हर’ अशीच असली तरी त्यांनी परदु:ख जाणून या कथा लिहिल्या आहेत. प्रत्येक कथेत एक तरी पात्र भारतीय आहे. ही भारतीय पात्रे ‘भारतीय संस्कारांतल्या भावना’ व्यक्त करणारी आहेत (नसतील कशी?!) हे अधिक महत्त्वाचे.

नंदिनी दास या मात्र कोलकात्यात शिकल्या. इतिहासाच्या अभ्यासासाठी प्रख्यात असलेल्या जादवपूर विद्यापीठातून शिष्यवृत्तीवर ब्रिटनमध्ये गेल्या आणि तिथल्याच झाल्या. थोडक्यात, त्या नावापुरत्याच भारतीय! पण या दोघींनी केवळ भारताशी संबंध राखणारे लिखाण केले असे नव्हे तर भारताचा जगाशी संबंध दृढ करण्यासाठी आणखी एकेक धागा जोडण्याचा प्रयत्न या दोघींनी केला आहे. त्यांना त्यांच्या-त्यांच्या देशांतील सरकारी पैशातून मिळालेले पुरस्कार, ही भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’लादेखील एक पोचपावती आहे!