भारतीय राष्ट्रवादाचा विकास व्हायचा असेल तर हिंदू समाज भेदांपलीकडे जाऊन एकात्म, एकरस झाला पाहिजे..

रवींद्र माधव साठे

lokmanas
लोकमानस: वारसा कर हा वैचारिक संघर्ष
Ambedkarist activists active in support of Mavia Discuss the danger of changing the constitution
‘मविआ’च्या समर्थनार्थ आंबेडकरवादी कार्यकर्ते सक्रिय; राज्यघटना बदलली जाण्याच्या धोक्याची चर्चा
prakash ambedkar caa nrc against hindus
“हिंदुंना भाजपच फसवतेय”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “सीएए आणि एनआरसी कायदा मुस्लिमांच्या नव्हे…”
Mahavikas aghadi
“मविआला मुस्लीम मतं पाहिजेत, पण…”, प्रकाश आंबेडकरांचा आरोप; मतदारयाद्यांचा उल्लेख करत म्हणाले, “भाजपाप्रमाणेच…!”

हिंदूत्व ही भारतातील प्रत्येक हिंदूची वारसा हक्काने असलेली सांस्कृतिक मालमत्ता आहे. येथे हिंदू हा शब्द हिंदू उपासना पद्धती या मर्यादित अर्थाने लिहिलेला नाही. हा राष्ट्रवाचक शब्द आहे आणि त्यात वैदिक, अवैदिक, जैन, बौद्ध, शीख इत्यादी सर्व धर्ममते व हिंदू समाजातील सर्व जाती-उपजाती येतात. ‘हिंदू’ हा या सर्वाचा शब्द आहे. हिंदूत्व ही काही विशिष्ट जातींची मालमत्ता नाही. हिंदूत्व म्हणजे जानवे, शेंडी, धोतर, पूजा, व्रतवैकल्ये, मंदिर, घंटा इ. नाही. हिंदूत्वात अधिकार सांगणे, काही मागणे हा प्रत्येक हिंदूचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यापासून त्याला कोणीही वंचित ठेवू शकत नाही. हिंदूत्वाच्या नावाने शब्दप्रामाण्यवाद, कर्मकांड आणि राजकीय दहशतवादही स्वीकारण्याचे बंधन हिंदूंच्या माथी नाही. आपले जीवन आणि आपले कर्तृत्व आपल्या इच्छेप्रमाणे घडविण्याचा अधिकार हिंदूत्व नाकारत नाही.

देशातील थोर पुरुषांनी समरस आणि बलशाली समाजाचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या कार्यातून आपल्याला समतेचाच संदेश मिळतो. त्यांच्या डोळय़ासमोर हिंदू समाज होता आणि त्यातील दोष दूर करण्याचा सर्वाचा प्रयत्न होता. राष्ट्राची एकात्मता ही सांस्कृतिक एकात्मतेवर निर्भर असते. महर्षी अरविंद, डॉ. हेडगेवार, स्वा. सावरकर यांची ही श्रद्धा होती. ही मंडळी राष्ट्राच्या पतनाची व उत्थानाची विशेष शैलीने मीमांसा करतात. ते मानतात की, आपल्या हिंदू समाजात उच्च-नीचता, जातीयता, स्वार्थलोलुपता इत्यादी दुर्गुण वाढले व म्हणून राष्ट्राचे पतन झाले व राष्ट्र परतंत्र झाले.

डॉ. आंबेडकरांनी बनारस हिंदू विद्यापीठात १९५६ मध्ये भाषण केले. ते म्हणतात,  ‘‘भारतीय संस्कृतीचे तत्त्वज्ञान आभाळाला भिडणारे आहे, पण भारतीयांचे आचरण मात्र पाताळात जाणारे भिडणारे आहे. अशा परिस्थितीत येथे अद्वैताचे व अध्यात्माचे तत्त्वज्ञान कसे रुजेल?’’ दुर्दैवाने बाबासाहेबांच्या या आवाहनाला सत्वर अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही. आजही त्या संदर्भातील त्रुटी आपण अनुभवत आहोत. या त्रुटी व दोष युद्धपातळीवर संपवले गेले पाहिजेत.

भारतीय राष्ट्रवादाचा म्हणजेच हिंदूत्वाचा विकास व्हायचा असेल तर या राष्ट्रवादाचा आधार असलेला हिंदू समाज हा कोणत्याही प्रकारच्या सामाजिक भेदांपलीकडे (जात-पात, गरीब-श्रीमंत, भाषा, प्रांत, संप्रदाय, नागरी-ग्रामीण-वनवासी, स्त्री-पुरुष) जाऊन एकात्म आणि एकरस झाला पाहिजे. हे ऐक्य सक्तीने, कायद्याने किंवा प्रलोभनाने साध्य होणार नाही, तर ते भारतमातेच्या प्रेमाने, समान राष्ट्रीय आकांक्षेतून आणि सामाजिक समरसततूनच होईल. हिंदूत्वास आज देशभरात प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. या वेळी हिंदूत्वाचा सामाजिक आशय आग्रहाने हिंदू समाजासमोर आणला गेला पाहिजे. हिंदूत्वाच्या सामाजिक आशयात सर्व हिंदूंविषयी प्रेम व जिव्हाळा, समता अपेक्षित आहे.

आपण सर्व जण नेहमी समतेची गोष्ट करतो, परंतु समरसतेशिवाय सामाजिक समता कधीही निर्माण होऊ शकणार नाही. समरसता ही समतेची ‘गॅरंटी’ आहे. कोणतीही व्यक्ती कोणाचेही शोषण न करता आपल्या कर्तृत्वाचा उपयोग अन्यांसाठी तेव्हाच करेल जेव्हा त्याच्या हृदयात समाजाप्रति समरसता असेल. म्हणून समतेसाठी पहिली अट आहे ती समरसता व पारिवारिक भावनेची. दत्तोपंत ठेंगडी म्हणत, ‘‘विषमता दूर होऊन समतेची निर्मिती होऊनही ‘समता’ हे अंतिम लक्ष्य होऊ शकत नाही, कारण अंतिम लक्ष्य ‘समरसता’ हे आहे. समरसतेकडे जाताना ‘समता’ ही एक महत्त्वपूर्ण पायरी किंवा टप्पा आहे. त्याच्या अभावाने समतेची अवस्था प्राप्त होऊनही ती स्थायी होऊ शकणार नाही.’’ डॉ. आंबेडकरांनी हाच भाव प्रकट केला होता. ते एका भाषणात म्हणतात, ‘‘माझ्या तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान आहे, ‘धर्म’. मात्र त्याला राजकारणाशी जोडणे ही चूक ठरेल. मी भगवान बुद्धांना गुरुस्थानी मानले आहे. त्यांच्या उपदेशातून मी माझे तत्त्वज्ञान निश्चित केले आहे. माझ्या तत्त्वज्ञानात स्वातंत्र्य आणि समतेस प्राधान्य दिले आहे. परंतु अमर्याद स्वातंत्र्यामुळे समतेचा नाश होतो आणि निर्भेळ समता असेल तर स्वातंत्र्याचा विकास होत नाही. माझ्या तत्त्वज्ञानात स्वातंत्र्य आणि समता यांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून काही निर्बंध घातले आहेत. परंतु हे निर्बंध स्वातंत्र्य व समतेचे उल्लंघन रोखू शकतील, यावर माझा विश्वास नाही. स्वातंत्र्य आणि समतेचे रक्षण केवळ ‘बंधुभाव’ या तत्त्वानेच संभव आहे. याच बंधुभावास मानवता म्हणतात. मानवता हेच धर्माचे दुसरे नाव आहे. याच बंधुभावास सामाजिक समरसता म्हणतात. भगवान बुद्धाची मैत्री आणि करुणेतूनच समरसता बहरत असते.’’

स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘‘दीन, दु:खी, दारिद्रय़ व अज्ञानात खितपत पडलेले सर्व भारतवासीच माझ्या देवता आहेत. त्यांची सेवा करणे, त्यांच्यातील सुप्त चैतन्य जागविणे आणि त्यांचे भौतिक जीवन सुखमय व उन्नत करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. विवेकानंदांनी सवर्ण समाजाच्या ‘शिवाशिव’ प्रवृत्तीतून निर्माण झालेल्या अनिष्ट रूढींवर कठोर प्रहार केले. जगद्गुरू आद्य शंकराचार्याची बुद्धिमत्ता आणि भगवान बुद्धाची करुणा याने परिपूर्ण असलेल्या विशाल हृदयाच्या संगमाने भारताचा उद्धार होईल असा विश्वास त्यांनी प्रकट केला होता.

झुकत्या मापाचा मंत्र

हिंदू हेच या देशाचे स्वामी आहेत आणि त्यांनीच हा देश घडवला आहे हे नि:संशय. या देशातील शाश्वत जीवनमूल्यांचा हिंदूंनी निश्चितच अभिमान बाळगला पाहिजे. परंतु त्याचबरोबर कालौघात वर्णभेद, जातिभेद, अस्पृश्यतासारखे सामाजिक दोष व विकृती निर्माण झाल्या त्याही स्वीकारून त्या दूर करण्याची जबाबदारीही हिंदूंचीच आहे. हिंदूत्वाचा अभिमान, हिंदूत्वाचे सामाजिक सुरक्षाकवच आणि हिंदू समाजाची स्वातंत्र्य, समता, बंधुता या कार्यत्रयीवर रचना हे आजच्या हिंदू समाजाचे सामाजिक ध्येय असले पाहिजे. हे ध्येय व्यवहाराच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न सतत करत राहावे लागेल.

श्री. म. माटे यांनी एका उदाहरणाच्या साहाय्याने झुकत्या मापाच्या मंत्राचे निरूपण केले आहे. माटे म्हणतात, ‘‘आरमाराची गती, त्या आरमारातल्या कमी वेगाच्या गलबतावर अवलंबून असते; म्हणून या दुर्बल गलबताकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.’’ (मो. ग. तपस्वी, ‘बोल अमृताचे’, पान क्र. ४३०) स्वामी विवेकानंदांनी ‘‘चांडाळाच्या मुलाला शिकवण्यासाठी दहा ब्राह्मण नेमले पाहिजेत,’’ असा उपदेश केला. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ‘दोरखंडाच्या मजबुतीसाठी नाजूक धाग्याकडे अग्रक्रमाने लक्ष दिले पाहिजे,’ असा सल्ला झोपडपट्टी जनता परिषदेला दिला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी अतिशय सुस्पष्ट शब्दांत माणुसकीचा मंत्र विशद केला आहे. ते म्हणतात, ‘‘मी धरून चालतो की, आपल्या दलित बंधूंना करुणा नको आहे, त्यांना बरोबरीचे स्थान पाहिजे आहे आणि त्यांना ते पुरुषार्थाने मिळवायचे आहे. असे असल्याने ते त्या दृष्टीनेच विचार करतात. आतापर्यंत ते मागे राहिले असल्यामुळे त्यांना सर्व प्रकारच्या सवलती मागण्याचा हक्क आहे आणि त्या सवलती किती काळ सुरू ठेवायच्या हाही त्यांचाच प्रश्न आहे. ते त्यांनीच ठरवायचे आहे. पण सरतेशेवटी सर्व घटकांच्या बरोबरीने त्यांना राहायचे आहे आणि त्यांच्या स्वत:च्या योग्यतेमुळे ते सगळय़ांच्या बरोबरीचे आहेत हेच त्यांना सिद्ध करायचे आहे.’’ (सामाजिक समता आणि हिंदू संघटन, वसंत व्याख्यानमालेतील भाषण, १९७४). सामाजिक बदल हे अतिशय संथ गतीने होत असतात. समरस समाजजीवन घडविण्याचे कामही असेच आहे. व्यक्ती-व्यक्तीच्या मनाचे परिवर्तन करून हे काम घडवावे लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेच काम अविरत करत आहे.

राष्ट्रवादाच्या सामाजिक आशयाची चर्चा करताना समाजसुधारक व थोर मंडळींच्या जीवनातील काही अनुकरणीय उदाहरणे आपण कायम लक्षात ठेवली पाहिजेत. महात्मा फुले यांनी दलितांसाठी खुला केलेला आपला हौद, नारायण गुरूंनी वैकाममधला रस्ता सर्वाना मोकळा व्हावा म्हणून केलेला सत्याग्रह, महात्मा गांधी, पंडित मदनमोहन मालवीय वगैरे सत्पुरुषांनी सार्वजनिक पाणवठय़ावर सर्व जाती- उपजातींच्या नागरिकांना प्रवेश मिळण्यासाठी आखलेल्या मोहिमा, डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला महाडचा चवदार तळे व काळाराम मंदिराचा सत्याग्रह, रामानुजाचार्यानी एका असामान्य दलितास गुरू मानून त्याचा केलेला सत्कार, संत एकनाथांनी वडिलांच्या श्राद्धास पंचपक्वान्नांच्या जेवणासाठी बोलावलेला महार, स्वा. सावरकरांचे रत्नागिरीतील सामाजिक सुधारणांचे पर्व, पंढरपूरच्या वारीत वारकरी पाळत असलेली समता- ममता- एकता, अनंत हरि गद्रे यांचे झुणका भाकर सत्यनारायण इत्यादी घटना हिंदूत्वाचा सामाजिक आशय व्यवहारात आणण्यासाठी दिग्दर्शक आहेत.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत कवी ‘बी’ यांच्या कवितेतील दोन ओळी महत्त्वपूर्ण ठरतात. ते स्वातंत्र्य खरे न फक्त आपुली जे तोडिते बंधने अन्यांच्या पदशृंखलात रमते नि:ष्कंप ऐश्या मने आपल्या पायातल्या बेडय़ा किंवा शृंखला गळून पडाव्यात अशी जे इच्छा बाळगतात आणि इतरांच्या पायातल्या बेडय़ांबद्दल मात्र उदासीन किंवा असंवेदनशील असतात त्यांची स्वातंत्र्याची कल्पना बेगडी समजावी. केवळ सार्वजनिक जीवनात नव्हे तर वैयक्तिक जीवनातसुद्धा समस्त हिंदूंनी राष्ट्रवादाला सामाजिक आशयाची जोड दिली तर ते खरे स्वातंत्र्य ठरेल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून शताब्दी महोत्सवाकडे जाताना न्यायाचे आणि माणुसकीचे राज्य प्रस्थापित करण्याची सर्व भारतीयांची जबाबदारी आहे.

(लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव आहेत.)