‘मनुष्याने स्वत:ची परार्थी, करुणामय, सात्त्विक अशी उदात्त प्रतिमा निर्माण केली आहे. वास्तवात मात्र गिधाडप्रवृत्तीचाच अधिक बोलबाला असतो,’ असं थेट भाष्य निकोलो मॅकियाव्हेली (१४६९- १५२७) या राजकीय विचारवंतानं केलं आहे. राजकीय क्षेत्र सगळ्यात निर्णायक असल्यानं तिथं माणसांच्या खऱ्या प्रवृत्तीचं दर्शन घडतं, असं ‘द प्रिन्स’ या छोटेखानी पुस्तकात त्याने विशद केलं. त्याच्या इतर लिखाणापेक्षा ‘द प्रिन्स’मुळेच तो जगात (कु)प्रसिद्ध ठरला. हे १५१३ मध्ये लिहिलेलं वादग्रस्त पुस्तक त्याच्या हयातीत प्रकाशित होऊ शकलं नाही. त्यासाठी १५३२ उजाडावं लागलं. मात्र कॅथोलिक चर्चनं १५५७ मध्ये ‘वर्जित पुस्तकांच्या यादी’त ‘द प्रिन्स’चा अंतर्भाव केल्यानं त्यावर बंदी आली. ‘द प्रिन्स’च्या विरोधात शेकडो पुस्तकं प्रकाशित होऊन मॅकियाव्हेलीचं दानवीकरण झालं आहे. या ‘डीमनॉलॉजी’च्या परिणामी आजच्या घडीला ‘मॅकियाव्हेलियन’ या विशेषणाचा अर्थ पाताळयंत्री, धूर्त, संदिग्ध, आतल्या गाठीचा, विश्वासघातकी, अनैतिक, विकृत, क्रूर, सत्तापिपासू असा होतो. मात्र दुसरीकडे, ‘द प्रिन्स’ या विचारकृतीत अनेक आधुनिक विचारवंतांच्या लिखाणाची बीजं आढळून येतात. नेपोलियन बोनापार्ट, स्टॅलिन, हेन्री किसिंजर, मार्गारेट थॅचर आदी अनेक राजकारण्यांचं हे आवडतं पुस्तक ठरलं. मुसोलिनीनं तर ‘प्रिल्यूड टू मॅकियाव्हेली’ नावाचा प्रबंधच लिहिला आहे! क्वॉत्रोचेन्तोच्या वातावरणात जन्मलेल्या या फ्लॉरेन्टिन विचारवंताच्या पुस्तकात असं काय आहे जे एकाच वेळी विचारप्रवर्तक आणि निषिद्धही ठरतं? या प्रश्नाच्या मदतीनं इथे निकोलो मॅकियाव्हेली या महत्त्वपूर्ण राजकीय विचारवंताची संक्षिप्त चर्चा करू.

त्याआधी क्वॉत्रोचेन्तोच्या ज्या अराजक कालखंडात मॅकियाव्हेलीचं लहानपण, शिक्षण आणि वैचारिक जडणघडण झाली त्याविषयी थोडं. १४६९ मध्ये फ्लॉरेन्सच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मॅकियाव्हेलीचं शिक्षण इटालियन रनेसॉन्सच्या वातावरणात झालं. त्याला मात्र सभोवतालच्या कलात्मक गोष्टींमध्ये रस नव्हता. त्याच्यासाठी आकर्षणाची एकमेव गोष्ट म्हणजे राजकारण! लॅटिन अवगत असल्यानं तो रोमन इतिहासाचा अभ्यास करत असे. इतिहासातील राजकीय घडामोडींप्रमाणेच सभोवतालच्या राजकीय घटनांचं तो तटस्थपणे निरीक्षण करत असे. त्यानं मेदिची घराण्याची हकालपट्टी आणि जिरोलामो साव्होनारोला (१४५२- १४९८) या धर्मोपदेशकाची फसलेली धार्मिक क्रांती जवळून अनुभवली होती. साव्होनारोलानं इटालियन रनेसॉन्सच्या विरोधात जोरदार मोहीम छेडली होती. मेदिचींच्या नेतृत्वात फ्लॉरेन्सने साधलेली भौतिक, सांस्कृतिक आणि वैचारिक समृद्धी म्हणजे नैतिक पतन, असा त्याच्या भाषणांचा गाभा होता. अनैतिक जीवनशैलीला त्यागून येशूचा मार्ग पत्करला नाही तर फ्लॉरेन्सचा सर्वनाश अटळ आहे असं साव्होनारोलानं भाकीत केलं होतं. फ्लॉरेन्सवर होणाऱ्या फ्रेंच आक्रमणाचं देखील त्याने भाकीत केलं होतं. १४९४ मध्ये फ्रान्सने खरोखर आक्रमण केलं! त्याची भाकीतं खरी ठरतात अशी प्रतिमा निर्माण करण्यात त्याला यश आल्यामुळे तो साक्षात ईश्वराचा दूत वाटत असे. त्याची जहाल भाषणं ऐकण्यासाठी शेकडो मैलांचा प्रवास करून लोक फ्लॉरेन्सला येत. लोरेन्झो दी मेदिचीसारख्या द्रष्ट्याला त्याच्या वाढत्या लोकप्रियतेत येणाऱ्या संकटाचं सावट दिसत होतं.

त्याच दरम्यान ‘मेदिची घराण्यानं फ्रान्सशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला’ म्हणून त्यांची हकालपट्टी करून साव्होनारोलाच्या मार्गदर्शनाखाली १४९४ मध्ये मूलतत्त्ववादी राज्याची स्थापना करण्यात आली. साव्होनारोलाच्या अनुयायांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय होती. धर्मरक्षक तरुण ईहवादी जीवनशैलीचा पुरस्कार करणाऱ्या वस्तूंची आणि वास्तूंची जाळपोळ करत असत. मग साव्होनारोलानं मोर्चा रोमकडे वळवला. फ्लॉरेन्सच्या ‘मुक्ती’नंतर रोमचीही ‘व्यभिचारी पोपपासून मुक्ती’ करायची, संपूर्ण ख्रिास्ती जगाचं पुनरुज्जीवन करायचं, हे त्याचं स्वप्न. प्रिटिंग प्रेसमुळे त्याच्या स्फोटक भाषणांच्या प्रती वणव्यासारख्या पसरू लागल्या. शेवटी १४९८ मध्ये फ्लॉरेन्समधील सत्ताधारी वर्ग आणि पोप यांनी संगनमतानं साव्होनारोलावर धर्मविरोधी कृत्यांचा आरोप करून जिवंत जाळलं. थोडक्यात, ‘रनेसॉन्सने मध्ययुगीन साव्होनारोला नष्ट केलं’. इसवी सनाच्या पाचव्या शतकात सेंट ऑगस्टिननं अशीच मोहीम चालवली होती. मात्र साव्होनारोलाचा काळ हा सेंट ऑगस्टिनचा काळ नसल्यानं त्याला सेंट ऑगस्टिनसारखं यश मिळालं नाही. त्यामुळे, ‘एखादी गोष्ट विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीत यशस्वी झाली म्हणजे ती प्रत्येक परिस्थितीत यशस्वी होईल असं नव्हे,’ हा राजकीय धडा मॅकियाव्हेली शिकला. त्यानंतर फ्लॉरेन्समध्ये नवीन रिपब्लिकची स्थापना होऊन मॅकियाव्हेलीनं सार्वजनिक जीवनात पदार्पण केलं. फ्लॉरेन्सच्या परराष्ट्र आणि संरक्षण खात्यात सचिव आणि राजकीय सल्लागार या पदांवर १४९८ ते १५१२ दरम्यान त्यानं काम केलं

द प्रिन्स’ मागची प्रेरणा

फ्लॉरेन्सचा सत्तापालट १५१२ मध्ये होऊन पोपच्या मदतीनं १८ वर्षांनंतर मेदिची परत सत्तारूढ होतात. मॅकियाव्हेलीला पदच्युत करण्यात येतं. मेदिचींविरोधी कटात सहभागाच्या आरोपावरून त्याला अटक करून, कैदेत छळही सुरू होतो. मात्र त्याच दरम्यान मेदिची घराण्याचा सदस्यच पोप बनतो म्हणून राजकीय कैद्यांना अभय दिलं जातं. मॅकियाव्हेलीला फ्लॉरेन्सपासून १० कि.मी.वर असलेल्या त्याच्या वाड्यातच नजरकैद ठोठावली जाते. ‘द प्रिन्स’ म्हणजे मॅकियाव्हेलीनं मेदिची राजवटीत नोकरी मिळवण्यासाठी लिहलेला दीर्घ अर्ज! स्वत:ची उपयुक्तता सिद्ध करत तो सत्तासीन मेदिचीला सरळ लिहितो की तुला खूश करण्यासाठी कुणी महाग भेटवस्तू तर कुणी संपत्ती देईल. मी मात्र माझ्या दीर्घ अनुभवातून, अध्ययनातून आणि चिंतनातून कमावलेलं वास्तववादी ज्ञान देऊ इच्छितो. राजकीय वास्तव तटस्थपणे समजून न घेता राजकारण कसं ‘असायला पाहिजे’सारख्या भ्रामक गप्पा कुठल्याही प्रिन्ससाठी आत्मघातकी ठरतात. त्यापेक्षा राजकारण कसं असतं आणि सत्ता टिकवून ठेवण्यासाठी काय करावं लागतं याविषयी मी सरळ ‘कामाची’ गोष्ट करणार आहे.

‘द प्रिन्स’मध्ये stato (सत्ताशक्ती, अधिमान्यता) या इटालियन संकल्पनेचा अनेकार्थानं वापर करण्यात आला आहे. राजकीय सत्ता ( stato) टिकवून ठेवण्यासाठी, साधनं आणि साध्याचा घोळ न करता सतत राजकीय पत ( stato) वाढवावी लागते असा सल्ला मॅकियाव्हेली देतो. साधनं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात तर साध्य केलेल्या गोष्टींमुळे सुटका होते. मॅकियाव्हेलीचा परिणामवादी (consequentialist) दृष्टिकोन ‘साध्यांप्रमाणे साधनंदेखील नैतिकच असली पाहिजेत’ या ख्रिास्ती कर्तव्यप्रधान दृष्टिकोनाला छेद देतो.

लोकांचं प्रेम राजकीय पत वाढवतं म्हणून तू सतत लोकप्रियता कमाव, स्वत:ला लोकप्रिय कामांपुरतं मर्यादित ठेवून अप्रिय कामं करायला कुणाची तरी नेमणूक कर. लोकप्रियता शक्य नसेल तेव्हा भीती तरी वाटली पाहिजे. मात्र तुझ्याबद्दल द्वेष वाढणार नाही, याची काळजी घे. राजकारणात प्रेम, भीती या गोष्टी जमेच्या बाजू ठरतात. द्वेष मात्र कधीही हितावह नसतो. राजकारणात absolute truth नसून effectual truth असतं. त्यामुळे गरज पडल्यावर तुला प्रभावीपणे खोटं बोलता आलं पाहिजे. सत्ताधारी धार्मिक नसला तरी चालेल पण धर्मपरायण वाटलाच पाहिजे. तसंही लोक भाबडे असल्यानं, फसवणूक करणाऱ्याला फसवणूक करून घेणारे हमखास सापडतात. मॅकियाव्हेली पोप अलेक्झांडर सहावा (१४३१- १५०३) याच्या ११ वर्षांच्या कारकीर्दीचा दाखला देत नमूद करतो की त्यानं जनतेची फसवणूकच केली. आधीच्या वचनाची पूर्ती न करताच बेंबीच्या देठापासून नव्यानं आश्वासन देणारा त्याच्यासारखा कुणी होऊन गेला नाही. तसंही स्टेटक्राफ्ट आणि ‘स्टेजक्राफ्ट’मध्ये फार फरक नसतो. माणसं भावनिक पातळीवरूनच प्रतिक्रिया देतात. फार कमी लोक वैचारिक पातळीपर्यंत जाण्याची तसदी घेतात. म्हणून कुठल्याही गोष्टींना भावनिक वळण देण्याची हातोटी असली पाहिजे. राजकारणाचं इंधन बहुसंख्यांच्या भावना असतात- मोजक्यांचे विचार नव्हे!

मॅकियाव्हेली राजकारणातील आगंतुक (contingent) घटितांसाठी fortuna या संकल्पनेचा वापर करतो. राजकारणाचा एक भाग घडवून आणता येतो. आगंतुक भागावर मात्र कुणाचंही नियंत्रण नसतं. पण आगंतुक घटितांवरही पूर्णपणे ताबा असल्याचा भ्रम तुला निर्माण करता आला पाहिजे. बदलत्या परिस्थितीनुसार राजकीय पत वाढविण्यासाठी तुझ्याअंगी virtu असला पाहिजे. यातल्या Virtu या इटालियन संकल्पनेचा अर्थ चौकस आकलन, अहर्निशम् सतर्कता, धाडस आणि गतिशीलता (virtuosity). थोडक्यात, साधनांच्या बाबतीत मॅकियाव्हेली अभिजात परंपरेपासून पूर्णपणे फारकत घेऊन स्पष्ट करतो की राजकारण good and evil पलीकडे असतं. धार्मिक पैलूंचं महत्त्व नेपथ्यापुरतं असतं.

‘द प्रिन्स’च्या शेवटी तो शतखंडित इटलीच्या एकीकरणाची विनंती करतो. तत्कालीन इटलीत अराजकता इतकी होती की इटालियन राज्यांमध्ये रातोरात आघाड्या, युत्या आणि युद्धं घडत असत. विभाजित, शक्तिहीन इटली कधी फ्रान्स तर कधी स्पेनसाठी शिकार ठरत असे. या दयनीय स्थितीसाठी मॅकियाव्हेली कॅथोलिक चर्चला जबाबदार ठरवतो. लौकिक दृष्टीनं रोम एक स्वतंत्र राज्य होतं. पण पारलौकिक दृष्टीनं रोम धर्मसत्ता म्हणून सगळ्या राज्यांमधील कारभारात ढवळाढवळ करत असे. एकतर कॅथोलिक चर्चनं संपूर्ण इटलीच्या कारभाराची जबाबदारी घ्यावी नाहीतर स्वत:ला फक्त धार्मिक गोष्टींपुरतं मर्यादित ठेवून ढवळाढवळ थांबवावी. मॅकियाव्हेलीच म्हणतो माणसं जितकी धर्मसत्तेजवळ असतात तितकी कमी धार्मिक असतात. ( The nearer people are to the Church of Rome, which is the head of our religion, the less religious they are.) खरंतर, धर्माच्या ठेकेदारांनीच धर्मश्रद्धेला बदनाम केलं असा तो सरळ आरोप करतो.

मॅकियाव्हेली एकमय प्रजासत्ताक आधुनिक इटलीसाठी कळकळीची विनंती करून त्याच्या दीर्घ अर्जाचा शेवट करतो. नोकरी काही त्याला मिळाली नाही. तो गरिबीतच मेला. पण ‘द प्रिन्स’ अभिजात लॅटिनमध्ये न लिहिता सगळ्यांना समजेल अशी लोकभाषा इटालियनमध्ये लिहून आधुनिक राजकीय तत्त्वज्ञानाची मुहूर्तमेढ रोवून तो गेला. सोबतच मनुष्याच्या स्वनिर्मित उदात्त बुरख्याआड दडलेल्या गिधाडाला अधोरेखित करून त्यानं मनुष्याच्या आत्मप्रीतीला ऐतिहासिक जखम दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘द प्रिन्स’मधल्या काही गोष्टींशी सहमत होणं कठीण आहे. मानवी प्रवृत्तीविषयीचा त्याचा निराशावाद अस्वस्थ करणारा आहे. मात्र आन्तोनिओ ग्राम्शीला ‘ pessimism of the intellect and optimism of the willl हे राजकीय तत्त्वज्ञानाचं सूत्र मॅकियाव्हेलीच्या लिखाणात गवसलं आहे.