कालौघात जगाच्या विचारसरणींमधले बदल दिसू लागतात… पण विचारसरणींचा सांधा बदलत असतानाही व्यक्ती म्हणून आपले शील टिकवायचे असते… हे करण्यासाठी मग ‘इतर’, ‘दुसरे’, ‘ते’ कसा विचार करतात आणि का, हेसुद्धा प्रामाणिकपणे समजून घ्यायचे असते- मगच माणूस म्हणून आपण फुलतो, सर्जनशीलताही बहरते! – वयाच्या ९६ व्या वर्षी केंद्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवणारे आणि शुक्रवारी, वयाचे १०१ वे वर्ष सुरू असताना निवर्तलेले नाटककार, लेखक ओमचेरी एन. एन. पिल्लै यांचा जीवनसंदेश काही असेल, तर तो या अशाच शब्दांत मांडता येईल.

त्यांच्या ‘आकाशमिकम्’ या आत्मपर पुस्तकाला २०२० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि एम. टी. वासुदेवन नायर, ओएनव्ही कुरूप, अक्कितम नंबूद्रि आदी दिग्गज मल्याळम साहित्यकारांच्या यादीत त्यांचे नाव कोरले गेले. अर्थात त्याआधी २०१० सालात केरळ राज्य साहित्य अकादमीने त्यांच्या एकंदर साहित्यसेवेचा गौरव म्हणून त्यांना विशेष पुरस्कार दिला होता आणि त्याहीआधी १९७२ मध्येच, ‘प्रलयम’ या त्यांच्या कादंबरीला केरळ राज्य साहित्य अकादमीने त्या वर्षीची अव्वल कादंबरी म्हणून निवडले होते.

हेही वाचा >>> संविधानभान : राष्ट्रीय आणीबाणीची पार्श्वभूमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्ली ही त्यांची सुमारे १९५० पासूनची कर्मभूमी. आधी आकाशवाणीचा मल्याळम वार्ता विभाग, तिथे संपादकपदापर्यंत बढती, अमेरिकेत संज्ञापन आणि पत्रकारिता यांचे उच्चशिक्षण घेऊन मग ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन’ या दिल्लीच्याच संस्थेत अध्यापन, त्याहीनंतर भारतीय अन्न महामंडळात प्रमुख जनसंपर्क अधिकारी असे वैविध्य त्यांच्या लौकिक कारकीर्दीत दिसले. साहित्यातही, चार कादंबऱ्यांखेरीज सुमारे ८० एकांकिका आणि २६ नाटके, अनेक कविता असे वैविध्य त्यांनी जपले. वयाच्या ८०/ ८५ व्या वर्षानंतर आत्मपर लिखाण त्यांनी सुरू केले. त्यांचे शिष्य व सहकारी ए. जे. फिलिप यांनी त्यांच्या सहा पुस्तकांचे इंग्रजीत अनुवादही केले. दिल्लीत इब्राहीम अल्काझींनी सुरू केलेल्या शिक्षणपद्धतीतून आलेली प्रायोगिक नाट्य-चळवळ मल्याळम भाषेतही आणण्याचे, त्यासाठी सशक्त नाट्यसंहिता लिहिण्याचे श्रेय या ओमचेरी पिल्लै यांचेच. केरळच्या अद्वैत आश्रमात आगमानंद स्वामी यांच्याकडून वेदांचे शिक्षण घेतलेल्या ओमचेरी पिल्लै यांनी ‘इस्लामी इतिहास व संस्कृती’ या विषयात रीतसर पदवी मिळवली होती. दिल्लीत, करोलबाग भागात केरळच्या कॅथलिक सिरियनांचे नवे ‘मार थोमा चर्च’ उभे राहिल्यावर प्रत्येक नाताळ त्यांनी तिथे सहकुटुंब साजरा केला! सात दशके हा केरळी साहित्यिक दिल्लीतच राहिला, पण फावल्या वेळात मल्याळमचे धडे दिल्लीतल्या बालकांनाही देऊन संस्कृती- आणि वैविध्यही- जपत राहिला.