अरविंद किवळेकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची स्थापना कोकणातील लोणेरे येथे १९८९ मध्ये ‘एकल’ विद्यापीठ म्हणून झाली. महाराष्ट्र शासनाने माजी मंत्री भाऊसाहेब वर्तक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने कोकण विभागाच्या सामाजिक, आर्थिक व औद्याोगिक विकासाला चालना देण्यासाठी कोकणात तंत्रज्ञान विद्यापीठ असावे अशी शिफारस केली होती. ‘सेन्चुरी रेयॉन’ या कंपनीचे तत्कालीन उपाध्यक्ष दुर्गेशचंद्र यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने या विद्यापीठाकरिता सविस्तर कृती अहवाल सादर केला.

महाराष्ट्रातील रासायनिक औद्याोगिक-क्षेत्र हे प्रामुख्याने कोकणात आहे. या क्षेत्रास कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी विद्यापीठाने सुरुवातीला केमिकल व पेट्रोकेमिकल-अभियांत्रिकी हे अभ्यासक्रम सुरू केले. १९९५-२००० दरम्यान कोकणात येऊ घातलेल्या एन्रॉन प्रकल्पास व विस्तारित होत असलेल्या माहिती-तंत्रज्ञान आधारित औद्याोगिक क्षेत्रास कुशल मनुष्यबळ पुरविण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने इतर अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू केले. विद्यापीठ आयआयटीसारख्या संस्थेतील पदवीधारक अध्यापकांना आकर्षित करण्यास यशस्वी झाले. याच कालावधीत विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता प्राप्त करून घेण्यात व एनबीएचे मूल्याकंन करून घेण्यात आले. या उपलब्धीच्या आधारे विद्यापीठाची जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात आलेल्या टेकिप ( TEQIP) या प्रकल्पात निवड झाली.

महाराष्ट्र शासनाने २०१४ मध्ये विद्यापीठाचा ‘एकल’ दर्जा काढून विद्यापीठाला तंत्रशास्त्र महाविद्यालये संलग्नित करण्याचा अधिकार प्रदान केला. तंत्रशास्त्र महाविद्यालयांत शिकविले जाणारे अभ्यासक्रम उद्याोगाभिमुख असावेत व त्यांत एकवाक्यता असावी हा उद्देश यामागे होता. मार्च-२०१६ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे राज्यस्तरीय संलग्नित-दर्जा असलेले विद्यापीठ ठरले. याच कालावधीत शासनाने पुण्याच्या ‘सीओईपी’ व नागपूरच्या ‘एलआयटी’ या संस्थेस एकल विद्यापीठाचा दर्जा दिला.

तंत्रशास्त्र विद्यापीठ हा ‘फसलेला प्रयोग’ आहे काय हे तपासण्याकरिता विद्यापीठाने ‘एकल’ दर्जा असताना प्राप्त केलेले यश व ‘संलग्नित दर्जा’ प्राप्त होऊन एक दशकही झालेले नाही याची दखल घेणे गरजेचे आहे. याआधारेच कामगिरीचे योग्य मूल्यमापन होऊ शकेल. विद्यापीठाला ‘फसलेला प्रयोग’ ठरविताना वापरलेले निकष आणि वास्तव यातील तफावत स्पष्ट करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम, तंत्रशास्त्र विद्यापीठ हे परीक्षाविषयक अनेक समस्यांचा सामना करीत आहे व त्यावर यशस्वीपणे मातही करत आहे, हे प्रामाणिकपणे नमूद करणे आवश्यक आहे. बहुतेक समस्या या निकालांच्या विलंबाशी निगडित असून, त्या विद्यापीठास ‘ई-पोर्टल’ची सेवा देणाऱ्या पुरवठादाराची सेवा खंडित केल्यामुळे निर्माण झाल्या. पुरवठादाराची सेवा ऐन परीक्षाकाळात तात्काळ खंडित करणे हा विद्यापीठ प्रशासनाचा धाडसी निर्णय होता. त्यामागे पुरवठादाराकडून होत असलेली विद्यार्थ्यांची फसवणूक थांबवणे व फौजदारी गुन्हा दाखल करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणे हे मुख्य उद्देश होते. यावर मात करून विद्यापीठाने नवीन ‘ई-पोर्टल’ कार्यान्वित केले. ते महाराष्ट्र सरकारच्या तंत्रशिक्षण विभागाच्या ‘डॅशबोर्ड’शी जोडले.

लेखकाचा दुसरा आक्षेप हा विद्यापीठाने अवलंबविलेल्या ‘रेमेडियल परीक्षा पद्धती’विषयी आहे. ‘रेमेडियल परीक्षा’ बहुपर्यायी स्वरूपाची होती व त्यात विद्यार्थ्यांना फक्त ‘ढकल पास’ ही श्रेणी दिली जात असे. अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश हा ‘जेईई’ व ‘सीईटी’सारख्या बहुपर्यायी परीक्षेद्वारे होत असतो. केंद्रातील आयआयटी व राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षांत जास्त गुण मिळालेले असतात. ग्रामीण भागांतील खासगी महाविद्यालयांत प्रवेश घेतलेले विद्यार्थी तुलनेने कमी गुण मिळालेले असतात. अशा विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षेची तयारी करताना बहुपर्यायी परीक्षेची सवय झालेली असते व तुलनात्मकदृष्ट्या निबांधात्मक उत्तरे लिहिण्याची क्षमता कमी असते. या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात जाता यावे व चार वर्षांचा अभ्यासक्रम चार वर्षांतच पूर्ण करता यावा या उद्देशाने विद्यापीठाने ‘रेमेडियल परीक्षा’ सुरू केली होती. या परीक्षा पद्धतीवर संलग्नित महाविद्यालयांकडून अनेक तक्रारी आल्यानंतर तिचे ‘बहुपर्यायी’ स्वरूप बदलून ‘निबंधात्मक’ केले. अनेक विद्यार्थी संघटनांकडून याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठाने ‘बहुपर्यायी’ रेमेडियल परीक्षा पुन्हा फक्त ‘सध्या-प्रवेशित’ असलेल्या विद्यार्थ्यांकरिता सुरू केली. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी हिवाळी सत्र २०२४ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करणे आवश्यक होते. ‘नीट’सारखी राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा तीनदा घ्यावी लागली हा इतिहास फार जुना नाही. फक्त तंत्रज्ञान विद्यापीठासच परीक्षा वेळापत्रकातील बदलाबद्दल जबाबदार धरले जाते, याचे आश्चर्य वाटते.

विद्यापीठाने परीक्षा-नियंत्रक म्हणून ‘कोणीतरी’ आणून बसविले व विद्यापीठात परीक्षा मंडळ आस्तित्वात नाही, असे लेखकास वाटते. विद्यापीठाने परीक्षा-नियंत्रक म्हणून पात्र उमेदवाराची नियुक्ती केली आहे. तसेच विद्यापीठाचे परीक्षा मंडळ अतशिय सक्रिय आहे. प्रस्तुत लेखकाचा तिसरा आक्षेप हा अभ्यास मंडळ व अभ्यासक्रमाशी निगडित आहे. या विद्यापीठाच्या स्थापनेपासून अभ्यास मंडळावर औद्याोगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा प्रभाव आहे. उद्याोगाभिमुख अभ्यासक्रमाची निर्मिती व्हावी, हा त्यामागचा उद्देश. विद्यापीठाची स्थापनाच औद्याोगिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या शिफारशीद्वारे झाली. संलग्नित महाविद्यालयांतील अध्यापक आपली नियुक्ती विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर होणे प्रतिष्ठेचे समजतात. तसे होत नसल्याकारणाने ते असमाधानी असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अभ्यासनिर्मितीत आपला सहभाग नाही असा त्यांचा समज होत असतो. हा समज दूर करण्यासाठी हे विद्यापीठ त्यांच्याकरिता नियमितपणे कार्यशाळा आयोजित करते. औद्याोगिक क्षेत्राच्या गरजेनुसार राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांत विद्यापीठ सतत बदल करत असते. विद्यापीठाला भेटी देणाऱ्या अनेक मूल्याकंन समित्यांनी या उपक्रमाची दखल घेऊन ती एक ‘बेस्ट प्रॅक्टिस’ आहे, असा अभिप्राय वेळोवेळी दिला आहे.

लेखकाचा चौथा आक्षेप विद्यापीठाने अतिरिक्त संख्येने संलग्नित करून घेतलेल्या महाविद्यालयांबाबत आहे. गेल्या नऊ वर्षांत विद्यापीठास ४१५ महाविद्यालये संलग्न झाली. त्यात तीनशेपेक्षा जास्त फार्मसी विद्याशाखेतील आहेत. या क्षेत्रात येत्या दशकात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. तसेच चीनशी तुल्यबळ स्पर्धा करण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. त्यासाठी नवीन महाविद्यालये स्थापन करणे व त्यांना संलग्नता देणे क्रमप्राप्त ठरते. तंत्रज्ञान विद्यापीठ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासारख्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवू शकत नाही. या बाबतीत नियामक प्राधिकरणाने, शासनाने व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करणे विद्यापीठास बंधनकारक असते.

लेखक तंत्रज्ञान विद्यापीठाची तुलना इतर विद्यापीठांशी करतात आणि त्यासाठी निकालास विलंब व संलग्नीकरणातील अडचणींचा आधार घेतात. त्याचे एक कारण हे की नवीन महाविद्यालये तंत्रशास्त्र विद्यापीठाकडे कायद्याद्वारे वळविण्यात आली. असे करण्यात आले नसते तर, सर्व संसाधनांनी, सोयींनी संपन्न असलेल्याला व महानगरांत स्थापित असलेल्या या विद्यापीठांना तीच कार्यक्षमता राखता आली असती?

तंत्रशास्त्र विद्यापीठाने ‘एकल’ विद्यापीठ म्हणून वर्तक समितीने आखून दिलेली उद्दिष्टे प्राप्त केली आहेत. कोकण विभागातील रासायनिक औद्याोगिक-क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये व आखाती देशांतील कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते हे प्रामुख्याने तंत्रशास्त्र विद्यापीठाचे पदवीधर आढळतात. आजही रसायन अभियांत्रिकी पदवी प्रवेश इच्छुकांमध्ये हे विद्यापीठ पहिल्या पाचांत असते. त्यामुळे, तीन दशकांपासून तंत्रज्ञान विद्यापीठ हा कोकणाच्या सामाजिक, आर्थिक व औद्याोगिक विकासाचा केंद्रबिंदू ठरला. लोणेरे येथील कॅम्पसमधून बाहेर पडणारे अन्य शाखांतील पदवीधर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्चपदांवर कार्यरत आहेत. अशा माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तंत्रज्ञान विद्यापीठ पुढे जात आहे.

शहरात राहणाऱ्यांना हे विद्यापीठ लोणेरेसारख्या ‘दुर्गम’ भागात आहे असे वाटते. मात्र, विद्यापीठ मुंबई-रायगड-पुणे-ठाणे या औद्याोगिक पट्ट्यात आहे. रायगडाच्या पायथ्याशी लोणेरे येथे ४६० एकरांवर निसर्गाच्या कुशीत ते वसलेले आहे. विस्तीर्ण क्रीडांगणे आहेत. तीन हेलिपॅड असून तिथे विद्यार्थ्यांना ‘ड्रोन’ उडविण्याचे धडे दिले जातात. नवी मुंबईत होऊ घातलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ, पूर्णत्वाच्या वाटेवरील मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व कोकण रेल्वेमुळे हे विद्यापीठ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नकाशावर येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांच्या सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांवर मात करण्याचा प्रयत्न करते. आगामी पदवीदान समारंभानंतर, विद्यार्थ्यांना दुहेरी पदवी मिळवून देणारे हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरेल. त्याच वेळी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शिकत असताना ‘बाटु’बरोबरच आता विद्यार्थ्यांना अमेरिकी विद्यापीठाची पदवी मिळवण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञान विद्यापीठ हा एक फसलेला प्रयोग नसून सतत विकसित होत जाणारा प्रकल्प आहे.