‘व्हेनिस बिएनाले’मध्ये यंदा भारताचं ‘नॅशनल पॅव्हिलियन’ नाही, असं सांगितलं काय किंवा ‘ व्हेनिस शहरात दर दोन वर्षांनी भरणाऱ्या चित्र/शिल्पकला महाप्रदर्शनाची ६० वी खेप येत्या एप्रिलमध्ये सुरू होईल आणि नोव्हेंबपर्यंत सुरू राहील, त्यामध्ये भारताचा ‘राष्ट्रीय कलामंडपा’द्वारे सहभाग असणार नाही’ अशा सविस्तर मराठी शब्दांत सांगितलं काय, यात बातमी आहे हे फार कुणाला कळणारच नाही.. मुळात तिथं भारताचा सहभाग ‘सत्तर साल में’ कधी म्हणजे कधीही नव्हता! सन २०१४ नंतर जो काही ‘नवा भारत’ घडला, त्या भारताच्या राष्ट्रीय कलामंडपाचा सहभाग मात्र २०१९ च्या व्हेनिस द्वैवार्षिक महाप्रदर्शनात होता आणि त्या वेळी मात्र ‘व्हेनिसमध्ये भारताचा बोलबाला’, ‘आता दर खेपेला असणार व्हेनिसमध्ये भारताचा राष्ट्रीय कलामंडप’ अशा प्रकारची प्रसिद्धी करण्यात आलेली होती. मग करोनामुळे २०२१ सालची व्हेनिस बिएनालेच वर्षभर पुढे ढकलण्यात आली, तेव्हा भारतानं नकार कळवला होता. मात्र ऑक्टोबर २०२३ मध्ये ‘इंडिया आर्ट फेअर’च्या  संकेतस्थळावर,  ‘भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्यातर्फे २०२४ च्या एप्रिलमध्ये होणाऱ्या व्हेनिस बिएनालेमध्ये भारताचा राष्ट्रीय कलामंडप उभारण्यासाठी गुंफणकाराची (प्रदर्शन नियोजकाची) नेमणूक करणे आहे’ अशा प्रकारच्या सूचना दिसू लागल्या. त्यामुळे यंदा भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या तथाकथित स्वायत्त कला-संस्थांनी हात दाखवून अवलक्षण केलंय.. किंवा कुणाच्यातरी नाकर्तेपणामुळे ते त्यांना करावं लागलंय, हे उघड आहे. पण म्हणून काय भारत वंचित राहिलाय का?

.. त्याबद्दलचा तपशील देण्याआधी थोडं कौतुकही करू या भारतानं एकदाच व्हेनिसमध्ये सिद्ध केलेल्या राष्ट्रीय कलामंडपाचं. ते कौतुक करण्याआधी मुळात, हे व्हेनिसबिनिस एवढं का महत्त्वाचं आणि ‘राष्ट्रीय कलामंडप’ हा काय प्रकार, हे जरा समजून घेऊ.

America Police
अमेरिकेत चाललंय काय? आणखी एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू, वाणिज्य दूतावासाने दिली माहिती
International Monetary Fund
विकास दराचे आठ टक्क्यांचे सातत्य २०४७ पर्यंत टिकेल; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्यकारी संचालक सुब्रमणियन यांचा दावा
us clear stand on gaza ceasefire
गाझातील शस्त्रविरामासाठी अमेरिकेची स्पष्ट भूमिका; नकाराधिकाराचा वापर टाळल्याने यूएनएससीमध्ये ठराव मंजूर, नेतान्याहूंचा अमेरिका दौरा रद्द
Crime Scene
अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, गेल्या वर्षभरातील नववी घटना

तर ‘जागतिक चित्रशिल्प वगैरे दृश्यकलांचं ऑलिम्पिक’ म्हणून व्हेनिसच्या बिएनालेला ओळखलं जातं. व्हेनिसच्या बिएनालेनंतरच जगभर २७० शहरांमध्ये अशी द्वैवार्षिक महाप्रदर्शनं भरू लागली (त्यापैकी काही बंद पडली). सन १८९५ पासून- म्हणजे चित्रकलेच्या इतिहासात ‘इम्प्रेशनिझम’मुळे क्रांती घडलेली असतानाच्या काळात – दर दोन वर्षांनी व्हेनिसचं महाप्रदर्शन भरू लागलं, तेव्हा त्याची व्याप्ती युरोपपुरतीच होती. पण या देशांनी यावं, आपापल्या देशातली उच्चकोटीची कला दाखवावी, असा हेतू त्यामागे होता. वसाहतवादी युरोपीय देश त्या वेळी भारतीय उपखंडातून, इंडोचायनातून किंवा आफ्रिकेतून जुन्या कलावस्तू ढापायचे आणि ‘हे आमचंच वैभव’ म्हणायचे, तसल्या बनवेगिरीला व्हेनिस बिएनालेमध्ये अजिबात स्थान नव्हतं. त्यामुळे झालं असं की इम्प्रेशनिझम, एक्स्प्रेशनिझम, फॉविझम, क्युबिझम, बाउहाउस, फ्यूचरिझम.. अशा कलाविचारांवर आधारलेल्या चळवळी १९०० ते १९४० या काळात युरोपमध्ये मूळ धरत होत्या, तेव्हा त्या नव्या कलेचं प्रतिबिंब व्हेनिसमध्ये दिसायचं. पुढे १९६० च्या दशकातल्या अमेरिकी ‘पॉप आर्ट’पर्यंत हे घडत्या इतिहासाचं दर्शन होत राहिलं. व्हेनिस बेटावर ‘जार्दीनी द बिएनाले’ हे उपवन, त्यात या युरो-अमेरिकी देशांनी कायमस्वरूपी पक्कं बांधकाम करून उभारलेले आपापले राष्ट्रीय कलामंडप, इटलीत साम्यवाद्यांचीही सत्ता आल्यामुळे रशिया, व्हेनेझुएला अशाही देशांनी या उपवनात मंडप उभारले. पुढे १९८० पासून व्हेनिस बिएनालेनं विस्तारून ‘आर्सेनाले’ या मध्ययुगीन जहाजबांधणी- शस्त्रनिर्मिती कारखान्याचीही जागा व्यापली, तेव्हा तिथेही काही राष्ट्रीय कलामंडप आले. यंदा- २०२४ मध्ये या राष्ट्रीय कलामंडपांची संख्या ९० आहे. याखेरीज, आयोजकांतर्फे एक मोठ्ठं ‘मध्यवर्ती प्रदर्शन’, अशी या बिएनालेची रचना असते.

 आता २०१९ मधल्या, भारताच्या पहिल्यावहिल्या ‘राष्ट्रीय’ सहभागाबद्दल. आर्सेनालेमधली मोक्याची जागा आपल्या देशाला मिळाली होती. त्या प्रशस्त गोदामवजा जागेच्या एका भिंतीवर अनेक लाकडी खडावांचं एक मांडणशिल्प जी. आर. इरण्णा यानं केलं होतं, ते तर अख्ख्या बिएनालेतला एक ‘सेल्फी पॉइंट’ ठरलं होतं!

शकुंतला कुलकर्णी, जितीश कलाट, अतुल दोडिया या मुंबईकर कलावंतांखेरीज असीम पुरकायस्थ, जिजी स्कारिआ यांचाही सहभाग इथं होता आणि ‘नकोसे’ झालेले मकबूल फिदा हुसेन तसंच स्त्रीवादी घटित-कलाकार (परफॉर्मन्स आर्टिस्ट) रूमाना हुसेन या दोघा – एकमेकांशी कोणताही कौटुंबिक संबंध नसलेल्या पण दोघाही दिवंगत- कलावंतांच्या कामाच्या प्रतिमा होत्या. अशा नव्याजुन्या कलाकृतींना जोडणारा धागा होता- महात्मा गांधी! गांधीजींच्या १५० व्या जयंतीवर्षांनिमित्त या कलाकृती निवडण्यात आल्या होत्या. साधेपणा, भारतीयता अशा व्यापक कल्पनांबरोबरच गांधीजींची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष (खडावांमधून प्रतीत होणारी दांडीयात्रा..) प्रतिमा ही भारतीय कलामंडपाचं केंद्रस्थान होती. महत्त्वाचं म्हणजे ‘किरण नाडर म्युझियम ऑफ आर्ट’ (केएनएमए) या खासगी संग्रहालयानं सरकारी ‘राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय’ (एनजीएमए दिल्ली) तसंच सांस्कृतिक कार्य खातं आणि ‘फिक्की’ या उद्योजक संघटनेचा सांस्कृतिक विभाग अशांच्या सहकार्यानं हे जुळवून आणलं होतं. ‘एचसीएल’ या बडय़ा संगणक कंपनीचा वरदहस्त असलेल्या ‘केएनएमए’ला पुढेही हे करत राहाणं अजिबात अशक्य नव्हतं. पण कुठं माशी शिंकली कुणास ठाऊक.

एक तर्क अत्यंत अनधिकृतपणे लढवता येतो तो असा की, ‘मन की बात’चे शंभर भाग झाल्याबद्दल ‘एनजीएमए- दिल्ली’नं गेल्या वर्षी ‘जनशक्ती’ हे प्रदर्शन भरवलं होतं, त्याहीसाठी दिल्लीच्या ‘केएनएमए’नं मदत केली होती आणि त्यामुळे मात्र कलाक्षेत्रातले अनेक भारतीय  ‘केएनएमए’वर नाराज झाले होते (त्यानंतरपासून या खासगी संग्रहालयाच्या निमंत्रणांना मान न देणारे काही ज्येष्ठ चित्रकार आजही आहेत). काहीही असो.. सन २०१९ मधलं ‘इंडिया पॅव्हिलियन’- भारत कलामंडप- हे ‘खासगी-सरकारी भागीदारी’चं उत्तम उदाहरण ठरलं असताना त्याची पुनरावृत्ती मात्र होऊ शकली नाही.

भारतीय होते आणि आहेतही!

एकटय़ादुकटय़ा भारतीय चित्रकारांची निवड मात्र व्हेनिसच्या बिएनालेतल्या मध्यवर्ती प्रदर्शनासाठी सातत्यानं होत राहिली आहे. फ्रान्सिस न्यूटन सूझांचा समावेश १९५४ सालच्या २७ व्या बिएनालेत होता, तर १९६२ सालच्या ३१ व्या बिएनालेत तुलनेत अधिक भारतीय चित्रकार होते, त्यांत ना. श्री. बेन्द्रे, क्रिशन खन्ना, बिरेन डे यांचाही सहभाग होता. या बिएनालेला प्रचंड प्रतिष्ठा मिळू लागल्यानंतर, एकविसाव्या शतकात रियाज कोमू, सुनील गावडे, शिल्पा गुप्ता यांचा मध्यवर्ती प्रदर्शनातला सहभाग लक्षणीय ठरला होता. याखेरीज, बिएनालेच्या काळात व्हेनिसमध्येच अन्यत्र ‘कोलॅटरल इव्हेन्ट’म्हणून लागलेल्या प्रदर्शनांत  आजवर भारतीय सहभागी होते.

यंदा मात्र ‘अरावनी आर्ट प्रोजेक्ट’ या तृतीयपंथी कला-समूहासह वस्त्रकलावंत मोनिका कोरिया, दिवंगत रंगचित्रकार अमृता शेरगिल, जामिनी रॉय, भूपेन खक्कर, रामकुमार, बी. प्रभा, रझा आणि सूझा अशा सर्वाधिक भारतीयांची निवड झाली आहे. पण प्रसिद्धी करूनही भारताचा कलामंडप मात्र नाही. अर्थात यंत्रणांकडून प्रसिद्धी काय, होतच असते म्हणा.. त्याचं काय एवढं!