‘सर्वत्मका शिवसुंदरा’ हे स्वागत आणि प्रार्थना गीत परिपाठाचा अविभाज्य भाग. पुढे ते गळालं. काही दिवस समूहगान म्हणून ‘सत्यं शिवं सुंदरा’ हे सुशीला चित्रपटातलं गाणं चाललं. साने गुरुजीचं ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे जवळपास सर्वांना पाठ. याच काळात ‘ए मालिक तेरे बंदे हम’ हे हिंदी गाणं एका सुरात यावं म्हणून मोठे प्रयत्न होत. १९८६ मध्ये ‘अंकुश’ चित्रपट आला आणि त्यातील ‘इतनी शक्ती हमे दे ना दाता’ हे गाणं म्हटलं जाऊ लागलं. तत्पूर्वी ‘गुड्डी’ चित्रपटातील ‘हम को मन की शक्ती देना’ हे गाणंही शिक्षकांनी शिकविण्याचा प्रयत्न केला होता. पण हे समूहाने गाण्यास जरा अवघड. आता ‘उंबंटु’ चित्रपटातील ‘हिच आमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे’ आणि ‘तू बुद्धी दे, तू तेज दे’ प्रार्थना हा परिपाठाचा भाग. काही गाणी बदलली गेली. काहींची नव्याने भर पडली. तसे फार बदल झाले असे नाही. मधल्या काळात सरकार जेव्हा फक्त पायाभूत सुविधांवरच भर देणारे नव्हते. तेव्हा शाळांमध्ये आनंददायी शिक्षणाचे प्रयोग वगैरे सुरू होते. तेव्हा माधव चव्हाण यांचं ‘चल शाळेला चल चल तारा’ हे गाणं शाळांमध्ये म्हटलं जात असे. या काळात घरातल्या लहान मुलास सांभाळण्यासाठी मोठ्या मुलीचं नाव शाळेत घातलं नाही तरी चालतं, अशी पालकांची मानसिकता होती. तेव्हा शाळेत ‘पणती जपून ठेवा, अंधार फार झाला’ हे गाणं म्हटलं जात असे. पुढे ‘तारा’ शाळेत येऊ लागली. परिस्थिती बदलली की गाणंही बदलतं. गाणं हे समूहमनाच्या अध्ययनाची पहिली पायरी. समूहातून अध्ययन होतं, हे कोणत्या टप्प्यावर कळालं असेल काय माहीत?
आपल्या आयुष्यातून शाळा काढून टाकल्या तर काय होईल? मुलास शिकवण्यासाठी पालकाला पुढाकार घ्यावा लागेल किंवा प्रत्येक मुलासाठी शिक्षक नेमावे लागतील. ‘होम स्कुलिंग’ नावाची एक संकल्पना काहीजणांनी स्वीकारली आहे. पण समूह शिक्षणाचं महत्त्व कायम आहे, कारण जगण्याची रीत कळते शाळेतून. परिपाठ त्याला शिस्त लावतो. ती शिस्त आयुष्यभर अंगीकारली जाते वगैरे हे खरं नाही. पण त्याचा परिणाम मात्र अनेक वर्षं असतो मनावर.
बचत गट स्थापन करणं राज्यात रुजवलं जात होतं तेव्हा स्वावलंबी गावाची संकल्पना सरकार राबवत होतं. गावात स्वयंरोजगार निर्माण व्हावेत, असे प्रयत्न होते. तेव्हा गावातील महिला ‘गावाचं गोकुळ होऊ द्यायचं, दूध नाही मथुरेला जाऊ द्यायचं’ हे गाणं म्हणायच्या. याच काळात सर्व शिक्षा अभियानाची ‘स्कूल चले हम’, ची जाहिरात येऊन गेली. साक्षरता अभियानाचा ‘पूरब से सूर्य उगा’ हे कविता कृष्णमूर्तीच्या आवाजातील गाणं मनाचा ठाव घेत होतं. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे दूरदर्शनवरचं गीत याच श्रेणीतलं. समूह मनाला प्रेरणा हव्या असतात आणि सहभाग वाढवायची गरज असते तेव्हा एक सकारात्मक गाणं लागतं. हे कधी कळलं असेल आपल्याला? उत्तर कदाचित वारीमध्ये असेल किंवा हरिपाठात. ‘हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा’ असं म्हणायला शिकवताना पुण्य पदरी पाडून घ्या असं सांगणाऱ्या पांडुरंगाच्या वारीत एक गेयता आहे. यातील तत्त्व मात्र सहभागित्वाचं.
पेरण्या करून देवाच्या भरवशावर पीक सोडायचं किंवा आता त्याची राखण तुझ्या चरणी रे विठ्ठला, असं म्हणायचं आणि वारीला निघायचं. पांडुरंगाचं नाव घेताना ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ असं म्हणत मैलोन् मैल चालणाऱ्या दिंडीत ‘रामकृष्ण हरी’चा गजर होतो तेव्हा त्यात कोणालाही सहज सामावून जाता येतं. या सामावून जाण्यासाठी रचली जाणारी कवनं किंवा रचना ही भक्तीची परमोच्च पायरी. ज्यांना कवनाची रचना येत नाही त्यांना सहभागी करून घेण्यासाठी टाळ आणि मृदंगाचा ठेका. तेही नसेल येत आनंदानं उडी मारता येते ना, मग ईश्वराचं नाव घेत ती तरी मार. ठेका धरता येतो ना, मग ते कर. फुगडी खेळता येते का, मग तो आनंदही घे ईश्वरसाक्षीने, असं सहभागाचं तत्त्व जपत भागवत धर्माची पताका तरी उंचावून बघ, हे सांगताना उत्सवात नाद भरून राहतो. कारण वारी हे पांडुरंगाचं समूहगान आहे. गेयता ही अशी वारीतून परिपाठात आली नसेल कशावरून? आपली लोकसंस्कृतीच लयीची, नादाची. म्हणूनच वारीमध्ये रामकृष्ण हरी म्हणत वीणा घेऊन चालणाऱ्या वीणेकराच्या पायावर डोकं ठेवायचं, ती भक्तीची लयकारी अंगी यावी म्हणून. परिपाठ समूहज्ञान देतो. समूहातील अध्ययन प्रक्रियेची ती पहिली पायरी असते. शिकण्यासाठी मनाची मशागत करण्याचा तो भाग मानला जातो. हरिपाठ जिथे सुरू होतो तिथं लय मिळते मनाला. स्वत:च्या आत डोकावून बघण्याची. अंतर्मुख होण्याची. गाणं हे सामूहिक संवेदन निर्माण करतं. सामूहिक जाणीव घडवतं. त्याच्या पुढच्या पायरीवर माणूस वारीत जातो. तो गर्दीचा भाग होत नाही. तो गर्दीत असतो. समूह नियम पाळतो. पण मन एकाग्र करतो तो पांडुरंगाचं नाव घेत. माउली, माउली एकमेकांना म्हणताना पुरुष जेव्हा स्त्री होतो, तेव्हा सुरू होते वारी. पैठणच्या नाथांनी वारीविषयी लिहिलं आहे.
‘करा करा लागपाठ, धरा पंढरीची वाट, पुंडलिकाची पेठ, सोपी आहे सर्वांची.’ वारी शब्दाचा अर्थ खेप. म्हणजे ठरावीक कालावधीमध्ये करण्याचे नित्य कर्म. आषाढी, कार्तिकी, माघी यापैकी एका शुद्ध एकादशीला गळ्यात तुळशीची माळ घालून नियमाने जो पंढरपूरला जातो तो वारकरी. हा फक्त भक्ती संप्रदाय. ईश्वरीप्रेमाची अनुभूती घेऊन जीवन समृद्ध करण्याचा सुलभ मार्ग सांगणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. योग आणि भोग याचे समाजातील तारतम्य राखण्याची जीवनशैली शिकण्यासाठी वारीत जाणारी मंडळी सहभागाचं एक नवतत्त्व शिकवत जात असतात.
दरवर्षी एकाच कालावधीमध्ये परिपाठ आणि हरिपाठ दोन्हीला सुरुवात होते. पाऊस सुरू होतो, त्याचं एक झिम्माड गाणं असतं भोवताली तेव्हा शाळांमध्ये किलबिल सुरू होते. नव्या पुस्तकाचा वास भरून राहिलेला असतो. पुस्तकांना कव्हरं घालून होतात. नाव टाकून शाळेत जाणाऱ्याच्या कानावर राष्ट्रगीत झालं की जी गाणी पडतात त्याचा परिणाम अनेक वर्षं असतो. वारीचा परिणामही वर्षभराचा. एकदा पांडुरंगाचं दर्शन घेतलं की वर्षभर बिनघोर, अशी धारणा आजही आहे. जगण्याचं सारं तत्त्वज्ञान समूहमनात असतं आणि त्याच वेळी अंतर्मुख होण्यातही असतं. वारी ही सामूहिक शहाणपणही देते आणि त्याच वेळी ती व्यक्तिगत ऊर्जास्थळांना बळही देत असावी, म्हणून ती टिकली. यातील आणखी एक बाब अधिक महत्त्वाची ती म्हणजे येथील व्यवहार वर्णव्यवस्थांना सहज फाटा देतात.
भजन करण्यासाठी आणि कीर्तन ऐकण्यासाठी जमणाऱ्या माणसाच्या मनाला दिलासा हवा असतो. प्रापंचिक दैनंदिनीपासून स्वत:साठीचा वेळ हवा असतो. म्हणजे आतमध्ये बघता यावे. आपण जे समूहात वागतो-बोलतो आहोत ते योग्य आहे का, हे तपासण्याचा पण तो भाग आहे. समूह मनाचं मोठेपण ज्यांना पटतं ती सारी माणसं मग सेवा करत राहतात. एखाद्याला वारीमध्ये चालणाऱ्याला जेवण द्यायचं असतं. कोणी तरी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करतो. अगदी स्वच्छतागृहाची सोय करण्यापासून ते चंद्रभागेच्या तीरी स्वच्छतेची मोहीम घेणाऱ्यांना आपली सेवा रुजू करायची असते. पण मनी तसा भाव लागतो. हरिपाठ किंवा परिपाठ म्हणायचा असो या दोन्ही क्रिया सातत्याच्या आहेत. चला हे तुम्ही शिकून घ्या, असं काही नसतं यात. पण तरीही शिकण्यासाठी मन तयार होतं. त्याला एक शिस्त लागते. एक शाळा अध्यात्माची असते. त्याला शिस्त लावण्याची शाळा म्हणजे वारी हे गावागावांत आणि मनात कधी रुजलं त्यालाही झाली शेकडो वर्षं. तसा वारीचा इतिहास ज्ञात नाही. पण पुंडलिकास जेव्हा पांडुरंग भेटला आणि त्याच्यासाठी तो पंढरपुरी आला तेव्हापासून ते ज्ञानेश्वरापर्यंतचा कालखंड असा वारकरी संप्रदायातील पहिला टप्पा मानला जातो. संत ज्ञानदेव ते नामदेव, भानुदास-एकनाथ ते तुकाराम आणि तुकारामोत्तर अशी विभागणी करून या संप्रदायाच्या साहित्याचा अभ्यास करणारी मंडळी आहेत. पण संत साहित्य अध्यात्मातील पुढची पायरी. पहिली पायरी वारी. यामुळे होतं काय याचं वर्णन नामदेवांनी केलं. ‘आजी महासुखे सृष्टी भरली भाग्यवंती, जालीसे विकृती पापतापा’. एकदा व्यक्ती समूहात गेली की विकृती जळते. एकमेकांपुढे मस्तक झुकतं. पुरुषालाही ‘माउली’ अशी हाक मारली जाते. जणू आईच्या प्रेमाचं भरतं येतं.
समूहातील जगण्याची रीत आणि शिस्त या दोन्हीसाठी परिपाठ आणि हरिपाठ आवश्यक मानायला हवा. सामूहिक प्रार्थना ही परंपरा केवळ एका धर्मापुरती नाही. एकत्र येऊन ईश्वराची आळवणी करतानाचं सहभागाचं तत्त्वज्ञान जगण्याची रीत ठरवत नेणारं असतं. हरिपाठ हा त्यातील दैनंदिन उपक्रम असला तरी त्यातून पुढे स्वत:चा शोध घेत काहीजण नवनिर्माणाच्या प्रक्रियेकडे जातात. त्यामुळे वारीतला अभंग आणि परिपाठातील प्रार्थना एका रेषेत उभी राहते तेव्हा समूहमन नवा आकार घेतं. प्रत्येकाच्या मनालाही एक रिंगण आखून द्यावं लागतं. वारी ते काम करते. मनाला वळण लावताना काही कृती समूहात कराव्या लागतात आणि काही व्यक्तिगत साधनेच्या. यातील समूह मनातल्या जातीपातीचा भेदाभेद नष्ट करणारा संप्रदाय आणि त्याचा सोहळा ज्या एकादशी दिवशी दिसतो, असतो तिथे हरिपाठ होतो.