पीयूष पांडे यांच्या निधनाने जाहिरात युगाच्या सुवर्णमय संक्रमणकाळाचा एक दुवा लोपला आहे. ‘ओगिल्व्ही अॅण्ड मेथर’ या जाहिरात संस्थेत १९८२ मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेल्या पांडे यांची कारकीर्द पुढे चित्रवाणीवरच्या जाहिरातींपर्यंत गेली. पण १९८० च्या दशकातल्या आरंभकाळातील जाहिराती या उत्पादनाचे नाव केंद्रस्थानी ठेवणाऱ्या होत्या. तो रेडिओवरल्या जिंगल्सचा जमाना होता. सहज कुणालाही गुणगुणता येईल अशी धून असेल आणि त्यात गुंफता येतील असे उत्पादनाचे शब्द आणि टॅगलाइन असली की पुरे. सोबत चांगले आकर्षक चित्र, छायाचित्र किंवा दृश्य असले की काम झाले, असे म्हणणारे जाहिरातदार होते. जाहिरात कंपनीकडे ‘ब्रीफ’ घेऊन येताना इतक्या आणि इतक्याच माफक अपेक्षा घेऊन येणाऱ्यांचा तो जमाना होता. त्या जमान्यापासून आत्तापर्यंतच्या कलात्मकतेला, दृश्यापेक्षा त्यातल्या संदेशाला महत्त्व देणाऱ्या आणि विक्रीपेक्षा ब्रँडिंगमध्ये रस असलेल्यांचा जमाना कसा येत गेला या संक्रमणाची कथा स्वत: पीयूष पांडे यांनीच त्यांच्या ‘पांडेमोनियम’ या पुस्तकातून दहा वर्षांपूर्वी सांगितली होती. त्या वेळी ‘लोकसत्ता बुकमार्क’ने या पुस्तकाची सविस्तर दखलही घेतली होती.
‘पांडेमोनियम’ म्हणजे उच्चरवात सुरू असणारा गोंधळ. वस्तू आणि सेवांच्या बाजारात या गोंधळातून वाट काढत नेमका आशय जाहिरातींद्वारे पोहोचवला कसा, याच्या काही कहाण्या सांगणाऱ्या पुस्तकाचे शीर्षक स्वत:च्या आडनावावर कोटी करणारे आहे. सहज वाचून होणाऱ्या या पुस्तकाचे स्वरूप ‘जाहिरातींमागच्या कथा’ असेच आणि एवढेच आहे. पांडे यांनी या आत्मपर पुस्तकातून भारतीय जाहिरात विश्वातील काही यशस्वी कथा सांगतानाच, त्या कथेमागच्या प्रेरणाही काही प्रमाणात वाचकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. जाहिराती कशा सुचतात, त्यामागे काय प्रेरणा असतात, या सामान्यांच्या कुतूहलाचे विषय ‘पांडेमोनियम’ मांडते, तसे जाहिरात विश्वाची संबंधित व्यक्तींना, विशेषत: तरुणाईला जनसंज्ञापनाची प्रक्रिया उलगडून सांगण्यातही काही प्रमाणात यशस्वी होते. ‘कम्युनिकेशन इज जनरलायझेशन’ (जनसंज्ञापन म्हणजेच साधारणीकरण) या पुस्तकात शिकलेल्या व्याख्येच्या जवळ जाणारे, या व्याख्येला जागणारे अनुभव पीयूष पांडे या पुस्तकातून सांगत जातात आणि त्यांनी केलेल्या जाहिरातींमागच्या कथा उलगडतात.
जाहिरात म्हणण्याऐवजी कॅम्पेन किंवा मोहीम म्हणायला हवे. कारण त्याच पद्धतीने ही सारी संज्ञापनाची प्रक्रिया पडद्यामागे सुरू असते. पीयूष पांडे हे अख्ख्या मोहिमेचा परिणाम कसा होईल, याच्या विचारात असत. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’सारखी दोन दशकांपूर्वी राष्ट्रीय एकात्मतेचा प्रत्यय देणारी किंवा ‘चलो पढायें, कुछ कर दिखायें’ सारखी राष्ट्रीय साक्षरतेची मोहीम असो वा अगदी अलीकडे गाजलेली व्होडाफोनच्या झू झूची मोहीम.. या गाजलेल्या, आंतरराष्ट्रीय पातळीवर वाखाणल्या गेलेल्या मोहिमांमागची कथा या पुस्तकातून उलगडते. जाहिरात संस्थेकडे आपले उत्पादन किंवा आपला संदेश घेऊन येणाऱ्या ग्राहकांविषयी पीयूष पांडे यांची मनमोकळी निरीक्षणे या पुस्तकात आहेत. काही ग्राहकांचे आलेले अनुभवही त्यातून उलगडतात. हे ग्राहक म्हणजे एशियन पेंट्स, पिडिलाइट, व्होडाफोन, युनिलिव्हर, कायनेटिक या ब्रॅण्ड्सचे उत्पादक!
जाहिरातीची कल्पना सुचणे, त्यामागची ती एक संकल्पनेची ओळ सापडणे हे सगळ्यात कल्पक काम. दूरचित्रवाणीवरच्या जाहिरातींचे वैशिष्ट्य म्हणजे २० ते ३० सेकंदांत परिणामकतेने उत्पादन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे आणि नुसते पोहोचवायचे नाही तर त्यांच्यावर त्याच उत्पादनाचा प्रभाव राहील, अशी कामगिरी करायची. हे निश्चितच अवघड काम. पण त्यासाठीच ही सारी मोहीम असते आणि त्याचा गाभा असतो.. एक छोटी टॅगलाइन.. संकल्पना स्पष्टपणे सांगणारी आणि प्रभाव पाडणारी एक ओळ. ‘ती ओळ मिळते आपल्या आसपासच्या माणसांबरोबरच्या संवादातून,’ हे स्पष्ट करणारे अनेक अनुभव पीयूष पांडे यांनी या पुस्तकात सांगितले आहेत. किंबहुना, जाहिरातींच्या या प्रेरणा कथनातूनच पीयूष पांडे या जाहिरातप्रभूचे आयुष्यही उलगडले आहे.
त्यांचे जयपूरमध्ये मोठ्या कुटुंबात गेलेले बालपण, आई- वडील, सात बहिणी आणि एक भाऊ या ११ जणांच्या लिप्ताळ्यात रमलेले दिवस खूप काही देऊन गेले. कुटुंबातील प्रत्येकाची काही ना काही विषयात खासीयत आहे आणि प्रत्येक बहीण आणि अर्थातच जाहिरात क्षेत्रातच असणारा धाकटा भाऊ प्रसून पांडे कसे वेळोवेळी कल्पना फुलवायला, माहिती द्यायला मदत करतात हे आवर्जून सांगताना पीयूष एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवतात – ‘‘आजकाल कुठल्याही गोष्टीसाठी इंटरनेट वापरणाऱ्या पिढीला हे असे कुटुंबातून मिळणारे ज्ञान किंवा समीक्षा नको असते. माझे कुटुंब आणि मित्रमंडळी हे माझे ‘पर्सनल गूगल’ आहेत. कारण गूगलपेक्षाही अनुभवाधारित, वैयक्तिक मत असलेली माहिती मला त्यांच्याकडून मिळते! जाहिरात क्षेत्रात किंवा कुठल्याही संज्ञापन व्यवसायात काम करणाऱ्यांना आपल्या आसपास परखडपणे व्यक्त होणारी खरी माणसे लागतात. हे प्रतिमतध्वनी-कारक ‘साउंडिंग बोर्ड्स’ प्रत्येकाने निवडायचे असतात. अशा परखड माणसांमुळे प्रत्यक्ष ग्राहकाकडे जाण्याआधी आपल्या जाहिरातीच्या कल्पनेबाबत अंदाज बांधता येतो.’’ – हा त्या निरीक्षणाचा गोषवारा.
या पुस्तकात अनेक उत्पादनांबाबतच्या जाहिरातींचा उल्लेख आला आहे. ती जाहिराती प्रक्रिया सुंदर पद्धतीने उलगडून सांगितली आहे. पण सगळ्यात उत्सुकता असते अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचार मोहिमेची. ही जाहिरात मोहीम अर्थातच वेगळी आणि प्रचंड यशस्वी. ही जाहिरात पांडे यांच्या संस्थेला मिळाली त्याअगोदर पांडे यांनी गुजरात पर्यटन विकास महामंडळासाठी जाहिराती केलेल्या होत्या. तेव्हा नरेंद्र मोदी यांनी किती मोठे ‘ब्रीफ’ दिले होते आणि शेवटी तुम्हाला यातून काय घ्यायचे ते घ्या असे स्वातंत्र्यही होते, हे पांडे सांगतात. भाजपच्या लोकसभा प्रचार मोहिमेतही ‘ब्रीफ’ स्पष्ट होते. नरेंद्र मोदी हे नाव. तेच अग्रस्थानी ठेवून सगळ्या जाहिराती केल्या गेल्या आणि प्रत्येक वेळी ‘टार्गेट ऑडियन्स’ लक्षात घेऊन त्यात कसे बदल केले गेले. हे वाचणे उत्सुकतेचे ठरते. फेवीकॉल का मजबूत जोड, चल मेरी लुनापासून असली स्वाद जिंदगी का, थोडी सी पेटपूजा, कभी भी कहीं भी, चुटकी में चिपकायें, अच्छे दिन आनेवाले है पर्यंत किंवा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हा सगळा प्रवासही त्यातील चढ-उतारापासून असाच अलगद उलगडतो.
‘पांडेमोनियम’मधून पांडेंचे क्रिकेटप्रेमही सतत जाणवत राहते. पीयूष पांडे हे रणजी खेळाडू. राजस्थानकडून खेळणारे. त्यांचे हे क्रिकेटप्रेम जाहिरातींमधूनही दिसते. कॅडबरी डेअरी मिल्कची.. ‘कुछ खास है हम सभी में’ असो किंवा अच्छे दिन आयेंगे मोहिमेतील सचेत (अॅनिमेटेड) जाहिरात असो.. या सगळ्यातून क्रिकेट दिसते आणि ते खपतेही.
जाहिरात क्षेत्रात सर्वोच्च स्थानी स्त्रिया का नाहीत, जाहिरात विश्वाचे भवितव्य, कशाला महत्त्व येणार वगैरे प्रश्नांची उत्तरे शोधू पाहणारे भागही या पुस्तकात आहेत. पण खरे तर हे पुस्तक म्हणजे पीयूष पांडे यांचे अनुभवाचे बोल… ते गेल्यानंतरही, आपल्याला साथ देत राहाणारे!
वरील मजकूर लोकसत्ता ‘बुकमार्क’मध्ये ७ नोव्हेंबर २०१५ रोजी अरुंधती जोशी यांनी लिहिलेल्या ‘जाहिरातप्रभूची विद्या’ या परीक्षणलेखावर आधारित आहे.
बुक–नेट:
बाल पुस्तकांनाही बुकर…
लेखनाचे आत्मचरित्र…
सुझन ऑर्लीन यांचे न्यू यॉर्करमधील दीर्घ अकथनात्मक लेखन दर लेखागणिक गाजतच आले. टिना ब्राऊन यांच्या वादग्रस्त संपादकीय कारकीर्दीपासून त्यांचे न्यू यॉर्करमधील लेखन ठळक झाले असले, तरी त्या आधी दशकभर व्होग, व्हिलेज व्हॉईसमध्ये लोकप्रिय बनल्या होत्या. आचार्य रजनीश यांनी अमेरिकेत रजनीशपूरम येथे स्थापन केलेल्या पंथावरील लेखापासून राष्ट्रीय पातळीवर ऑर्लीन यांचे नाव झाले. ‘ऑर्किड’ फुलाच्या चोरीबाबतचा त्यांचा लेख ग्रंथाचा विषय झाला. त्यावर ‘अॅॅडॅप्टेशन’ नावाचा चित्रपट निघाला, तो ऑर्लीन यांची भूमिका मेरील स्ट्रीप यांनी वठवल्याने गाजलाही. ‘बुकनेट’चा मुद्दा ‘जॉयराईड’ हे त्यांच्या चार दशकातील लिखाणावरचे नुकतेच प्रकाशित झालेले आत्मचरित्र. त्यानिमित्ताने मुलाखतींचा पाऊस वृत्त माध्यमांतून सुरू आहेच. त्याखेरीज ही याच आठवड्यात यूट्यूबवर उपलब्ध झालेली दीर्घ मुलाखत इथे ऐकता-पाहता येईल.
https:/ tinyurl.com/57ckzz6 z
सुरुवातीला फक्त राष्ट्रकुल देशांसाठी असलेल्या बुकरमध्ये अमेरिकेसह इतर इंग्रजीभाषक देशदेखील दशकापूर्वी सामावले. त्यानंतर इंटरनॅशनल बुकर पारितोषिक गेल्या दशकातच तयार झाले. (ज्यामुळे गीतांजली श्री आणि बानु मुश्ताक यांची ओळख भारतापलीकडे गेली.) आता यात नवी भर म्हणजे बाल पुस्तकांना देखील मुख्य पुरस्काराइतकीच ५० हजार पौंडांची रक्कम असेल. बुकर फाऊंडेशनने याबाबतची घोषणा नुकतीच केली असून यात काही प्रौढ मार्गदर्शकांसह निवड समितीवर बालवाचक असतील. याबाबतचे वृत्त येथे वाचता येईल.
https:// tinyurl. com/4 srvtdxb
बुकर मानांकितांच्या लेखनजागा…
खरेतर हा वाचण्याचा विषय नाही. तर फक्त पाहण्याचा. एखादे जगभरात गाजलेले पुस्तक लेखकाने कुठे लिहिले असेल याची वाचकांना कधीच कल्पना नसते, पण पुस्तकाशी नाते जडले तर मात्र त्याच्या मनात कुतूहल जरूर राहते. ‘वॉलपेपर डॉटकॉम’ हे साहित्यबाह्य विषयांवर मजकूर देणारे संकेतस्थळ. स्थापत्यशास्त्रापासून ते काय खाल, काय पाहाल किंवा प्रवास कुठे कराल, याची माहिती पुरवणारे. त्यांनी नुकताच एक उत्तम विषय निवडला. यंदाच्या बुकर पारितोषिकासाठी (दीर्घयादीत) नामांकन असलेल्या १२ कादंबरीकारांच्या लेखनजागांची छायाचित्रे दिली. कुणी स्वयंपाक घरात लिहिते, तर कुणी बागेतल्या बाकड्यावर. कुणी अफाट पसाऱ्यात तर कुणी आटोपशीर टेबलावर. त्यामुळेच इथे, किरण देसाईंपासून डेव्हिड सलॉय यांच्यापर्यंत अनेकांच्या लेखन करण्याच्या जागा पाहणे गमतिशीर आहे.
https:// tinyurl. com/ ydrhstzn
