scorecardresearch

Premium

उलटा चष्मा : ..आणि बारसे!

आपणच देशभर रूढ केलेला ‘पन्नाप्रमुख’ हा शब्द या दलात राहिला तरी हरकत नाही असे त्यांनी म्हणताच तणाव निवळला.

Ulta-Chashma
प्रातिनिधिक छायाचित्र

सकाळचा नियमित व्यायाम करून आवारातील मोरांसोबत ते बागडत असतानाच पक्षाच्या नामांतर सेलचे शिष्टमंडळ नौदलातील अधिकाऱ्यांच्या पर्यायी हुद्दय़ांची यादी घेऊन आल्याचा निरोप विश्वगुरूंना मिळाला तसे ते आनंदले. आपल्या नामांतर वेगाशी या सेलने चांगलेच जुळवून घेतलेले दिसते असा शेरा मनातल्या मनात मारत ते बैठकीच्या खोलीत शिरले. सेलप्रमुखाने हुद्दय़ांची नवी नामावली वाचायला सुरुवात केली. सबलेफ्टनंटला आपण नवलकिशोर म्हणू असे म्हणताच गुरूंचा चेहरा त्रासिक झाला. ‘हे किशोर काय? अधिकारी काय पौगंडावस्थेतील असतात का? त्यापेक्षा त्याला ‘सहशौर्यकार्यवाह’ असे नाव द्या.’ हे ऐकताच प्रमुखाने लगेच तशी दुरुस्ती केली. यादीत लेफ्टनंटला प्रबलकिशोर असे नमूद होते, पण त्याने लगेच ‘शौर्यकार्यवाह’ असा शब्द उच्चारला. मग लेफ्टनंट कमांडरसाठी त्याने धाडस करून ‘अटलकिशोर’ असे नाव सुचवताच गुरू थबकले. म्हणाले, ‘अटलजलप्रेरक’. यातला अटल हा शब्द कायम राहिल्याचे लक्षात येताच प्रमुखाने देवाचे आभार मानले. मग कमांडरसाठी सारथी हा हुद्दा सुचवला गेला. गुरू म्हणाले, ‘ही नावे तुम्ही तयार केलीत, की समाजमाध्यमांमधून चोरलीत?’ सर्वांच्या माना खाली गेल्या. ‘आपला पक्ष प्रतिभावानांचा’ असा टोला मारत त्यांनी ‘जलमार्गदर्शक’ असे नामकरण केले.

हेही वाचा >>> चतु:सूत्र : ते जिगरबाज आहेत, पण..

Ajay baraskar on Manoj Jarange Patil
“मनोज जरांगे आधी बाण सोडतो आणि मग…”, अजय बारसकरांची पुन्हा टीका; म्हणाले, “कालचा तमाशा…”
Narendra Modi and Rahul Gandhi
“वाराणसीत तरुणांना नशेत नाचताना पाहिलं”, राहुल गांधीच्या टीकेवर मोदींचा पलटवार; म्हणाले, “जे स्वतः…”
Vijay Wadettivars reaction to Ashok Chavan join BJP
चव्हाणांच्या पक्षांतरावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “एक व्यक्ती गेला म्हणजे…”
Mallikarjun Kharge
राज्यसभेतील मोदींच्या भाषणावर मल्लिकार्जुन खरगेंचं चोख प्रत्युत्तर; सांगितला NDA चा फुल फॉर्म!

नंतर कॅप्टनसाठी ‘साथियों का सारथी’ असे भीतभीतच एकाने सुचवले. हरकत घेत गुरूंनी ‘जलमार्ग अधिपती’ असा शब्द सुचवला व देशाच्या विकासरथाचा एकमेव सारथी कोण हे तुम्हाला ठाऊक असायला हवे, असे जोरात सुनावले. मग त्यांनी कमोडोर ‘जलपन्नाप्रमुख’ सुचवताच गुरू हसले. आपणच देशभर रूढ केलेला ‘पन्नाप्रमुख’ हा शब्द या दलात राहिला तरी हरकत नाही असे त्यांनी म्हणताच तणाव निवळला. रिअर अ‍ॅडमिरल पदासाठी वामवर्ती जलरथ प्रभारी असा पर्याय ऐकताच गुरू भडकले. ‘‘वाम’ शब्द देशातूनच हद्दपार करायचा वसा आपण घेतलेला हे तुम्हाला ठाऊक नाही काय?’ हे ऐकून प्रमुखाला घाम फुटला. दुर्लक्ष करत गुरूंनी ‘पयोधीरथप्रभारी’ असा हुद्दा सुचवताच शिष्टमंडळ त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागले. त्यातला एक हळूच म्हणाला, ‘पयोधी’ कुणाला समजणार नाही. त्यावर गुरू म्हणाले, ‘भक्त व कुजबुज यंत्रणेला कामाला लावा, दोन दिवसांत पयोधी म्हणजे सागर हे देशभर पोहोचेल.’ तशी नोंद करून घेत प्रमुखाने व्हाइस अ‍ॅडमिरलसाठी ‘उडीची जलरथ प्रभारी’ असे सुचवताच हे ‘उडीची’ काय असे म्हणत त्यांनी हरकत घेतली व ‘जलरथ अधिपती’ असा सोपा हुद्दा ठेवण्याचे निर्देश दिले. मग अ‍ॅडमिरलसाठी उच्च जलरथ प्रभारी असे नाव समोर येताच ते पुन्हा नाराज झाले. हे प्रभारी वारंवार नको. त्यापेक्षा ‘मकरालय अधिपती’ असे ठेवा. त्यात एक प्रकारचा रुबाब दिसतो. मग तशी नोंद केली गेली. सर्वात शेवटी अ‍ॅडमिरल ऑफ द फ्लीटसाठी ‘उच्चों के उच्चतर जलरथ प्रमुख’ असा हुद्दा समोर येताच गुरू चिडले. ‘अरे, ज्या महाराजांचा उदोउदो करून ही हुद्दाबदलाची घोषणा केली त्यांच्या आरमारातील एखादे पद तरी आता कायम ठेवाल की नाही? त्यांच्या स्मरणार्थ या पदाला ‘जलसरसेनापती’ असे नाव द्या व विषय संपवा आणि भविष्यात माझ्याकडे येताना उलचेगिरीपेक्षा अभ्यास करून येत जा.’ हे ऐकून सेलचे शिष्टमंडळ समाधानाचा मोठा सुस्कारा सोडत बाहेर पडले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm narendra modi renaming of ranks in indian navy pm modi announcing change of navy epaulettes zws

First published on: 07-12-2023 at 04:36 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×