महेश सरलष्कर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या शतकपूर्तीनिमित्त वेगवेगळे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. त्यातून त्यांनी स्वत:चे कौतुक करून घेतले असावे असे काहींना वाटू शकते..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या लोकसंवादाच्या कार्यक्रमाचे रविवारी शतक पूर्ण झाले. त्यानिमित्ताने किमान तीन पाहणी अहवालांतून तरी ‘मन की बात’च्या योगदानाबद्दल सकारात्मक सूर निघाला आहे. ‘आयआयएम-रोहतक’, ‘आयआयएमसी’ तसेच, ‘बिल अँड मेिलदा गेट्स फाऊंडेशन’ या संस्थांच्या अहवालांनी ‘मन की बात’चे कौतुक केले आहे. या तीनपैकी दोन अहवाल ‘प्रसार भारती’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध केले गेले.
‘आयआयएम-रोहतक’च्या अहवालातील निरीक्षणांनुसार ‘मन की बात’ १०० कोटी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यापैकी २३ कोटी लोक नियमित हा कार्यक्रम ऐकतात. श्रोत्यांपैकी ६० टक्के १९-२५ वयोगटातील तरुण आहेत. ९६ टक्के लोकांना ‘मन की बात’विषयी माहिती आहे. ‘मन की बात’मुळे लोकांचे मोदींशी भावनिक नाते निर्माण झाले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६० टक्के उत्तरदात्यांना हा कार्यक्रम ऐकल्यानंतर देशउभारणीच्या कामामध्ये सहभागी झाले पाहिजे असे वाटू लागले. ५५ टक्क्यांनी जबाबदार नागरिक झाल्याचे सांगितले. ६३ टक्के लोकांचा मोदी सरकारकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला, मोदी सरकारवरील विश्वास वाढल्याचे ५९ टक्के लोकांनी सांगितले. नागरिकांचे जीवनमान सुधारल्याचे ५८ टक्के लोकांना वाटले. सरकारची कार्यपद्धती व देशाच्या प्रगतीबाबत आशावादी झाल्याचे ७३ टक्के लोकांचे म्हणणे होते.
‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन’ने विविध ११६ प्रसारमाध्यम कंपन्यांतील पत्रकार, विद्यार्थी, अध्यापक, संशोधक अशा ८९० लोकांशी बोलून अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, ७६ टक्के जणांच्या मते ‘मन की बात’मुळे खऱ्या भारताची लोकांना ओळख झाली. या ८९० जणांच्या सर्वेक्षणातील ६६ टक्के उत्तरदाते १८-२५ वयोगटातील होते. ‘मन की बात’ ऐकणे म्हणजे लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणे अशी भावना ७६ टक्के उत्तरदात्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमामध्ये विविध विषयांचा ऊहापोह झाला असून ४० टक्के लोकांच्या मते शिक्षणावरील मुद्दे तर, २६ टक्के लोकांना ग्रामीण भागांतील संशोधनांवरील चर्चा अधिक प्रभावी वाटली. एखाद्या वेळी मोदींची ‘मन की बात’ ऐकता आली नाही तर, यापैकी ६३ टक्के लोकांनी ‘यू टय़ूब’वर नंतर हा कार्यक्रम ऐकला.
‘अॅक्सिस माय इंडिया’, ‘बिल अँड मेलिंदा गेट्स फाऊंडेशन’ आणि ‘इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्पिटेटिव्हनेस’ या तीन संस्थांनी मिळून केलेल्या अहवालामध्ये ‘मन की बात’ने जनआंदोलन उभे केले असून सामाजिक कार्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण केले आहे, असे म्हटले आहे. तसेच, विकासाला गती दिली गेली असेही अनुमान काढले आहे. ५०-७० वर्षांनंतर रेडिओवर इतका प्रभावी कार्यक्रम झाला असून यापूर्वी अमेरिकेचे पूर्वाध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट रेडिओ कार्यक्रमाद्वारे लोकांशी संवाद साधण्यात यशस्वी झाले होते. स्वच्छता मोहीम असो वा लसीकरण; यापूर्वी कधीही समाजामध्ये प्रचंड परिवर्तन पाहायला मिळाले नव्हते, असे या अहवालाचे म्हणणे आहे.
लोकांचा वर्षभरातील वेगळा कल
‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलिपग सोसायटीज’ (सीएसडीएस) या सर्वेक्षणाधारित संशोधन संस्थेने ‘मीडिया इन इंडिया- अॅक्सेस, प्रॅक्टिसेस, कन्सर्न्स अँड इफेक्टस’ नावाचा पाहणी अहवाल नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये ‘मन की बात’ या कार्यक्रमासंदर्भातील पाहणीतील निरीक्षणेही देण्यात आली आहेत. त्यानुसार, गेल्या वर्षभरात देशातील पाचपैकी तीन लोक हा कार्यक्रम ऐकत नसल्याचे आढळले. देशभरात ‘मन की बात’चा श्रोतावर्ग अत्यंत कमी झाला. मोदी हिंदीमध्ये बोलत असल्यामुळे कदाचित दक्षिण भारतातील श्रोत्यांची संख्या कमी असावी. हिंदी पट्टय़ातदेखील हा कार्यक्रम कमी लोकांनी ऐकला. दरमहा नियमितपणे हा कार्यक्रम ऐकणारे श्रोते फक्त ५ टक्के होते. फक्त एकदा वा दोनदा हा कार्यक्रम ऐकणाऱ्यांची संख्या २१ टक्के होती. देशातील ६२ टक्के लोकांनी वर्षभरात मोदींची ‘मन की बात’ एकदाही ऐकलेली नाही. वायव्य व ईशान्य भारतात ६३ टक्के लोकांनी हा कार्यक्रम एकदाही ऐकला नाही. दक्षिणेमध्ये हे प्रमाण ७५ टक्के होते. बिगरहिंदी भाषक राज्यांमध्ये हे प्रमाण ६२ टक्के होते. संपूर्ण उत्तर भारतात ५४ टक्के, तर हिंदी भाषक राज्यांत किमान ५० टक्के लोकांनी वर्षभरात एकदाही ‘मन की बात’ ऐकलेला नाही. इतर सर्वेक्षणांपेक्षा ‘सीएसडीएस’ची निरीक्षणे वेगळी आहेत.
बिगरराजकीय बात?
‘मन की बात’च्या शतकपूर्तीनिमित्त दिल्लीत राष्ट्रीय परिषद भरवण्यात आली होती. या कार्यक्रमातून ‘मन की बात’ला भरपूर प्रसिद्धी मिळाली. तिथे उपस्थित पाहुण्यांनी या कार्यक्रमाचे प्रचंड कौतुक केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी केले; तर समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. धनखड म्हणाले की, मी ‘मन की बात’चा प्रत्येक कार्यक्रम ऐकला आहे. ‘मन की बात’ने लोकांमध्ये राष्ट्रवाद जागृत केला, लोकांना आपल्या अधिकारांची जाणीव झाली. या कार्यक्रमाने देशात सामाजिक क्रांती घडवून आणली. देशात निराशा पसरली होती, भविष्य अंधारमय झाले होते, तेव्हा ‘मन की बात’ने आशेचा किरण दाखवला. करोनासारख्या महासंकटात ‘मन की बात’ने लोकांना वाट दाखवली. कोणत्याही दबावाविना जनतेचा कर्फ्यू लागू करता आला! या कार्यक्रमामध्ये धनखड यांनी मोदींवर खूप स्तुतिसुमने उधळली. अमित शहा म्हणाले की, करोना काळात केंद्राने घेतलेल्या निर्णयांची विरोधकांनी खिल्ली उडवली, पण साथीबद्दल ‘मन की बात’मधून लोकजागृती झाली. दिवे लावणे, थाळी वाजवणे या कृतींतून करोनायोद्धांचा सन्मान केला गेला. करोनाविरोधात लढण्याची मानसिकता निर्माण झाली. अन्य देशांतील सरकारांनी करोनाविरोधात लढाई लढली. भारतात मात्र १३० कोटी जनतेने ही लढाई लढली. त्यामध्ये ‘मन की बात’चे योगदान मोठे आहे.
शहा व धनखड यांच्या म्हणण्यानुसार, ‘मन की बात’ पूर्णपणे बिगरराजकीय राहिलेली आहे. मोदींनी या कार्यक्रमाचा राजकारणासाठी वापर केला नाही. या दोघांचे म्हणणे खरे असू शकते. पण, असा कार्यक्रम सुरू करणे ही राजकीय कृती असू शकते का, याचा विचार करता येऊ शकेल.
लोकसभा निवडणुकीकडे लक्ष
इथे उल्लेख केलेले चारपैकी तीन अहवाल ‘मन की बात’ची स्तुती करणारे आहेत. ते मोदी व भाजप समर्थकांना आवडू शकतील, त्याचा ते प्रचार करू शकतील. ‘सीएसडीएस’मधील निरीक्षणे कदाचित भाजप विरोधकांना पसंत पडतील. आपापल्या वैचारिक बांधिलकीनुसार या अहवालांकडे पाहिले जाऊ शकेल. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जेमतेम दहा महिन्यांचा कालावधी उरलेला आहे. अशा वेळी ‘मन की बात’सारख्या कार्यक्रमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज भाजपला वाटू शकते. त्यासाठी आकाशवाणीच्या एफएमच्या विस्ताराची प्रक्रियाही सुरू झाली आहे. १८ राज्यांतील दोन कोटी अतिरिक्त लोकांपर्यंत एफएम रेडिओची सेवा पुरवण्यात आली आहे. म्हणजे ‘मन की बात’ कार्यक्रमही आणखी लोकांपर्यंत पोहोचेल.
‘मन की बात’मध्ये राजकीय मुद्दय़ांवर चर्चा होत नसली तरी, भाजपसाठी लोकांच्या मनात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. गेल्या नऊ वर्षांमध्ये मोदींनी तसा प्रयत्न केलेला आहे. बाकी; लोक आपापल्या ‘मन की बात’चा विचार करू शकतील.
mahesh.sarlashkar@expressindia.com