स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई व उपनगरात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती रुजविण्याचे ऐतिहासिक कार्य ‘मुंबई मराठी साहित्य संघा’ने केले. या संस्थेची सुरुवातच मुळी ‘मुंबई व उपनगर मराठी साहित्य संमेलन’ (१९३४) आयोजनाने झाली. २९ जुलै, १९३५ला संस्थेची स्थापना झाली. संस्थेच्या आठव्या ‘मुंबई व उपनगर मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते. हे संमेलन १५ ते १७ डिसेंबर, १९४४ या कालावधीत विल्सन हायस्कूल, गिरगाव, मुंबई येथे झाले. तर्कतीर्थांचे या संमेलनातील अध्यक्षीय भाषण विचारप्रवण ठरल्याने त्यास मोठी प्रसिद्धी लाभली होती.
या भाषणाचा सारांश तर्कतीर्थांच्याच शब्दांत असा- ‘‘आपण भारतीयांनी ज्या एका नव्या जागतिक परिस्थितीत आणि सामाजिक अवस्थेत प्रवेश केला आहे, त्या परिस्थितीत आणि अवस्थेत नव्या विचारतत्त्वांची आवश्यकता आहे. नव्या परिस्थितीचा अर्थ नव्या विचारतत्त्वांशिवाय ज्ञात होऊ शकत नाही. विचारतत्त्वे नित्य बदलत्या जगाचा अर्थ समजून घेण्याकरिता मनुष्याच्या मनाने घडविलेली असतात. आज आपणास आपल्या आजपर्यंतच्या वैचारिक पद्धतीची संपूर्ण समीक्षा करून नवी घडण करण्याची आवश्यकता आहे. आणि भावना हे त्याचे साधन नसून, बुद्धी हेच त्याचे साधन आहे. भावना बुद्धीच्या साहाय्यावाचून अधोगतीला नेतात आणि बुद्धी त्या भावनांची शुद्धी करून उच्चतर कर्तृत्वाला प्रसवते.
वाङ्मय किंवा कला जेव्हा युगप्रवर्तक रूप धारण करतात, तेव्हा त्या जीवनातील नवनव्या अनुभूती आणि नवनवे प्रयत्न यांचे सुंदर दर्शन करून देत असतात. जीवनाचे तत्त्वज्ञान हे उच्च वाङ्मय व कला यांचे रहस्य असते, असे उच्च कलेचा आणि उच्च वाङ्मयाचा इतिहास उच्चरवाने आपणास सांगत आहे. वृत्तपत्रीय वाङ्मय जीवनाच्या झगड्याच्या आघाडीला उभे आहे. ते वाङ्मय विचारस्वातंत्र्याचे धुरीणत्व पत्करून आपल्याला बदलत्या जगाचे यथार्थ दर्शन करून देण्यास समर्थ व्हावयास पाहिजे.
या सगळ्या मुद्द्यांचे विचारस्वातंत्र्य हेच अधिष्ठान होय. विचारस्वातंत्र्याशिवाय ज्ञानाची व कर्तृत्वाची वाढच होऊ शकत नाही. ज्ञानाचा व मानवी कर्तृत्वाचा इतिहास असे शिकवीत आहे की, जेव्हा जेव्हा मागच्या युगांमध्ये मनुष्याला विचारस्वातंत्र्याचा लाभ झाला, तेव्हाच त्याला आध्यात्मिक व भौतिक क्षेत्रांत श्रेयस व संस्कृती यांची घडण करता आली. ज्या ज्या युगामध्ये विचारस्वातंत्र्याला पायबंद बसला व कर्तृत्वाला बंधने निर्माण झाली, तेव्हा तेव्हा ज्ञान मंदावले व संस्कृती थिजली आणि विकृत झाली. हिंदुस्थानची सगळी सुंदर व थोर संस्कृती विचारस्वातंत्र्याच्या वातावरणातच जन्मली व वाढली. शब्दप्रामाण्य व श्रद्धा यांचे युग म्हणजे बुद्धी बंधनात पडण्याचे युग होय. ते आले तेव्हा हिंदी संस्कृतीचा दौर्बल्याचा इतिहास सुरू झाला. तो इतिहास आपण संपवला पाहिजे. अजून शब्दप्रामाण्य, श्रद्धा आणि वरिष्ठांचे नेतृत्व यांचा आपल्या मनावर पगडा आहे. त्यामुळे आपल्या कर्तृत्वावरची जाचक व प्राणरोधक बंधने अधिक दृढ होण्याचा संभव आहे. आपणास भविष्यकाळ आहे काय? आहे, असे गर्जून सांगावयाचे झाल्यास विचारस्वातंत्र्याची व बुद्धिवादाची ध्वजा उभारली पाहिजे.
साहित्य संमेलने आणि साहित्यपत्रिका ज्ञानमार्गाचे रक्षण करणाऱ्या शिलेदारांच्या संस्था आहेत. ज्ञानमार्गावर आक्रमण करणारे वाटमारे आणि पुंड पाळेगार यांचा बंदोबस्त करणे हेच या संस्थांचे कर्तव्य आहे. विशिष्ट संप्रदाय, विशिष्ट तत्त्वज्ञान, विशिष्ट राजकीय पंथ इत्यादिकांपासून अलिप्त राहून केवळ वैचारिक संस्कृतीची सर्वांगीण उन्नती होण्यास आवश्यक अशी खबरदारी घेण्याचे काम अशा संस्थांनी करावयाचे असते.’’
तर्कतीर्थांचे हे भाषण विचार आणि प्रतिभा यांचा सुंदर संगम होय. यापूर्वीच्या भाषणांप्रमाणेच हे भाषण शब्दसौंदर्य, सुभाषितांचा फुलोरा व सूत्रमय विधानांची आतषबाजी यांनी समृद्ध आहे. ‘ज्या विचारांच्या सत्यत्वाला आतल्या आवाजाशिवाय दुसरे प्रमाण नाही, ते विचार स्वीकारणे बौद्धिक दौर्बल्याचे चिन्ह आहे,’ अशी सुविचारपर वाक्ये या भाषणात जागोजागी आढळतात. अशी त्यांची व्याख्याने मैफलीतल्या गाण्यांपेक्षा कमी श्रवणीय नसत. ती पर्वणी ठरत असे. हुकमी वक्तृत्व हा तर्कतीर्थांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता, त्याची साक्ष हे भाषाणही देते.
drsklawate@gmail.com
