scorecardresearch

Premium

चिंतनधारा: आदर्श जीवनाचे यथार्थ स्वरूप

उच्च विचारसरणी व लहानापासून थोरापर्यंत सर्वाशी मोकळय़ा मनाने वागण्याची धाटणीही तशीच सुंदर आहे

rashtrasant tukdoji maharaj
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राजेश बोबडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कोणत्याही सद्गृहस्थाला ‘आदर्श’ हे विशेषण लावावयाचे झाले तर त्याचे अंगी समभावना, लोकोपयोगिता, राष्ट्रीय मनोवृत्ती व समाजजागृतीची शक्ती असावयास पाहिजे. तसे नसेल तर तो ‘आदर्श’ ठरूच शकणार नाही. असा पोकळ आदर्श लवकरच लोकटीकेला पात्र होणार! अशांना जनता स्वार्थलोभी, दांभिक इत्यादी सार्थ पदव्या देत आली आहे. आदर्श हा शब्द गुणाच्या उत्कर्षांशी निगडित आहे. उदाहरणार्थ, कुणी म्हणतो- ‘काय हो, किती आदर्श माणूस आहे हा!’ आणि लगेच त्याचे गुण सांगायला सुरुवात करतो – ‘पाहा, त्याचा सर्व वेळ उत्तम कार्यात गुंतलेला असतो. त्याच्या बोलण्याने कितीतरी लोकांचे कल्याण झाले आहे. त्याच्या वागण्यामुळे लोकांना पूर्वीच्या सज्जनांचे स्मरण होते. आपल्याप्रमाणेच आपल्या गावातील लोक नेहमी सुखात असावेत म्हणून तो झटतो व त्यामुळेच कोणालाही तो नकोसा वाटत नाही. सदा त्याची वृत्ती समाजधारणी व सेवाकारणी रंगलेली असते. उच्च विचारसरणी व लहानापासून थोरापर्यंत सर्वाशी मोकळय़ा मनाने वागण्याची धाटणीही तशीच सुंदर आहे. याला म्हणतात आदर्श पुरुष! काहीजण तर आपणाला आदर्श म्हणवून घेण्यासाठी कितीतरी पैसा खर्च करतात; प्रतिमासंवर्धन करतात पण कावळय़ाला मोराची पिसे लावून थोडेच भागते? मूळचे डोळस पंख असतील तरच ते शोभतील, टिकतील ना?’’

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!

आदर्शाची ही कल्पना सर्वापुढे असूनही, खरे आदर्श पुरुष बोटांवर मोजण्याइतकेसुद्धा का दिसून येत नाहीत ? महाराज म्हणतात, याचे कारण हेच आहे की लोक दुसऱ्याची चर्चा करताना जेवढे शहाणे दिसतात तेवढे स्वत:चे दोष मात्र पाहू शकत नाहीत. प्रत्येकाच्या दृष्टीसमोर अशी एक अंधारी पडलेली असते की जिच्यामुळे आपणाला सोडूनच सर्व तऱ्हेच्या बरेवाईटपणाची छाननी त्यांना करावीशी वाटते. आणि असे केल्यानेच आपला मोठेपणा सिद्ध होतो व हीच आपली आदर्शता आहे अशी बऱ्याच लोकांची समज असल्याचेही मी पाहिले आहे. बोलताना मात्र सर्वजण अशीच उत्तम शिकवण देतात की, असे असावे नि तसे असावे; असे बोलावे नि तसे वागावे; पण हे सर्व स्वत:ला वगळून जगासाठी आहे असेच ते समजतात. आणि लोक मात्र त्यांचे हे बोलणे ऐकताना ऐकण्यात गुंतण्याऐवजी तो वागतो कसा हेच प्रामुख्याने पाहतात. परंतु नवल हे की हे बघणारेसुद्धा आपणाला विसरूनच बघत असतात व त्यातील उत्तम गुण घेण्याऐवजी वाईट तेवढे उचलून त्याला आपला आवडता विषय करून घेतात. त्यातही जो जास्त स्पष्टवक्ता – तोंडफोड ऊर्फ उद्धटपणाने समाजात बोलणारा असतो तो पुढारी ठरतो आणि जे खासगीत गुणगुणतात ते प्रचारक शिपाईगडी ठरतात. आता यांच्याशिवाय जे शिल्लक राहिले आहेत, की जे बोलतात तसेच वागतात, ते या सर्वाच्या मते पागल, भोळसट व समाजाला मागे ओढणारे ठरतात. कदाचित् अशांना ते अवतारही म्हणतील पण त्यांचे गुण घेण्याइतकी किंमत मात्र ते कधीच देणार नाहीत.

rajesh772@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rashtrasant tukdoji maharaj lecture on ideal life zws

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×