राजेश बोबडे

कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यात झालेला संवाद उद्धृत करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘अर्जुन आप्तेष्टांसोबत युद्ध टाळण्यासाठी देत असलेल्या सबबी श्रीकृष्णाला उचित वाटल्या नाहीत. त्याने जाणले की, हा युक्तिवाद मोहाची देणगी आहे! मोहवश होऊन, किंकर्तव्यमूढ होऊन कर्मत्याग व भक्ती केल्याने उद्धार होऊ शकत नाही. कटुकर्तव्याला भिऊन मागे फिरणे हा पुरुषार्थ नव्हे. हिंसा, अहिंसाच कार्याची कसोटी असू शकत नाही, त्यात उद्देश (हेतू) व परिणाम यांचा विचार असलाच पाहिजे. क्षत्रिय धर्म विश्वात सत्याचे रक्षण करण्यासाठीच नियोजित केला गेला आहे. दुष्टांचा अपरिहार्य स्थितीत संहार करणे ही हिंसा होऊ शकत नाही, कारण त्यात विश्वहिताचाच उद्देश असतो व संभाव्य हिंसा रोखण्याचाच तो उपाय ठरतो. यासाठी, व्यक्तिगत स्वार्थासाठी नव्हे तर निष्काम भावनेने, विश्वहिताच्या व सत्यप्रस्थापनेच्या दृष्टीने लढणे हेच धर्मकार्य आहे.’’

‘‘जगाला नंदनवन बनवण्यासाठी वीरत्वाने संघटित होणे आणि आपले प्रत्येक कर्म हे जगाच्या कल्याणाच्या हेतूने लोकसेवेत वाहणे यातच खरी भक्ती सामावलेली असू शकते. वेदांत हा विषय व्यवहाराचा नाशक नसून तो व्यवहारात खरी जीवनदृष्टी देणारा, केवळ सत्य तत्त्वासाठी कसे जगावे व कसे वागावे हे शिकविणारा विषय आहे. वेदांत म्हणजे खरी जीवनकला! कोणताही कर्मबंध न लागू देता कर्म कसे करावे व कर्मानेच कर्मातीत होऊन आत्मानंद कसा लुटावा हे दर्शविणारे होकायंत्र म्हणजे वेदांत! हाच सिद्धांत दृष्टीपुढे ठेवून श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनसंग्रामास प्रवृत्त केले! समाजहिताची दूरदृष्टीच त्यात भगवंतांनी जागृत केली आणि आपल्या सेवामय जीवनाचे कोडे उलगडून दाखविले.’’

याप्रमाणे ‘योगेश्वराचे जीवनसंगीत’ म्हणून गीतेकडे पाहता येईल व स्वत:चे जीवन तसे बनविण्यातच गीतेचे खऱ्या अर्थाने अध्ययन केले, असे म्हणता येईल. अन्यायी लोकांनी जनतेला पिळावे आणि भोळय़ा जनतेने धर्माच्या नावाखाली अन्याय सहन करण्याचा दुबळेपणा अंगीकारावा, ही स्थिती अत्यंत वाईट होय. असा प्रसंग जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा गीता ही त्यातून वाट काढण्यास पूर्ण साहाय्यक ठरू शकते, कारण ते क्रांतिकारक असे अमर तत्त्वज्ञान आहे. अन्याय करणारा बाप असो की गुरू, त्याला शासन करणे हाच धर्म गीतेने शिकविला आहे. सामोपचाराचे सर्व प्रयत्न थकल्यावर करावे लागणारे ‘युद्ध’ हे पाप समजून मागे हटणे उचित नव्हे. परंतु हे परिवर्तन स्वत:साठी- स्वत:च्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक सुखासाठी जो करील त्याला ते बंधनास कारण होईल आणि समाजहिताच्या दृष्टीने करील तो अलिप्त राहील, हाच गीतेचा आदेश आहे. सेवेसाठी, केवळ सत्यस्थापनेसाठी केले जाणारे कर्म हाच खरा यज्ञ, खरा धर्म व हीच खरी भक्ती होय, यात संदेह नाही. महाराज ग्रामगीतेत म्हणतात,

गीतेने यर्थाथ ज्ञान दिले।

तरि ते जनमनाने नाही घेतले।

रुढींच्या प्रवाही वाहू लागले।

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विसरले सर्वभूतहित।।rajesh772@gmail.com