राजेश बोबडे

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे।

दे वरचि असा दे ।।

हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे

जातीभाव विसरुनिया एक हो आम्ही

अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी,

दे वरचि असा दे।

या आपल्या लोकप्रिय  भजनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देशातील जातीभेदांच्या भिंती हटविण्याचे अविरत कार्य केले. अस्पृश्यतेला शास्त्रात काही आधार आहे काय, असा प्रश्न तुकडोजी महाराजांना एका चिकित्सकाने केल्यावर महाराज म्हणतात, ‘‘स्पृश्य हे सारे सुसंस्कारी आणि अस्पृश्य हे कुसंस्कारी आहेत, असे मुळीच नाही. समाजाने अजाणपणाने बहिष्कृत केले, म्हणून वंशच नीच ठरवायचा हा अन्याय आहे.’’

‘‘उच्च जातीचा म्हणवणारा माणूस व्यसनी, व्यभिचारी, दुराचारी असेल तर त्याचा स्पर्शही टाळावा आणि खालच्या जातीत जन्मलेला माणूस सदाचारी-सुविचारी असेल तर त्याला खुशाल आपल्यात मिळवून घ्यावे, हीच माझ्या मते खरी शास्त्रीय दृष्टी आहे. न्यायाच्या धर्मकाटय़ावर गुणकर्मानाच खरे वजन आहे. केवळ जन्मजातीवरून कुणाला अस्पृश्य मानणे हा मानवतेला कलंक आहे. मला असे पुष्कळ दिवसांपासून वाटत होते, की समाजातून हा अस्पृश्यतेचा रोग निघून जावा. माझा जसजसा समाजाशी संबंध वाढत गेला, तसतशी वस्तुस्थितीची कटुता अधिकाधिक तीव्रतेने प्रत्ययास येऊ लागली. माझ्याने स्वस्थ राहवेना, ‘तुमचा हिंदूसमाज असा कसा’ असे कुणी म्हटल्यास मी लज्जायमान होत असे, नंतरच्या काही घटनांनी, लज्जेचे हे कारण नष्ट करण्यासाठी मी लवकर काहीतरी केले पाहिजे याची तीव्र जाणीव मला करून दिली.’’

हेही वाचा >>> चिंतनधारा: विश्व हिंदू परिषदेने हे काम करावे..

महाराजांनी १९४५ पासून हरिजनाला मंदिर प्रवेश, सार्वजनिक विहिरीवर सर्वांनाच पाणी भरण्याचा हक्क असला पाहिजे यासाठी जनजागृती करून चळवळीचे नेतृत्व केले. विहिरी दलितांसाठी खुल्या  करण्याची सुरुवात  त्यांनी मोझरीपासून केली. मंदिर खुले करण्याची सुरुवात त्यांचे गुरू आडकोजी महाराजांचे मंदिर सर्वांना खुले करून केली. अमरावतीचे अंबादेवी मंदिर, रामटेकचे राम मंदिर, नागपूरचे जोगेश्वर मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, नाशिकचे मंदिर अशी एकूण ५२ मंदिरे, धर्ममरतडाचा विरोध झुगारून हरिजनांसाठी खुली केली. १९४७ मध्ये दलितबांधवांसोबत स्पृश्य-अस्पृश्य तिळगूळ समांरभसुद्धा साजरे केले. १४ फेब्रुवारी १९४७ रोजी सर्व पक्षांची नागपूर येथे बैठक बोलावून ‘श्रीगुरुदेव मंदिर प्रवेश मंडळ’ स्थापन केले. त्याचे अध्यक्ष तुकडोजी महाराज व उपाध्यक्ष  न्यायमूर्ती भवानीशंकर नियोगी होते. १९४५ ते १९६८ दरम्यान जातीभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, चमत्कार, बळीप्रथा, व्यसनाधीनता  इत्यादीविरुद्ध आवाज उठवून समाजोत्थानाचे कार्य केले. महाराज भजनात म्हणतात,

या रे हरिजन! या मंदिर उघडे करुया।

जातीपंथ अता विसरुनिया जाऊ

नंदादीप उजळूया मानवधर्माचे।

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rajesh772@gmail.com