अगतिकतेतून आत्मघाताकडे?’ हा अग्रलेख (२२ ऑगस्ट) वाचला. देश महासत्ता होत आहे, असे रोज सांगितले जाते, मात्र वास्तव डोळ्यांत अंजन घालणारे आहे. चीनसमोर वारंवार मागे हटणे, पाकिस्तानला धडा शिकवू न शकणे आणि अन्य शेजाऱ्यांशी बिघडलेले संबंध हे यशस्वी परराष्ट्र धोरण ठरू शकेल का? महासत्ता होण्याचे स्वप्न दाखवताना अर्थव्यवस्था मात्र ढासळत आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचा आक्रोश – या प्रश्नांवर सरकार गप्प का ? फक्त संरक्षण खर्च फुगवून, टाळ्या वाजवून, झेंडे दाखवून देश शक्तिशाली होत नाही. घोषणाबाजीने नागरिकांचे पोट भरत नाही. ‘विश्वगुरू’ होण्याच्या बोंबाबोंब सुरू असताना आपण जगात एकटे पडत चाललो आहोत, याचे भान राहिलेले नाही. मित्र राष्ट्रे दूर जाऊ लागली आहे. शत्रू मजबूत होत आहेत आणि आपण मात्र स्वप्ने विकण्यात गुंग आहोत. चमकदार घोषणांतून बाहेर पडून सरकार खरी रणनीती आणि धैर्य कधी दाखवणार, सामान्यांना न्याय, रोजगार, सुरक्षितता कधी मिळणार?

● ओंकार निघुलसासवड (पुणे)

इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती

अगतिकतेतून आत्मघाताकडे’ हे संपादकीय वाचले. यामध्ये अधोरेखित केलेला प्रश्न केवळ व्यापाराचा नाही, तर तो राष्ट्रीय सुरक्षेचा, आर्थिक भविष्याचा आणि राजनैतिक स्वाभिमानाचा प्रश्न आहे. अमेरिकेच्या शुल्कवाढीमुळे भारतासमोर तातडीचे संकट उभे राहिले असले, तरी उपाय म्हणून चीनकडे झुकणे म्हणजे इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती ठरेल. गलवानमधील आक्रमण, सीमावाद आणि व्यापारातील प्रचंड असमतोल या वास्तवामुळे चीन कधीही विश्वासू भागीदार होऊ शकत नाही. भारताने शॉर्टकट शोधण्याऐवजी आत्मनिर्भरतेची दीर्घकालीन वाट चालली पाहिजे. कृषी, लघुउद्याोग, तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्राला चालना देत जागतिक स्तरावर युरोप व इतर देशांशी संतुलित संबंध प्रस्थापित करणे हीच खरी रणनीती आहे. राष्ट्रहिताच्या दृष्टीने स्वावलंबन, आत्मसन्मान आणि रणनीतिक दूरदृष्टी यांवर आधारित धोरण आखल्यासच भारत स्वत:चा मार्ग ठामपणे आखू शकेल. चीनकडे झुकणे हा आत्मघातकी मोह आहे, तर आत्मनिर्भरतेचा मार्ग भविष्यकालीन भारताची खरी ताकद आहे.

● आशुतोष राजमानेबाभुळगाव (पंढरपूर)

म्हणून चीनची भाषा बदलली

अगतिकतेतून आत्मघाताकडे?’ हा अग्रलेख वाचला. यात मांडलेला विचार वर्तमानाचा विपर्यास करणारा आहे. नेतृत्व लेचेपेचे, स्वार्थी, भ्रष्टाचारी होते त्या वेळी हे फंडे चालून जात. ट्रम्प यांना अजून याची कुणी जाणीव करून दिली नाही की, आधीचे नेतृत्व व आताचे नेतृत्व यातील फरक काय? आजचे नेतृत्व हतबल व हतबुद्ध नाही. हीच बाब चीनसोबत होणाऱ्या व्यवहाराबाबतीतसुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे. बलाढ्य चीन भारताला शह देण्यासाठी चिल्लर पाकिस्तानवर अवलंबून नाही. भारताचे पूर्वीचे नेतृत्व व आताच्या नेतृत्वातील फरक चीनला जाणवला असावा, म्हणूनच चीनची भाषा गेल्या काही दिवसांत का बदलली असावी.

● विलास कानडाखेडकरनांदेड

आयुष्य उद्ध्वस्त होणे टळेल

अर्थपूर्ण गेमिंगचे दुकान पूर्णपणे बंद’ (लोकसत्ता २१ ऑगस्ट) ही बातमी वाचली. यामुळे जुगाराचा ऑनलाइन अड्डा बंद होईल. दंडाची रक्कमही एक कोटी रुपयांपर्यंत ठेवल्याने आयुष्यभराची कमाई गेमिंगवर उडवलेल्या अनेकांचे आयुष्य वाचू शकेल! जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा ऑनलाइन सट्टेबाजी व गेमिंगला अवैध घोषित केल्याने या विधेयकाचा मुख्य हेतू साध्य होऊन बुडवेगिरी, टेरर फंडिंग व आर्थिक फसवणुकीसारख्या वाढत्या घटनांना चाप बसेल! गेम खेळणाऱ्या पीडितांना मात्र कोणताही दंड नाही हे खटकले! त्यांचाही या गुन्ह्यात काही प्रमाणात सहभाग असतोच. त्यांना थोडीफार तरी शिक्षा मिळणे गरजेचे वाटते!

● चंद्रशेखर दाभोळकरभांडुप (मुंबई)

हेतूपूर्वक निष्क्रियता असेल तर?

तर न्यायमंडळे निष्प्रभ’ (२२ ऑगस्ट) या बातमीत सर्वोच्च न्यायालयाच्या एका प्रश्नाला समाधानकारक उत्तर देणे शक्य नसल्यामुळे, महान्याय अभिकर्ता तुषार मेहता यांनी, ‘सर्व समस्यांवर न्यायालये हा उपाय असू शकत नाहीत’ असे तत्त्वज्ञान ऐकवले आहे. ज्याला खऱ्या अर्थाने देवाची करणी ( act of god) किंवा पूर्ण काळजी घेऊनही झालेली मानवी चूक असे काही कारण असेल तर त्यांच्या या विधानाला थोडासा अर्थ आहे. पण राज्यपालांनी हेतूपूर्वक दाखवलेली निष्क्रियता हे कारण असेल तर तिथे ते अजिबात लागू पडत नाही. प्रत्येक रोगावर औषध असतेच असे नाही, असे म्हणून हिवतापावरही औषध द्यायचे नाही किंवा ज्या रोगावर अद्यापपर्यंत औषध नाही त्याच्यावर औषध शोधण्यासाठी प्रयत्नही करायचा नाही, याला काय अर्थ आहे? ● कपिल जोशी, पुणे