कर्जबुडवे कोण?’ हा अग्रलेख (२५ जुलै) वाचला. योगायोग म्हणजे २२ जुलै रोजी राज्यसभेत केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीयीकृत बँकांनी देशभरात गेल्या दहा वर्षांत १२ लाख ८ हजार कोटी रुपयांची कर्जे राइट-ऑफ केली आहेत. त्यासमोर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बुडीत खात्यांची ३१ हजार ५०० कोटी रुपयांची रक्कम अगदीच किरकोळ वाटते. कृषीकर्जाचा विषय आला की त्याचे जेवढे विश्लेषण केले जाते तेवढे १२ लाख ८ हजार कोटी रुपयांची कर्जे राइट-ऑफ करताना केले गेले होते का? कर्जे राइट-ऑफ करण्यासाठीचा पैसा बँकांच्या नफ्यातूनच म्हणजे जनतेकडूनच येतो ना, मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच काय अडचण आहे? राइट-ऑफ कर्जांपैकी किती कर्ज वसूल झाले, किती वन टाइम सेटलमेंट मार्गाने माफ झाली, त्यात बँकांना किती रकमेवर पाणी सोडावे लागले, ही माहिती सहसा पुढे येत नाही. मोठ्या बुडीत कर्जांवर अगदी सहज पाणी सोडले जात असताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मात्र खळखळ केली जाते. राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जमाफीच्या थोतांडास जरूर विरोध करावा. परंतु मोठमोठ्या कर्जांची रक्कम राइट-ऑफ किंवा बुडीत खाती टाकताना जो न्याय लावला जातो तोच न्याय शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करून त्यांच्या कर्जांसाठीदेखील लावावा.

● उत्तम जोगदंड (कल्याण)

थेट कर्जमाफी का गृहीत धरावी?

कर्जबुडवे कोण?’ हे संपादकीय वाचले. राजकारणी मतांसाठी शेतकऱ्यांना गृहीत धरतात, शेतकरी सरकारला गृहीत धरतात, सरकार बँकांना आणि करदात्यांना गृहीत धरते अशी ही साखळी आहे. बँका शेतकरी आणि राजकीय नेत्यांचा वरदहस्त असणाऱ्या कर्जदारांना सोडून इतर खातेदारांना गृहीत धरतात. अजूनही या सर्वांना असे का वाटत नाही की थेट कर्जमाफीऐवजी बी बियाणे, खते वेळच्या वेळी द्यावीत. आर्थिक सवलती द्याव्यात, फारतर व्याजदर कमी करून कर्जे पुनर्रचित करण्याची, प्रसंगी दंडव्याज माफ करण्याची बँकांना मार्गदर्शक तत्त्वांसह वेळोवेळी मुभा द्यावी. अशा सवलती दिलेल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा सातत्याने आढावा घ्यावा. लाभार्थी खरोखरच गरजू आहे की धनदांडग्या शेतकऱ्यांनीही गैरफायदा घेतला आहे याची शहानिशा करणे हेही तितकेच आवश्यक आहे.

● श्रीपाद कुलकर्णीबिबवेवाडी (पुणे)

अंशत:तरी कर्जमाफी द्यावीच

कर्जबुडवे कोण?’ हे संपादकीय वाचले. देशभरात एकेकाळी आर्थिकदृष्ट्या सर्वांत श्रीमंत, आर्थिक शिस्त असलेले राज्य कर्जबाजारी व्हावे, ही बाब निश्चितच लांछनास्पद! मागील विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले, पण आता तोच ‘जुमला’ ठरण्याची दाट शक्यता असताही, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर डोळा ठेवून मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्याचे सूतोवाच करताहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या पाठीवर कोरडे ओढायचे आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी फुंकर घालायची हा सरकारी खाक्या शेतकऱ्यांनी ओळखला आहे. बेभरवशाच्या हवामानामुळे उभे पीक आडवे होऊन बळीराजा भुईसपाट झाला असता सरकारने बँकांची शेतकरी कर्जफेड नाकारणे अत्यंत निषेधार्ह आहे. ‘आई जेवू घालिना अन् बाप भीक मागू देईना!’ अशीच ही अवस्था. संपूर्ण नाही, तर किमान अंशत: कर्जमाफी दिली, तर लाखो शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळू शकतो. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

● बेन्जामिन केदारकरनंदाखाल (विरार)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिक निकष उपयोगी नाहीत

भारतातील उपभोगाच्या विषमतेतील घट उल्लेखनीय का?’ हा लेख (२५ जुलै) वाचला. भारतातील आर्थिक विषमता आणि उपभोग विषमतेचे मोजमाप हे एक सर्वकालीन गौडबंगाल आहे. सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी सरकार प्रायोजित परावलंबी अनुदानित योजनांतून उपभोग आणि उत्पन्नामध्ये झालेली अस्थायी सुधारणा स्थिर आर्थिक उत्पन्नाचे आणि उपभोगाचे द्याोतक असू शकत नाही. या अनुदानित योजनांतून होणाऱ्या उपभोगावरील खर्चातून कोणाचे उत्पन्न वाढते आणि कोणाचे कमी होते, हा भाग महत्त्वाचा आहे. जागतिक स्तरावरील उपभोग, उत्पन्नवाढीचे निकष भारतातील आभासी कल्याणकारी अनुदानित आर्थिक व उपभोग विषमता ठरवण्यासाठी योग्य आहेत का? याचा विचार करणे गरजेचे आहे. दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्यावर होणाऱ्या खर्चासाठी असंघटित क्षेत्रातील सर्वसामान्य माणसाची होणारी तारांबळ विचारात घेतली तर, राजकीय सोय म्हणून, आर्थिक विषमता आणि उपभोग विषमता कमी होत आहे हे अधोरेखित करण्यासाठी जागतिक निकष उपयोगी पडणारे नाहीत. ● नंदन नांगरे