लिंगानुसार वागणुकीतील भेदभावांना वैज्ञानिक पाया नाही. ती माणसांच्या समजुतींतून उपजलेल्या विचार- विकारांची फळे आहेत. उत्क्रांतिविज्ञान मानवनिर्मित भेदांचे खंडन करते.

प्रदीप रावत

नर-मादी भेद उपजल्याने नरांतील स्पर्धा आणि मादीचा निवड अधिकार उपजला आणि ते लैंगिक उत्क्रांतीचे मुख्य साधारण रूप ठरले हे खरेच! पण त्यातही काही भेदाभेद आणि वैशिष्टय़े उदयास आली. नर-मादी यांच्या गुणधर्मामध्ये भिन्नत्व आढळते. त्यांची व्यक्त दृश्य रूपेही भिन्न असतात उदा. रंगीबेरंगी शेपटी किंवा तुरा लक्षवेधी नाच, गाणे किंवा साद घालणारे नाद वा आवाज, अंग प्रत्यंगाचे प्रदर्शन करण्याची लकब, निरनिराळय़ा आकाराची शिंगांसारखी ‘हत्यारे’, धिपाड शरीरयष्टी, आकर्षक घरटी बांधण्याची कला इत्यादी. याला सु-रती स्वरूपभेद म्हणतात. एका दृष्टीने विचार केला तर अशा धर्तीच्या काही ठेवणी ही लोढणी असतात. उदा. मोराचा भारंभार पिसारा! अवघ्या जीवनकालाच्या तीव्र स्पर्धेत ही लोढणी महागडी आणि हानिकारकही असतात. तरीही ती का उत्क्रांत झाली असतील?

नैसर्गिक निवडीचा रोख आणि रस यशस्वी प्रजोत्पादनात असतो, तगून राहण्यात नाही. अशी नाकापेक्षा मोती जड स्वरूपाची हत्यारे आणि शोभेचे दागिने यामुळे आयुष्याची दोरी कमकुवत करण्याची शक्यता असते. पण दुसरीकडे त्यांच्या ‘पुण्याई’ने प्रजोत्पादनाची संधी कित्येक पटींनी वाढते. नर-मादीमधील अशा सु-रती स्वरूपभेदांकडे सर्वात आधी डार्विननेच लक्ष वेधले! पुनरुत्पादन यशाभोवती फिरणारा लैंगिक निवडीचा सिद्धांत त्याच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतात सहजी चपखल बसतो! लैंगिक निवड म्हणजे जोडीदार मिळण्याची संधी आणि संभाव्यता वाढवणारी निवड. नराच्या घटणाऱ्या आयुष्यमानापेक्षा जर प्रजननसंधीची संभाव्यता बळावत असेल तर लैंगिकदृष्टय़ा निवडलेली (आणि टिकलेली) लोढणी उत्क्रांत होतात.

लैंगिक निवडीचे दोन प्रकार आहेत. मादीच्या प्राप्तीसाठी नरांमध्ये होणारी स्पर्धा आणि जीवघेणा संघर्ष हा एक प्रकार आहे. नराची निवड करताना मादीमध्ये आढळणारा चोखंदळपणा हा दुसरा प्रकार. विविध प्रकारची शिंगसदृश आयुधे, धिप्पाड शरीरे ही मादीप्राप्तीसाठी होणाऱ्या संघर्षांमुळे उत्क्रांत होतात. पण चित्ताकर्षक रंग, गायन, नृत्य प्रदर्शन, घरटी बांधण्याची कला इत्यादी गुणधर्म हे दुसऱ्या प्रकारच्या निवड पैलूची उदाहरणे आहेत. मादीच्या नजरेत सर्व नर सारखे नसतात. याला आपण मादीने केलेली जोडीदाराची निवड म्हणू. या दुसऱ्या प्रकारांतदेखील सौम्य प्रमाणात नरांमध्ये स्पर्धा आढळते. मोहविणारे सुगंध, भडक रंग, उच्च स्वर, शृंगारिक हावभाव- नृत्य यामध्ये पारंगत असलेले नरच मादीला आकृष्ट करतात. फरक एवढाच की यशस्वी कोण हे मादी ठरविते! परस्परांतील तुंबळ युद्ध नव्हे! लैंगिक निवडीचे कार्य ‘संभोग-संधी’ पुरते मर्यादित नाही. समागमानंतर फलित झालेल्या मादीचे रक्षण पुढील काळात नर करतो. अशा नाना प्रकारच्या युक्त्या-प्रयुक्त्या काळाच्या ओघात उत्क्रांत झाल्या आहेत.

 हयात असलेल्या आणि कालगत झालेल्या अन्य वानरवंशीयांप्रमाणेच मानवांमध्ये लैंगिक स्वरूपभेद आढळतो. आपल्या प्रजातीच्या उत्क्रांतीकाळात लैंगिक निवडीच्या कमी-अधिक प्रभावांमुळे हा भेद निर्माण झाला आहे. स्त्री-पुरुषांमध्ये प्रजननाशी निवडीत अवयवांमध्ये भेद असतोच त्याचप्रमाणे सरासरी शरीरयष्टीतसुद्धा लक्षणीय फरक आढळतो. (अगदी चिंपांझी गोरिलाएवढा नसला तरी!) पुरुषांना दाढी-मिशा असणे, आवाज घोगरा, स्वभाव किंवा वागणूक आक्रमक, स्नायू पिळदार अशा लक्षणांमधून हा वेगळेपणा स्पष्ट होतो. शरीराची रचना, क्रिया, वर्तन यांवर लैंगिक निवडीचा प्रभाव असतो. पुरुषांचे बहुगामीपण आणि स्त्रियांचा चोखंदळपणा यातून प्रकट होणारे लैंगिक वर्तन याची साक्ष देते. या भेदांचे मूळ संस्कृतीत नसून मुख्यत: प्रकृतीत असते. ज्या प्रजातीमध्ये बहुगामित्व आहे आणि मादीच्या प्राप्तीसाठी फार जीवघेणा संघर्ष करावा लागतो त्या प्रजातीमध्ये स्वरूपभेद तीव्र असतो. उदा गोरिला. त्याउलट आद्य मानवांमध्ये बहुगामित्व आणि स्पर्धा कमी वा सौम्य आहे त्यामुळे स्वरूपभेद तुलनेने कमी आहेत.  सस्तनांमध्ये अनिवार्य दुर्मीळ अशा एकनिष्ठ जोडप्यांची प्रथा मानवांमध्ये आढळते. स्त्री-पुरुषांची कुटुंबसंस्थेतील गुंतवणूक कमी-अधिक असते, ही वस्तुस्थिती आहे. दीर्घ साहचर्य आणि एकनिष्ठ राहणे या कल्पनांचा मानवी समाजावर बराच प्रभाव आहे. साहचर्य मानवेनासे झाले, पेलवेनासे झाले की विभक्त होणे हेदेखील नैसर्गिकच आहे. घटस्फोट झालेल्यांनी पुनर्विवाह करणे म्हणजेच पुन्हा एकनिष्ठ साथीदार शोधणे हा जीवनक्रम सुरू राहतो.

परंतु अन्य प्राणी-प्रजातींप्रमाणेच आपणसुद्धा उत्क्रांत झालो, ही जाणीव केवळ धार्मिकच नव्हे तर आधुनिक जीवनशैली अनुसरणारेसुद्धा नाकारतात! सरीसृपांपासून सस्तन किंवा जलचरपासून भूचर उत्क्रांत झाले, हे वैज्ञानिक सत्य सहजगत्या स्वीकारले जाते. मानव हा विशेष स्वतंत्र आणि स्वयंभू आहे, जीवसृष्टीचा घटक नाही अशा श्रद्धा बाळगणारे मोठय़ा संख्येने आहेत. माणूस हा पशू आहे, हे पत्करले तर त्याच्या पशुप्रवृत्तीला प्रतिष्ठा प्राप्त होईल अशी भीती नीतिमूल्यांच्या पुरस्कर्त्यांना वाटते. वस्तुत: माणूस प्रकृती आणि संस्कृती यांच्या संकरांतून घडला आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर प्रज्ञावान मानव हे निसर्गाच्या हेतुशून्य आणि आंधळय़ा अपघाती भौतिक प्रक्रियेचे अपत्य आहे! हे वैज्ञानिक स्पष्टीकरण पचवणे अवघड जाते इतकेच! मानवाच्या विकासात सृष्टी बदलण्याचे अनेक यशस्वी फलदायी प्रयत्न मानवजातीने घडविले. प्राण्यांना, पिकांना पाळीव केले. अग्नीवर प्रभुत्व मिळवले. या कर्तेपणाच्या वारशामुळे प्रतिसृष्टीचा निर्माता हे मानव जातीचे बिरूद ठरले. या अशा ‘कर्तेपणा’च्या सततच्या जाणिवेमुळे निर्मात्याशिवाय निर्मिती घडली आहे, हा सिद्धांत माणसाला विश्वसनीय वाटत नाही. उलट आपत्यात देवाच्या विशेष कृपेचा अंश आहे, असा भ्रम सहजसोयीने अंगीकारला जातो. विज्ञान तंत्रज्ञानाच्या रूपाने सहजी पत्करले जाते. पण वैज्ञानिक दृष्टिकोन मात्र सहजी स्थायीभाव होत नाही. नीतिमत्ता ही सर्वथा निसर्गदत्त आणि निसर्गप्रणीत नसते. उत्क्रांतीक्रमांत वर्तनाचे विविध प्रकार आणि नमुने आढळतात. त्या सगळय़ाला एका सूत्रात गोवणारी अशी सूत्रप्रणाली बांधणे अवघड आहे. हे समजून-उमजून घेण्याची कसरत मोठी कठीण असते, माणसामाणसांमध्ये भेद पूर्णत: निसर्गप्रणीत नसतात. जे जे निसर्गप्रणीत ते ते पशुतुल्य म्हणून हीन मानणे हा एक प्रकारचा गैरसमज आहे. आणि त्याच जोडीने निसर्गामधील कोणते ना कोणते वर्तन हे आपल्या वागण्याचा आधार असल्याचा तर्क मांडणे हादेखील गैरसमजच! म्हणूनच लिंगामध्ये आढळणाऱ्या नैसर्गिक भेदांवर सामाजिक भेदभावाचे समर्थन असू शकत नाही. पुरुष, स्त्री, उभयिलगी यांना मिळणारी सामाजिक वागणूक भेदभावाची असण्याला कोणताही वैज्ञानिक पाया नाही. ही माणसांनी ठरवायची वागणुकीची सूत्रे आहेत. बदलत्या काळाबरोबर विशेषत: तंत्रज्ञानाबरोबर भेदभाव माजविणाऱ्या कल्पना गैरलागू ठरत आल्या आहेत. योनिशुचिता, भ्रष्टता, अशुद्धता, कौमार्यपरीक्षा अशा कल्पनांवर बेतलेल्या रूढी लयास गेल्या पाहिजेत. स्त्रीभ्रूणहत्या, मुलींना कनिष्ठ आणि हीन समजणे अशा प्रथा माणसांनी स्वत: तयार केल्या. हेच तत्त्व जन्माधिष्ठित श्रेष्ठपणा, कनिष्ठपणा मानणारी जातिव्यवस्था, पूर्वजन्मातील पाप-पुण्यांनी श्रेष्ठ कनिष्ठता ठरविणे यांसारख्या कल्पनांनाही लागू आहे. बऱ्याच जणांची बळी तो कान पिळी हेच उत्क्रांतीतत्त्व आहे, अशी मूर्ख धारणा असते. हे विधान डार्विनच्या नावे खपविले जाते. डार्विन अशा मनुष्यप्रणीत भेदभावांचा समर्थक नव्हता! उलटपक्षी त्याच्या काळात गुलामीविरुद्ध आवाज उठविणाऱ्या मूठभर अपवादात्मक लोकांपैकी तो एक होता. श्रेष्ठ-कनिष्ठ भेद लिंगानुसार वागणुकीत भेदभाव करणे अशा बाबी निसर्गाने ठरविल्या नाहीत. त्याला वैज्ञानिक पाया नाही. ती तर माणसांच्या भल्याबुऱ्या समजुतींची त्यातून उपजलेल्या विचार विकारांची फळे आहेत. उत्क्रांतिविज्ञान समाजातील मानवनिर्मित भेदांचे समर्थन करत नाही. उलटपक्षी त्याचे खंडन करणारी, त्याला मुळातून उखडून टाकणारी ही विचारपद्धती आहे. हिटलरप्रणीत वंशवादी विचाराला मुळापासून छेद दिला तो ‘माणसाचे मूळ पूर्वज कोण?’ हे दर्शविणाऱ्या उत्क्रांतिसिद्धांताने! माणसामाणसांमधले व्यवहार अधिक सुसंगत सुजाण करणारी दृष्टी विज्ञानामुळे उपजते आणि उजळते. उत्क्रांतिविज्ञान माणसाची नीतिमूल्ये नाहीशी करत नाही, उलट ती अधिक संयमी आणि तर्कसिद्ध करते.