अनेकरंगी झेंडे आहेत माझ्या हाती/ एक कोणाच्या तरी आशीर्वादाचा, दुसरा कुणाशी वैराचा/ मध्ये तिसराच करुणेचा/ आणि हो, द्वेषाचासुद्धा झेंडा./ कधी कोणता उंचावतो मी/ माझे मलाही कळत नाही.’ – या कवितेत पुढे राजेंद्रकिशोर पांडा म्हणतात : ‘असहाय विजेत्याच्या एकाकी दु:खाला असेलही क्रौर्याची किनार/ पण मला एकच माहीत आहे… माझा झेंडा मी नेहमीच फडकावणार/ झेंडा कुठला, अर्थ काय त्याचा/ हे ठरवायचे इतरांनी/ माझे काम एकच- झेंडा फडकावत राहाणे’! अशा कवितांतून राष्ट्रवादाच्याही पलीकडल्या नव्या जाणिवा व्यक्त करणारे, साहित्य अकादमी पुरस्कारासह (१९८५) काही राष्ट्रीय सन्मानांचे मानकरी ठरलेले उडिया कवी राजेंद्रकिशोर पांडा शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) निवर्तले.

ओडिशाच्या संबळपूर जिल्ह्यातील ज्या बाटलागा गावात राजेंद्रकिशोर पांडा (जन्म १९४४) यांनी प्राथमिक शिक्षण घेतले, ते गावच पुढे महानदीवरील हिराकुड धरणाच्या बुडिताखाली गेले. संबळपूरला शालेय शिक्षण पूर्ण करून, अलाहाबाद विद्यापीठातून पदवी घेऊन राजेंद्रकिशोर पांडा ‘यूपीएससी’ची परीक्षाही उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत (१९६७ ची बॅच) दाखल झाले. कवितेचा अभ्यास करता करता स्वत:देखील कविता करू लागले.

अभ्यासून, आकळून घ्यावेत असे त्या वेळचे ओडिया कवी म्हणजे सच्चिदानंद राउतराय! आपल्या मराठीत जसा आधी केशवसुतांनी आणि मग मर्ढेकरांनी बदल घडवला, तसा बदल ओडिया कवितेत राउतराय यांनी एकहाती घडवून आणला. साधारणपणे देशभरात ओडिया कवी व साहित्यिक म्हणून परिचित असणारे सीताकांत महापात्र, गुरुप्रसाद मोहन्ती, रमाकान्त रथ, सौभाग्यकुमार मिश्रा हे सारेच जण राउतराय यांनी दाखवलेल्या दिशेने आपापली वाट शोधणारे. यांच्याहीपेक्षा नवी कविता आपली हवी, तिला शैलीचे बंधन नको- ती नव्या जाणिवांची हवीच, पण तिच्या प्रतिमासृष्टीने परंपरेतून आरपार पाहावे, अशा आग्रहांतून राजेंद्रकिशोर पांडा यांची कविता प्रकटू लागली.

त्यांच्या नावावर १६ कवितासंग्रह आहेत. साहित्य अकादमी पुरस्काराप्रमाणेच २०२० चा ‘कुवेम्पु पुरस्कार’, ‘गंगाधर पुरस्कार’ तसेच संबळपूर विद्यापीठाची सन्माननीय ‘डी. लिट्.’ पदवी यांचे ते मानकरी होते. त्यांच्या कवितांचे हिंदी आणि इंग्रजीत अनुवाद झाले. दोन कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या आहेत. सरकारचे मिंधेपण स्वीकारणारी साहित्य संमेलने ओडिशात होत नाहीत, परंतु पांडा हे उत्तरायुष्यात एका वादामध्ये अडकले. राज्य सरकारने पाठिंबा दिलेल्या ‘सीशोअर साहित्य अकादमी’चे अध्यक्षपद त्यांनी, दरमहा ६३ हजार रुपये मानधनाचा करार करून स्वीकारले.

नावात ‘सीशोअर’ असा विशोभित शब्द असणाऱ्या या साहित्य-संस्थेचे प्रवर्तक किंवा खरे तर मालकच कुणा ‘सीशोअर ग्रुप’चे प्रशान्त दाश यांचा धंदा लोकांना झटपट पैशाचे आमिष दाखवण्याचा होता. त्यापायी हे दाश कोठडीत गेले, तेव्हा पांडा यांनी ही संस्था सोडली. त्यांच्यासह दुसरे साहित्यिक मनोज दास यांनीही, तीन वर्षांसाठी केलेला करार नऊ महिन्यांत मोडला, पण मनोज दास यांनी तोवर या संस्थेकडून घेतलेले १० लाख रुपये सरकारला परत देऊ केले.

महसूल विभागात काम केलेल्या पांडा यांनी मात्र, ‘करार करून, मानधन म्हणून रीतसर रक्कम घेणे, यात कोणताही गुन्हा नाही. दास यांनी भावनेच्या भरात पाऊल उचलले- मी काही इतका भावविवश होणार नाही’ असे सुनावले होते! अर्थात, या वादाच्याही काळात ओडिशातील साहित्यिक त्यांच्या बाजूने उभे राहिले, इतकी त्यांची महत्ता होती.