अतुल सुलाखे
शस्त्र-वीरांत राम मी
– गीताई अ. १०
जो जनतेचे रक्षण करतो,
पोषण करतो, पालन करतो
तोच पिता साक्षात मानावा,
जन्म देइ तो निमित्त केवळ.
– रघुवंश प्रथम सर्ग श्लोक ३४
व्यास आणि कालीदास यांचे हे रूपांतरित काव्यांश आणि भूदान यांचा निकटचा संबंध आहे. विनोबांनी तशी योजना जाणीवपूर्वक केली नसेलही परंतु हा योग जुळून येणे, ही लक्षणीय गोष्ट आहे.
गांधी-विनोबांच्या आयुष्यात रामनाम, रामराज्य या संकल्पना श्वासोच्छ्वासाहून अधिक मोलाच्या होत्या. गीताईमध्ये वीर म्हणून कृष्णाने रामाचा उल्लेख केला आहे. गीताईसाठी विनोबांनी कालिदासाचा अनुष्टुप वापरला आहे. महाभारत, रघुवंश आणि भूदान यांचे नाते सखोल आहे. भूदान यज्ञ हा मानवतेच्या कल्याणार्थ होता. कल्याणकारी राज्य हे त्याचे एक ध्येय होते. अशा राज्याचा वस्तुपाठ रघुवंशाच्या प्रथम सर्गात कालिदासाने अत्यंत उचित शब्दांत मांडला आहे. या सर्गातील राजा दिलीपाचे शासन सांगताना कालिदास कल्याणकारी राज्याचे चिरंतन चित्र रेखाटतो..
प्रजानां विनयाधानात्
रक्षणात् भरणादपि।
स पिता पितरस्तासां
केवलं जन्महेतव: ॥
तेलंगणा प्रांतात मानवतेचे मंगल चिंतणारी भूदान यज्ञासाठीची पदयात्रा सुरू झाली तो दिवस श्रीरामनवमीचा होता आणि तारीख होती १५ एप्रिल १९५२. धार्मिक आणि सांस्कृतिक आयामांप्रमाणेच भूदानाला भौतिक पैलूही होते. पदयात्रेच्या सुरुवातीला विनोबा कैदेतील कम्युनिस्टांना भेटले. त्यांची दुर्दशा आणि तुरुंगांची वाईट स्थिती त्यांनी जाणून घेतली, ती दूर करण्याचे आश्वासन देत त्यांच्या हिंसक मार्गाविषयी चर्चा सुरू केली.
विनोबांची अशी भूमिका होती की निजामाच्या राजवटीतील हिंसा एकवेळ समजून घेता येईल, परंतु देश आता स्वतंत्र झाला आहे. तरीही हिंसेचा मार्ग का पत्करायचा? यावर, आम्हालाही हा मार्ग सोडायचा आहे तथापि अद्याप निर्णय झालेला नाही, अशी भूमिका साम्यवाद्यांनी घेतली. या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांची भेट घेण्याची मागणी विनोबांकडे केली. विनोबांनी ही मागणी सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवली पण याचा फायदा घेऊन अटक होईल, अशी प्रमुख नेत्यांना शंका आली आणि त्यांनी भेटीचा सोपस्कार नाकारला.
याच वेळी एक अनोखी आणि अंतर्मुख करणारी घटना घडली. चर्चा झाली त्यादिवशी गावकऱ्यांनी रामनवमीचा प्रसाद केला होता. तो स्वीकारण्याची विनंती त्यांनी कम्युनिस्ट बांधवांना केली आणि त्यांनी गावकऱ्यांची मागणी मान्य केली. प्रसादाऐवजी त्यांनी ‘भोजन’ घेतले असेल पण ही घटना सात दशकांपूर्वीचे सामाजिक सौहार्द सांगणारी आहे. इथे तुकोबांच्या-चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सर्प तया. या वचनाचे स्मरण होते. साम्ययोग्याचे प्रेम आणि साम्यवाद्यांची उत्कटता यांच्या ऐक्याचे याहून चांगले उदाहरण सापडणे कठीण. भौतिक जीवनाच्या छटा अशा एकरूप होतात आणि शेवटी परमसाम्यावस्थेत लीन होतात. हाच तो साम्ययोग.