scorecardresearch

साम्ययोग : दानमंत्र..

आरंभ ‘सबहि भूमी गोपाल की’पासून करायला हवा. जमिनीवर मालकी कृष्ण परमात्म्याची आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून ती जमीन कसणाऱ्याची.

साम्ययोग : दानमंत्र..
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

अतुल सुलाखे

मनन केले की तारणारा तो मंत्र, अशी मंत्राची व्याख्या आहे. कुणी मंत्री भेटायला आले की विनोबा त्यांना विचारत, ‘मंत्री आहात मग तुमचा मंत्र कोणता?’ विनोबांच्या कल्पनेतील मंत्री मनन आणि चिंतन करणारे होते. असंख्य मंत्र आणि सूत्रे हा विनोबांचा विशेष होता. भूदान यज्ञाच्या अनुषंगाने त्यांनी अगणित मंत्र दिले. परंपरा आणि नवता यांचा मेळ हा त्यांचा विशेष होता. भूदानाचा विचार स्पष्ट करणारे काही मंत्र आवर्जून ध्यानात घ्यावेत असे आहेत. शिवाय ते सार्वकालिक कल्याणाचा मार्ग दाखवणारे आहेत.

आरंभ ‘सबहि भूमी गोपाल की’पासून करायला हवा. जमिनीवर मालकी कृष्ण परमात्म्याची आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून ती जमीन कसणाऱ्याची. यातील गो-पाल शब्दाची योजना अत्यंत समर्पक आहे. भूदानाच्या आरंभी विनोबांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, ‘या प्रवासात फिरताना एक काम प्रामुख्याने माझ्या डोळय़ांपुढे राहणार आहे. मला गरिबांना जमिनी द्यायच्या आहेत. मातेची व पुत्राची जी ताटातूट झाली आहे ती दूर करून मला त्यांचा संबंध जोडायचा आहे. जो जो म्हणून शेतावर मेहनत करणार आहे त्याला जमीन मिळालीच पाहिजे.’ भूदान म्हणजे फक्त जमिनीचे वाटप नव्हते. याबाबत विनोबांनी स्पष्ट सांगितले, ‘या कामाचे नाव भूदान यज्ञ असे आहे. केवळ भूदान नव्हे. दान केवळ श्रीमंत करतात तथापि यज्ञामधे प्रत्येक व्यक्तीला सहभागी होता येईल आणि तसेच झाले पाहिजे. भूदान यज्ञ हे एक अहिंसक क्रांतीचे काम आहे.’

कम्युनिस्टांचा प्रभाव ओसरावा म्हणून काँग्रेसने भूदानाचा पुरस्कार केला, अशी टीका आजही होते. विनोबांनी अत्यंत स्पष्टपणे भूदान यज्ञाचा हेतू सांगितला. ‘तेलंगणामधे कम्युनिस्टांचा उपद्रव होता म्हणून जमिनी मिळाल्या, अशी आपण कल्पना करून बसलो तर हिंदूस्थानामधे अहिंसक क्रांतीची आशा सोडावी लागेल.’ भारतात चीन आणि रशियासारखी क्रांती होणार नाही, असे त्यांचे मत होते. ‘बाळाला भूक लागते तेव्हा परमेश्वर आईच्या स्तनात दुधाची योजना करतो. जो ईश्वर मला भूदान मागण्याची प्रेरणा देतो आहे, तोच ईश्वर समोरच्याला प्रेरणा देईल. जमिनीचे न्याय्य वितरण ही काळाची गरज आहे.’

‘देशात पाच कोटी भूमिहीन आहेत. ३० कोटी एकर जमीन लागवडीखाली आहे. त्या जमिनीचा सहावा हिस्सा मला हवा आहे. राजाला सहावा हिस्सा देण्याचा आपला जुना प्रघात आहे. आजचा राजा आहे गरीब जनता. त्याच्याकरिता पाच कोटी एकर जमीन द्या.’

‘माझा हा प्रजासूय यज्ञ आहे. यात प्रजेला राज्याभिषेक होईल आणि मी या यज्ञाचा घोडा म्हणून सर्वत्र फिरतो आहे. प्रजेच्या राज्यात प्रत्येकाला आपल्यासाठी काही होत आहे, याची जाणीव होणे म्हणजे सर्वोदय.’

‘या यज्ञात केवळ दान महत्त्वाचे नाही. तर त्याची म्हणजे जमिनीची समान विभागणी देखील महत्त्वाची आहे. दानं संविभाग: जो भूमिहीन आहे त्याचा प्रथम उद्धार झाला पाहिजे. हेच अंत्योदयाचे तत्त्व आहे.’या दान मंत्रांचा आणि विनोबांच्या समग्र चिंतनाचा कळस म्हणजे जय जगत्.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या