scorecardresearch

साम्ययोग : अध्यात्म विज्ञानाचा शोध

‘अहिंसक सत्याग्रह शक्ती प्रकट झाल्याने जगाचा उद्धार होईल,’ हा फार मोलाचा विचार गांधीजींनी भारतासमोर आणि पर्यायाने जगासमोर ठेवला.

साम्ययोग : अध्यात्म विज्ञानाचा शोध
(संग्रहित छायाचित्र)

अतुल सुलाखे

नि:शस्त्र प्रतिकार म्हणजे सत्याग्रह नव्हे आणि आपण केलेले सत्याग्रह आदर्श नव्हते, अशा भूमिकेवर गांधीजी आले. याचा अर्थ त्यांना आदर्श सत्याग्रहाची कल्पना नव्हती असे नाही. ‘अहिंसक सत्याग्रह शक्ती प्रकट झाल्याने जगाचा उद्धार होईल,’ हा फार मोलाचा विचार गांधीजींनी भारतासमोर आणि पर्यायाने जगासमोर ठेवला. विज्ञानाच्या शोधांप्रमाणे हा मानवी जीवनाचा आध्यात्मिक शोध होता.

गांधीजींना या देशाच्या परंपरेचा, लोकमानसाचा यथार्थ परिचय होता. अहिंसा ही भारतीय परंपरा आहे याची त्यांना खात्री होती म्हणून जनतेने त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद दिला. गांधीजींच्या अफाट लोकप्रियतेचे हे गुपित आहे.

लोकमान्य, विवेकानंद, गांधीजी यांना समाजमान्यता मिळाली ती त्यांच्या कृतिशील आध्यात्मिकतेमुळे. या तिघांचा अधिकार एवढा मोठा होता की त्यांनी अध्यात्माला काळानुसार नवे रूप दिले. स्वातंत्र्यप्रियता, मानवसेवा आणि शरीरपरिश्रम ही मोक्षाची साधने झाली. एवढेच नव्हे तर यानेच मोक्ष मिळतो अशी जनतेची धारणा झाली. पुढे विनोबांनी समत्वावर म्हणजेच साम्ययोगावर भर दिला. सत्याग्रहाच्या आदर्श रूपात या सर्वाचा समावेश होतो.

अध्यात्माला हे नवे रूप का मिळाले याची उकल विनोबांनी केली आहे. ब्रिटिशांनी भारत जिंकला आणि एक अनपेक्षित गोष्ट केली. त्यांनी संपूर्ण देशाला नि:शस्त्र केले. यापूर्वी असे घडले नव्हते. ज्यांनी सत्ता चालवली त्यांच्यावरच ब्रिटिशांनी हुकूमत गाजवणे सुरू केले. हा प्रयोग उभय पक्षांसाठी भयंकर ठरला. त्यापेक्षाही सामान्य भारतीय भयग्रस्त झाले. इतके की त्यांची मान वर करण्याची हिंमत राहिली नाही.

भारतासारखा देश गुलामीच्या जोखडाखाली फार काळ राहणार नव्हता. तो शस्त्राचा मार्ग अवलंबणार हे उघड होते. त्याच वेळी अध्यात्मविद्येचा सखोल पाया असणाऱ्या या देशात आत्मिक शक्तीचा व्यापक प्रयोग करणारी व्यक्ती उदयाला येणार हेही स्पष्ट होते. नियतीने यासाठी गांधीजींची निवड केली आणि जनतेने त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद दिला. गांधी नाही तरी दुसरी कोणी व्यक्ती निर्माण झालीच असती.

गांधीजींनी तेव्हा सांगितले, ‘आत्म्यात शक्ती आहे. त्यामुळे शस्त्राची गरज नाही. सरकारला आपणच डोक्यावर घेतले आहे. इच्छा असेल तर गुलामीचे जू केव्हाही फेकून देता येईल. त्यामुळे स्वातंत्र्य आपल्याच हाती आहे. सरकारने ऐकले नाही तर असहकार करू.’

या भूमिकेचा लोकांनी स्वीकार केला. गांधीजींचा विशेष केवळ मार्ग शोधण्यात नव्हता. आपण प्रसार करत असणारा मार्ग अपूर्ण आहे याची त्यांना सदोदित जाणीव होती. एखादा शास्त्रज्ञ आपले संशोधन अपूर्ण असेल तर ते नम्रपणे स्वीकारतो. गांधीजींनी स्वत:च आपल्या कार्याच्या मर्यादा सांगितल्या.

विनोबांनी या अनुषंगाने केलेले कार्य आपल्याला पाहायचे आहे. परंतु आजही सत्याग्रह होतात अगदी अहिंसक होतात तथापि त्यांना ना समाजशास्त्राचे अधिष्ठान असते ना अध्यात्माचे. दुर्दैवाने त्यांच्या माथी अपयश येते.

याउलट साम्ययोगाची शिकवण आहे. आत्मबलाची जाणीव, ब्रह्मतत्त्वाशी एकरूपता हा साम्ययोगाचा गाभा आहे. गांधीजींनी ही वाट शोधली आणि विनोबांनी ती प्रशस्त केली.

jayjagat24 @gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या