संघमित्रा गाडेकर कुणाच्या कोण होत्या, याबद्दल बरेच काही सांगता येईल. गांधीवादी कार्यकर्ते नारायण देसाई यांच्या त्या कन्या, म्हणजे गांधीजींचे स्वीय सचिव महादेवभाई देसाई हे संघमित्रांच्या वडिलांचे वडील. तर, आईच्या मातोश्री मालती चौधरी या गांधीवादी नेत्या आणि भारताच्या संविधान-सभेतील अवघ्या १५ महिला सदस्यांपैकी एक. शिवाय, शिक्षणाने आणि अनुभवाने अणुशास्त्रज्ञ असूनही कार्यकर्ते म्हणून अण्वस्त्रविरोधी काम करणारे सुरेंद्र गाडेकर हे संघमित्रा यांचे पती… पण अशा ओळखींपेक्षाही, वैद्यकीय क्षेत्रात गांधीवादी कार्य वाढवणाऱ्या कार्यकर्त्या आणि ‘अणुमुक्ती’ नियतकालिकाच्या संपादक म्हणून त्यांनी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.

संघमित्रा यांनी कोलकाता येथून एमबीबीएसचे शिक्षण घेतले होते. उत्तर प्रदेशात काही काळ आरोग्य अधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. पोषणशास्त्रातील पदव्युत्तर पदवी संपादन केली. पुढे पती सुरेंद्र गाडेकर यांच्यासह गुजरातमधील वेडछी गावात स्थायिक झाल्या. तिथेच त्यांनी अणुऊर्जा प्रकल्पांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृतीच्या उद्देशाने ‘अणुमुक्ती’ हे नियतकालिक सुरू केले. स्थानिकांत त्या उमाबेन म्हणून ओळखल्या जात.

२००१चा भूकंप व २००२मधील दंगलींमुळे गुजरातमधील कापडउद्याोगात कार्यरत कारागिरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. अनेक मुस्लीम धर्मीय महिलांनी दंगलीत पती गमावला होता. अशांना संघमित्रा यांनी आधुनिक कापड छपाई तंत्रांचे प्रशिक्षण मिळवून दिले. वेडछी येथे त्यांनी संपूर्ण क्रांती विद्यालयाची स्थापना केली. परिसरातील शाळांत हे दाम्पत्य अणुऊर्जा प्रकल्पांच्या घातक परिणामांविषयी जनजागृती करत असे.

झारखंडमधील जादुगोडा परिसरातील तीन खाणींमधून रेडिओअॅक्टिव्ह कचरा निर्माण होत होता. या खाणी ‘युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.’च्या (यूसीआयएल) अखत्यारीत होत्या. दुर्गम आदिवासी भागांतील या खाणींमुळे पाच हजार व्यक्तींना रोजगार मिळाला, मात्र रेडिओ अॅक्टिव्ह कचऱ्यामुळे सुमारे ५० हजार व्यक्तींच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाला होता. सुमारे नऊ हजार व्यक्तींना अपंगत्व, कर्करोग, श्वसनाचे विकार, गर्भपात अशा समस्यांचा सामना करावा लागला होता.

खाणकामगारांना केवळ एकच गणवेश दिला जात असे. पूर्ण आठवडाभर ते तोच वापरत आणि नंतर घरी जाऊन तो धूत असत. गणवेश धुणाऱ्या घरातील महिलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असे. परिसरातील जलाशयही प्रदूषित झाले होते. गाडेकर दाम्पत्याने या संदर्भात सर्वेक्षण करून अहवाल सादर केला होता, मात्र यूसीआयएलने कधीही हे आरोप मान्य केले नाहीत.

राजस्थानातील रावतभाटा येथील अणुऊर्जा प्रकल्पात २०१२मध्ये वायुगळती झाली. या प्रकरणात ‘इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सी’ने ‘राजस्थान ऑटोमिक पॉवर प्लॅन्ट’ला ‘क्लिनचीट’ दिली होती. गाडेकर दाम्पत्याने या परिसराचे सर्वेक्षण केले असता, तिथे कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय असल्याचे स्पष्ट झाले, मात्र कंपनीवर कारवाई झाली नाही.

उच्चविद्याविभूषित गाडेकर दाम्पत्य आयुष्यभर अजिबात गाजावाजा न करता, यशापयशाची तमा न बाळगता अतिशय चिकाटीने आणि अत्यंत महत्त्वाचे काम करत राहिले. साधी राहणी असलेल्या संघमित्रा नियमितपणे सूतकताई करत. त्यांनी पालकांकडून लाभलेला गांधीवादाचा, सत्याग्रहाचा वारसा आयुष्यभर जपला.