‘बिदागीतला काही वाटा म्हैसूर दसऱ्याचा तुमचा कार्यक्रम ठरवणाऱ्या अधिकाऱ्यांनाही मिळाला पाहिजे,’ असा निनावी दूरध्वनी आल्याची तक्रार राजीव तारानाथ यांनी गेल्या वर्षी केली मात्र, साक्षात म्हैसूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तारानाथ यांच्या घरी येऊन त्यांचे म्हणणे ऐकले आणि त्याच संध्याकाळी कर्नाटकच्या सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी चौकशीची घोषणा केली! कलाकार म्हणून हा नैतिक दबदबा राजीव तारानाथ जपू शकले, कारण कला म्हणजे निव्वळ कौशल्याचे सादरीकरण नसून तो मानवी स्वातंत्र्याचा आविष्कार आहे, हे त्यांना मनोमन पटले होते. संगीताचे नुकसान कधीच होत नसले तरी, राजीव तारानाथ यांच्या निधनाने कलानिष्ठांच्या आधीच अल्पसंख्य असलेल्या समाजाचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध : डॉ. ए. जे. टी. जॉनसिंग
वडील पंडित तारानाथ राव (हट्टंगडी) यांच्याकडून संगीताचा वसा त्यांना मिळाला आणि आई सुमतीदेवी यांच्याकडून सुधारकी, आधुनिकतावादी विचारांचा वारसा. ‘टी. एस. इलियट यांच्या कवितेतील प्रतिमासृष्टी’ या विषयात अवघ्या २२ व्या वर्षी पीएच.डी. मिळवण्यापूर्वी एम.ए.ला म्हैसूर विद्यापीठाचे इंग्रजीतले सुवर्णपदक त्यांनी पटकावले होते. वडिलांनी गायक म्हणून घडवले असूनही, कार्यक्रमांच्या फंदात न पडता महाविद्यालयांत शिकवण्याचा पेशा राजीव यांनी पत्करला.‘बिढार’न्यायाने सहासात महाविद्यालयांत एकेक वर्ष काढल्यावर मात्र त्यांचा प्राध्यापकी-प्रवास कोलकात्याच्या संगीत अकादमीत, गुरचरणी संपला. हे गुरू म्हणजे अली अकबर खान. अल्लादियाखाँ यांचे पुत्र, अन्नपूर्णादेवींचे बंधू, रविशंकर यांचे गुरुबंधू. विद्यार्थीदशेत रविशंकरांची सतार ऐकायला गेलेल्या राजीव यांनी अली अकबरांची सरोदही ऐकली, तेव्हाच ठरले होते- शिकेन तर सरोदच आणि तीही यांच्याकडेच. पाचव्या वर्षापासून अब्दुल करीमखाँसह अनेकांच्या तबकड्या ऐकत वाढलेला कान, किराणा घराण्याच्या गायकीची उत्तम जाण आणि आदल्या सहासात वर्षांत अली अकबर खानांकडून कधीमधी मिळालेले सरोदचे धडे, एवढेच भांडवल. त्याला निष्ठेची साथ होती, जाणकारी होती, त्याहीमागे वैचारिक भान होते, म्हणून राजीव तारानाथ मोठे झाले.
हेही वाचा >>> उलटा चष्मा : नकोच तो ‘परिवार’!
‘हिंदुस्तानी संगीतात गळा आणि वादन अशी स्पर्धा नाहीच- राग महत्त्वाचा, रसपरिपोष त्याहून महत्त्वाचा. त्यामुळे वाद्या साथीला असले तर गायकाच्या भोवतीने फिरून समेवर नेमके भेटते: एकल वादन ‘गायकी अंगाने’ झाल्याचे कौतुक होते, पण खरा वादक या गायकी अंगाच्याही पुढे जाऊन रसनिर्मिती कशी करता येईल हे शोधत असतो’ यासारखे विचार मांडू लागले. संगीत नाटक अकादमी (२०००), पद्माश्री (२०१९) यांसारखे पुरस्कार मागोमाग आले. त्यांचा आवडता यमन, ललित, अली अकबर खानांनी रचलेला ‘चंद्रनंदन’ यांच्या ध्वनिमुद्रणांतून राजीव तारानाथ यापुढेही भेटत राहतील