‘सतीश शहा हे अभिनेते होते’ – असे भूतकाळातले वाक्य आता त्यांच्या निधनानंतर खरे ठरेलच. पण २०१४ नंतर त्यांनी नव्या भूमिका स्वीकारल्या नाहीत किंवा त्यांना कुणी त्या दिल्याही नाहीत. त्यामुळे गेली दहा वर्षे, अभिनेता असणे हा त्यांचा भूतकाळच ठरला होता. ‘मला मिळालेली भूमिका करताना मला मजा आली पाहिजे… मजा नाही आली, तर भूमिका मिळूनही काय उपयोग?’ असे समर्थन ते करीत.
मुंबईतच वाढलेल्या आणि त्यामुळे ‘हरतऱ्हेची माणसे निरखून पाहता आली’ हे आवर्जून सांगणाऱ्या सतीश शहा यांचा जन्म (१९५१) सुखवस्तू कुटुंबातला. अभिनयाची आवड मुंबईच्या झेवियर्स महाविद्यालयात असतानापासूनची. या महाविद्यालयात फारुख शेख हे त्यांचे सीनियर. या दोघांचे मैत्र जुळले आणि अभिनयातच करिअर करावी का, असा विचारही सतावू लागला. बीए उत्तीर्ण झाल्यानंतरची ‘दोन वर्षे तरी मिळतील, पुढचे पुढे पाहू’ म्हणत ते पुण्यात ‘एफटीआयआय’मध्ये गेले. पण त्यानंतर मुंबईत फारशा भूमिका मिळेनात.
सईद मिर्झा यांच्या ‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी सतीश यांना पहिली सह-भूमिका मिळाली. मग सईद मिर्झांनीच ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’मध्येही भूमिका दिली. प्रत्यक्ष सेटवर असल्याचे समाधान मोठे… अर्थप्राप्ती जवळपास नाहीच, अशा त्या भूमिकांच्याच माळेतल्या आणखी एका भूमिकेबद्दल कुंदन शहा यांनी विचारले.
पण ‘जाने भी दो यारों’मधल्या त्या भूमिकेने मात्र करिअरची वाट रुंद केली! या चित्रपटात ते लक्षात राहिले ‘डिमेलोचे प्रेत’ म्हणूनच; पण महापालिका आयुक्त असलेल्या या डिमेलोसाहेबांच्या केबिनमध्ये ‘त्यांची छायाचित्रे काढण्याच्या मिषाने दोघे छायापत्रकार (रवी वासवानी आणि नसिरुद्दीन शाह) जातात आणि टेबलावरल्या कागदपत्रांचे फोटो टिपतात’, या संवाद अथवा फारशा हालचालीसुद्धा नसलेल्या प्रसंगात शहा आणि शाह यांनी एकमेकांशी नजरानजर करत जान आणली!
यानंतर कोणत्याही भूमिकांना ‘नाही’ म्हणायचे नाही. भूमिका एकसुरी असल्या तरी चालेल, पण आपण आपली किंमत मिळवत राहायचे असे सतीश शहांनी ठरवले खरे; पण अनेकपरींच्या अभिनयाला वाव देणारी ‘यह जो है जिंदगी’ ही चित्रवाणी मालिका मिळाली. प्रत्येक भागात निराळी भूमिका, अशा ५५ भूमिका या मालिकेत त्यांनी केल्या. ‘थट्टी इयर्स का एक्स्पीरियन्स’, ‘व्हॉट ए रिलीफ’ या शब्दप्रयोगांतून, ‘टीव्ही मालिकांतूनही डायलॉग लोकप्रिय होतात’ हे त्यांनी पहिल्यांदाच सिद्ध केले! ‘आरे बटर’च्या जाहिरातीत या मालिकेतल्या स्वरूप संपतसह शहादेखील दिसले, इतकी त्यांची लोकप्रियता होती.
मात्र रामसे यांच्या भयपटांतही ‘काय हरकत आहे करून पाहायला? मुरुड-जंजिऱ्याचा माजी संस्थानिक असलेल्या मित्रासाठी करतोय हे!’ असे म्हणत भूमिका स्वीकारणे, ‘मी मला मजा येते म्हणूनच अभिनय करतो आहे’ या खुशीतच सदैव वावरणे अशा काही कारणांमुळे बदलत्या ‘इंडस्ट्री’मध्ये ते बस्तान बसवू शकले नाहीत. तरीही ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मधल्या छोट्या भूमिकेत ‘जीनियस नही इंडीजीनियस’सारखी उत्स्फूर्त कोटी करून त्यांनी मजा आणली होती. या ‘मजेत अभिनय’ शैलीला पुरेपूर न्याय देणाऱ्या ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेची आठवण त्यांच्या निधनानंतरही अनेक जण काढतील.
