अभिजित केंभावी
‘आयुका’ किंवा आम्ही खगोलशास्त्रज्ञ हे काही उत्पादन तयार करणारे किंवा कोणत्याही प्रकारची सेवा देणारे नाही. मात्र, आमच्या कामामुळे लोकांचा फायदा होतो, हे लोकांना समजले पाहिजे. त्यासाठी संस्थेत सर्व प्रकारच्या व्यक्तींची वर्दळ असली पाहिजे, हे डॉ. जयंत नारळीकरांना नीट माहीत होते. आम्ही तो वारसा त्यांच्याकडून घेतला. आता नव्या पिढीनेही तो पुढे नेला पाहिजे…
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचा मला दीर्घ काळ सहवास लाभला. विद्यार्थी, सहकारी म्हणून त्यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी उभारणी केलेल्या आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगौलभौतिकी केंद्र या संस्थेसाठी काम करता आले. या अनेक वर्षांच्या सहवासात त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकता आल्या. त्यांचा वैज्ञानिक विचार पुढे नेण्याचा माझ्या परीने प्रयत्नही केला. स्वत:विषयी कमी बोलणे, कामात पूर्ण स्वातंत्र्य देणे, वेगवेगळे विचार समजून घेणे अशा त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचा माझ्यासारख्या अनेकांवर खूप प्रभाव आहे.
मी लहानपणापासूनच डॉ. नारळीकर यांच्याविषयी ऐकले होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर कधी तरी काम करायला मिळावे, अशी इच्छा होती. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला मी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (टीआयएफआर) असताना ते तिथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. ‘टीआयएफआर’मध्ये आल्यावर त्यांनी एक अभ्यासक्रम तयार केला होता. त्यात माझी कामगिरी चांगली झाली होती. त्यामुळे त्यांनी मला विद्यार्थी म्हणून स्वीकारले. तेव्हापासून मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. ते अतिशय उत्तम पद्धतीने शिकवत. त्यांनी शिकवलेले नीट समजत असे. त्यातून आम्ही विद्यार्थी म्हणून प्रेरित झालो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पीएच.डी. केली. पुढे त्यांच्याच शिफारशीने ‘टीआयएफआर’मध्ये मला नोकरीही मिळाली. त्यामुळे आम्ही सहकारी झालो.
१९८९ च्या सुमारास प्रा. यशपाल यांनी एका संस्थेच्या उभारणीचा प्रस्ताव डॉ. नारळीकर यांच्यासमोर ठेवला. त्या वेळी त्या संस्थेचे स्वरूप काय असेल, हे काहीच माहीत नव्हते. मुख्य म्हणजे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर काही तरी करायचे, त्या संस्थेच्या माध्यमातून आपली विद्यापीठ व्यवस्था, खगोलशास्त्रात वाढ व्हावी या हेतूने ते काम झाले. ही संस्था पुण्यात उभारावी असे ठरले. तत्कालीन पुणे विद्यापीठात प्रा. नरेश दधिच होते. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका) या संस्थेची उभारणी केली.
आधी ‘आयुका’चे स्वरूप अगदी लहान होते. मात्र, आता ती जागतिक पातळीवर कार्यरत असलेली संस्था झाली आहे. आम्ही ‘आयुका’चा विचार करत असताना, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात फार मोठा बदल होत होता. त्या वेळी संगणक वगैरे फार महाग होते. डेस्कटॉप येऊ लागले होते. त्या वेळी आम्हाला वाटले, की या क्षेत्राचा पूर्णपणे फायदा करून घेतला पाहिजे. नारळीकरांना संगणक फार वापरावा लागत नसला, तरी संगणकाचे महत्त्व त्यांना पूर्णपणे माहीत होते. त्यामुळे संगणकाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहनच दिले. भारतातील पहिले वेबपेज ‘आयुका’चे तयार झाले. त्या वेळी ‘अर्नेट’ नावाच्या एक संस्थेद्वारे लोकांना ई-मेल मिळायचे. ‘आयुका’ त्या संस्थेचे केंद्र झाली. त्यामुळे महाराष्ट्रात आमच्याद्वारे ई-मेल जात.
आज आपण ज्याला विदा विज्ञान म्हणतो, त्या क्षेत्रात काम करण्यासाठीही नारळीकर यांनी पूर्ण मोकळीक दिली. नारळीकर सर्वांना संशोधनासाठी प्रोत्साहन देत. त्यामुळे आवडेल त्या विषयात संशोधन करण्याची मुभा असे. माझे विद्यार्थी आहात, तर मी सांगीन तेच करायचे, असे त्यांचे नव्हते. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या दिशांना जाऊन काम करू लागलो. ‘आयुका’त भरती करताना त्यांनी चांगल्या लोकांची निवड केली. ‘आयुका’चे काम सुरू झाले, त्या वेळी जबाबदारी फार मोठी होती. ते आम्हाला समजून घेत, क्वचित कधी तरी रागावत. पण, त्यांच्या वागणुकीचा आमच्यावर फार प्रभाव पडला. लोकांशी कसे वागावे, लोकांना कसे समजून घ्यावे, लोकांचा चांगुलपणा वाढण्यासाठी कसे प्रोत्साहन द्यावे, हे आम्हाला त्यांच्यामुळे समजले. अर्थात, हे काही त्यांनी अभ्यास करून समजून घेतले होते असे नाही, तर त्यांचा नैसर्गिक स्वभावच तसा होता. त्यामुळे लोकांनाही त्यांच्याविषयी आपुलकी वाटत असे.
डॉ. नारळीकर हे वेगळेच व्यक्तिमत्त्व होते. ते काम करत, पण त्यावर फार बोलत नसत. मी कोणी तरी मोठा आहे, मला अगदी लहानवयात मानसन्मान मिळाले आहेत, असे कधीही त्यांच्या वागणुकीतून, बोलण्यातून जाणवत नसे. अत्यंत साधेपणाने त्यांचे वावरणे, बोलणे असे. नारळीकर शांतपणे आपले काम करत, पुस्तके लिहित. मराठीत गोष्टी लिहित. देशभर फिरून भाषणे देत. त्यांच्या भाषणांत सोपेपणा असे. त्यामुळे ते लोकांना आपले वाटत. एक प्रकारची जवळीक वाटे. काही थोर लोक दूरवर राहतात, तर काही जवळचे वाटतात. ‘आयुका’तील प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमात नारळीकरांनी आपल्या प्रश्नाला उत्तर दिले, याचे लोकांना समाधान वाटत असे. इतके ते लोकांना आपलेसे वाटत.
डॉ. नारळीकर ‘आयुका’तून निवृत्त झाल्यावर तत्कालीन नियामक मंडळाने त्यांना ‘एमिरेटस प्रोफेसर’ म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. एमिरेटस प्रोफेसरला संस्थेकडून पगार वगैरे काही मिळत नाही. मात्र, शैक्षणिक सुविधा मिळतात. नारळीकर ‘आयुका’चे संचालक असतानाही लोकांना संशोधनासाठी काही कल्पना सुचवून सोडून देत. निवृत्तीनंतर त्यांनी कधी संस्थेतील कामात हस्तक्षेप, ढवळाढवळ केली नाही. आपणहून जाऊन काही विचारले, तर ते सांगत. एमिरेटस प्रोफेसर झाल्यावर आठवड्यातून तीन दिवस ते ‘आयुका’त येत, शेवटी शेवटी आठवड्यातून एक दिवस येऊ लागले. त्यांचा ‘आयुका’वर नेहमीच वरदहस्त होता. त्यांच्यानंतर आता ती पोकळी जाणवणार आहे.
‘आयुका’चा पाया फार भक्कम आहे. नारळीकरांनंतर प्रा. नरेश दधिच आणि त्यांच्यानंतर मी संचालक होतो. मात्र, आपला दृष्टिकोन लोकांवर प्रमाणाबाहेर लादायचा नाही, हे आम्ही नारळीकरांकडूनच शिकलो. आताच्या पिढीनेही ते समजून घेतले पाहिजे. प्रत्येकाचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते, हे लक्षात ठेवले पाहिजे. ‘आयुका’मध्ये विज्ञान आणि कला यांची सांगड घालण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे विज्ञानाशी थेट संबंध नसलेल्या, पण विज्ञान आणि वैज्ञानिकांविषयी आपुलकी वाटणाऱ्या लोकांना ‘आयुका’त आणणे, त्यांचे विचार समजून घेणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, अभिनेते, गायक असे कलावंत… आपल्याच शास्त्रात आपण गुंतून पडलो, बाहेरच्या जगाशी संबंध ठेवला नाही, तर लोकांना आपल्याविषयी आपुलकी वाटणार नाही. आयुका किंवा आम्ही खगोलशास्त्रज्ञ हे काही उत्पादन तयार करणारे किंवा कोणत्याही प्रकारची सेवा देणारे नाही. मात्र, आमच्या कामामुळे लोकांचा फायदा होतो, हे लोकांना समजले पाहिजे. त्यासाठी संस्थेत सर्व प्रकारच्या लोकांची वर्दळ असली पाहिजे, हे नारळीकरांना नीट माहीत होते. आम्ही तो वारसा त्यांच्याकडून घेतला. आता नव्या पिढीनेही तो पुढे नेला पाहिजे.
समाजातील अंधश्रद्धांबाबत जागृती करण्याचा प्रयत्न नारळीकरांनी केला तो काळ निरागस होता. धर्म आणि अंधश्रद्धा यात फरक आहे. नारळीकर धर्माविषयी बोलत नसत. मात्र, अंधश्रद्धा मानणे, त्यातून नफा मिळवणे, लोकांना घाबरवणे या विरोधात त्यांनी बरेच प्रयत्न केले. समाजात अंधश्रद्धा वाढणे, कमी होणे हे होतच राहते. मात्र, समाजाला जागरूक करण्याचे प्रयत्न आपण सुरूच ठेवले पाहिजेत. त्याशिवाय लोकांना विज्ञानाकडे आकर्षित केले पाहिजे. सगळ्याच जगाने खगोलशास्त्र शिकावे, त्यात काम करावे असे नाही. खगोलशास्त्र हे केवळ लोकांना विज्ञानाकडे आकर्षित करण्याचे माध्यम आहे. त्यामुळे लोकांना विज्ञानाकडे आकर्षित करणे महत्त्वाचे आहे. डॉ. नारळीकर यांच्यानंतर आता ती जबाबदारी मोठी आहे.