देशपातळीवरील असे मोजकेच लेखक आढळतात ज्यांच्या लेखनात भारतीय समाजजीवन असंख्य पापुद्र्यांसह दिसून येतं. ज्यांना लोकजीवनाबद्दल कमालीची जिवंत आस्था आहे, अशा लेखकांमध्ये शिवराम कारंत यांचा समावेश होतो. त्यांचं वैशिष्ट्य हे की मनस्वीपणे जगताना त्यांनी जोखीम पत्करली. खात्रीशीर मिळकतीचे मार्ग स्वीकारून सुरक्षित जगण्यापेक्षा ते स्वत:च्या अटीवर जगले…
‘‘१९२२साली मी इतरांप्रमाणेच महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलनात सहभागी झालो होतो. स्वातंत्र्यलढ्यात आपले कर्तव्य बजावण्यासाठी मी हे केले होते. देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्हाला प्रचंड आनंद झाला. प्रजासत्ताकाची स्थापना झाली. आपल्या देशाने संविधान स्वीकारले त्याचे मनोमन समाधान वाटले, पण हा आनंद दीर्घकाळ टिकला नाही. ज्यांनी संविधान रक्षणाच्या गोष्टी केल्या, त्यांनीच संविधानातील मूलभूत अधिकारांचा गळा घोटण्याचे काम केले.

अखेर आमच्यावर सत्ता गाजवणाऱ्या एका व्यक्तीच्या इच्छेने जणू न्यायिक अधिकार हिरावून घेतले. ही परिस्थिती पाहून मला वयाच्या ७४ व्या वर्षी मान खाली घालावी लागत आहे. मी हे मानायलाच तयार नाही की कुणा एका व्यक्तीला जनतेचे व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा अधिकार आहे. अनेक दशके झाली राजकारणापासून दूर आहे तरी एक लेखक म्हणून जनतेवर होणाऱ्या अन्यायाचा प्रखर विरोध करावा लागत आहे. या कृतीने काही नाही झाले तरी माझ्या मनाला समाधान तरी लाभेल. हाच विचार करून मी पुरस्कार परत करत आहे.’’

प्रसिद्ध कन्नड लेखक शिवराम कारंत यांनी आणीबाणी लागू झाल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांना एक पत्र लिहून पद्माभूषण पुरस्कार परत केला होता. हे पत्र लगेचच त्यांनी प्रसिद्धीस दिलं नव्हतं. केवळ चर्चा व्हावी हा उद्देश नाही तर एक विवेकी कृती म्हणून मला ते आवश्यक वाटतं असं त्यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केलं आहे. एखादी व्यक्ती जीवनाच्या किती भिन्न क्षेत्रांत आपला प्रभाव टाकते हे कारंत यांच्यावरून लक्षात येईल. सर्जनशील लेखन, ज्यात कादंबऱ्यांपासून ते नाटकांपर्यंत सर्व वाङ्मय प्रकार आहेत. जोडीला उत्तम अनुवादाचं कार्य, लहान मुलांसाठीचं लेखन, प्रकाशन, संगीत, नाटक, नृत्य अशा कलाक्षेत्रातलं नैपुण्य या विविध अंगांनी कारंत यांचं व्यक्तिमत्त्व समृद्ध होतं.

शिवराम कारंत, कुवेंपू अर्थात कुपल्ली वेंकटप्पागौड़ा पुटप्पा आणि द. रा. बेंद्रे या वेगवेगळ्या भागांतल्या तिघांनी कन्नड साहित्यात मोलाचं योगदान दिलं. त्यातले कारंत हे दक्षिण कर्नाटकातले. सागरी किनाऱ्याच्या प्रदेशातले. त्यांचं हे वेगवेगळ्या क्षेत्रातलं काम पाहून आणि विविध कला प्रकारांशी असलेलं त्यांचं नातं लक्षात घेता अनेकदा त्यांची तुलना रवींद्रनाथ टागोर यांच्याशी केली जाते. रवींद्रनाथांनंतर इतकं बहुपेडी आयुष्य जगणारा अन्य कोणी लेखक दिसत नाही, असं त्यांच्या बाबतीत म्हटलं जातं. आयुष्यभर कर्नाटकाच्या विविध भागांत त्यांनी भटकंती केली. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे विवेकी नजर आणि ज्ञानाची तहान घेऊन ते देशभर फिरले. अनेक कादंबऱ्या लिहिल्या, लहान मुलांसाठी कोशवाङ्मय आणि विपुल लेखन केलं. यक्षगान या लोककला प्रकाराचं पुनरुज्जीवन करून नव्या आयामासह ते आधुनिक परिवेशात आणण्यात कारंत यांचं योगदान महत्त्वाचं मानलं जातं.

यक्षगानाचा इतिहास मोठा आहे. कर्नाटकात ही अद्भुत कला विशेषत: समुद्रकिनारी जिल्ह्यांनी जोपासली. यक्षगानाच्या शास्त्रीय पैलूंमध्ये कारंत यांना रस होता. समकालीन अभिरुचीनुसार त्यांनी या कलेला आकार देण्याचा प्रयत्न केला. या कला प्रकाराचा पारंपरिक चाहता वर्ग झपाट्याने कमी होत चालला असताना नव्या पिढीलाही या कला प्रकाराबद्दल आकर्षण वाटावं यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. वेशभूषेपासून ते संगीतापर्यंत अनेक बाबतींत सुधारणा केली. मनस्वी असं जगत असतानाच आयुष्यातली जोखीम पत्करली. खात्रीशीर मिळकतीचे मार्ग पत्करून सुरक्षित जगण्यापेक्षा स्वत:च्या अटीवर ते जगले. वयाच्या साठाव्या वर्षी मी लोकप्रिय आहे आणि कर्जबाजारीही. अशी त्यांच्या बाबतीतली एक नोंद आढळते.

‘बेट्टद जीव’ या नावाची त्यांची कादंबरी मराठीत ‘डोंगराएवढा’ या नावाने आहे. तसं कारंतांच्या अनेक कादंबऱ्या मराठीत आलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या अनुवादकांनी आणलेल्या आहेत. त्यामुळे मराठी वाचकांना त्यांच्या कादंबऱ्यांचा परिचय आहे. ‘बेट्टद जीव’ या कादंबरीत सायंकाळच्या वेळी गावी जाण्यासाठी निघालेला एक नायक आहे. जंगलात तो रस्ता हरवतो. दोन वाटसरू त्याला एका वस्तीवर थांबायला सांगतात. तिथं गेल्यानंतर आता या ठिकाणी रात्रभर मुक्काम करू आणि पुन्हा आपल्या वाटेने निघून जाऊ असा विचार करणाऱ्या या नायकाला वस्तीवरच्या कुटुंबाकडून खूपच आस्थेवाईक अनुभव येतो. गोपालय्या आणि त्यांची पत्नी शंकराम्मा हे दाम्पत्य अतिशय प्रेमळ वागणूक देतं. त्यामुळे नायक तथा निवेदक हरखून गेला आहे. त्याचा इथला मुक्काम वाढत जातो. इथं त्याच्याकडून होणारी भटकंती, निसर्गाचं वाचन, बंधमुक्त जगण्याचा अनुभव यामुळे तो इथल्या जगात रमतो. तसं हे गाव अतिशय दुर्गम. मोठमोठे पहाड, नद्या, जंगल असा भूगोल लाभलेलं. अशा गावात एखाद्या पहाडाप्रमाणे जबर जीवनेच्छा बाळगणारा गोपालय्या टणक आणि मजबूत इच्छाशक्ती असलेला आहे. एक जिवंत आणि रसरशीत असा अनुभव ही कादंबरी वाचकांना देते.

एकूणच लिहिण्यामागची या लेखकाची भूमिका विशाल आहे. सुरुवात गुप्तहेर कथा लिहिण्यापासून झाली. जे प्राथमिक लेखन केलं ते महत्त्वाचं नव्हतं आणि आधीच्या या लेखनात प्रामाणिकतेचा अभाव आहे, हे जेव्हा उमगलं तेव्हा कारंत यांची जीवनदृष्टी बदलल्याचं दिसतं. सामाजिक स्थिती आणि या स्थितीत जगणारी पात्रं कृत्रिम वाटू लागली होती. मानवी दु:ख समजून घेण्यासाठी केवळ एखाद्याचं आयुष्य तपासून चालत नाही, एकूण मानवी वर्तन तपासता आलं पाहिजे. माझ्यासाठी वर्तमान हेच सर्व काही आहे. माझ्या भोवती कोट्यवधी जीव आहेत आणि या पृथ्वीच्या संपत्तीत त्यांचाही वाटा आहे. म्हणून मला त्यांच्याशी संवादी असलं पाहिजे. इतरांना त्रास द्यावा किंवा माझ्या गरजा ओरबाडून घ्याव्यात हे कदापिही होता कामा नये. मानवी परिस्थितीच्या कारणांचं विश्लेषण करताना मी स्वत:ला कधीही इतर समाजापासून वेगळं करू नये. यासारखी त्यांची विधानं पाहिली म्हणजे या लेखकाचा प्रकृतिधर्म किती चिंतनशील होता याची खात्री पटते.

‘हुच्चु मनस्सिन हत्तु मुखगळु’ हे कारंत यांचं आत्मचरित्र. या आत्मचरित्रात अनेक घटना प्रसंग आहेत. हिंदी भाषेत ‘पगले मन के दस चेहरे’ या नावाने हा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. त्यांचा एकूण कला-प्रवास आणि जडणघडण त्यातून प्रतिबिंबित होते. जीवन, लेखन, राजकीय सामाजिक कार्य, नाट्य आदि संदर्भात बारकाव्यांशी अनेक अनुभव आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी इथं १९८० साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचाही संदर्भ आहे. काही लोक आपल्याला निमंत्रण देण्यासाठी आले. त्यावरून या संमेलनासाठी गेलो होतो. अन्य भाषिक लेखकाला उद्घाटनासाठी बोलावण्याची परंपरा ही मोठीच गोष्ट आहे. एक वेगळा अनुभव या संमेलनाने दिला अशी आठवण या आत्मचरित्रात आहे. मराठी माणसांच्या काव्यप्रेमाबद्दलचा विशेष उल्लेख यात वाचायला मिळतो. त्यांच्या ‘मूकज्जिय कनसुगलु’ या कन्नड कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ‘ग्रोइंग अप कारंत’ या नावाने अलीकडे त्यांच्या मुलांनी लिहिलेलं चरित्र आलं आहे. उल्लास कारंत, मालविका कपूर, क्षमा राऊ या तिघांनी हे लेखन केलं आहे. यात केवळ गौरवपर लेखनाऐवजी आपल्या वडिलांना नव्याने समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

देशपातळीवरील असे काही मोजके लेखक आढळतात ज्यांच्या लेखनात भारतीय समाजजीवन असंख्य पापुद्र्यांसह दिसून येतं. समाजातल्या अगदी तळाच्या वर्गापासून ते उच्चवर्णीय आणि सरंजामी व्यवस्थेपर्यंत कारंत यांनी इथलं लोकजीवन अभ्यासलं आहे याचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून पदोपदी येतो. निसर्ग, सृष्टी जीवन यासंबंधीसुद्धा अत्यंत खोलवर असे तपशील त्यांच्या लेखनात आढळतात. ज्यांना लोकजीवनाबद्दल कमालीची जिवंत आस्था आहे, अशा लेखकांमध्ये कारंत यांचा समावेश होतो. ते केवळ युवावस्थेत, सुरुवातीलाच राजकीय, सामाजिक आंदोलनात सक्रिय होते असे नाही तर शेवटपर्यंत त्यांची कृतिशीलता अनेक घटना, प्रसंगांमधून दिसून आली होती. जशी त्यांची कादंबरी ब्राह्मण कुटुंबाचं चित्रण करते तशीच ती ‘चोमा’ या अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातली उपेक्षाही मांडते. रवींद्रनाथांबद्दल जो आक्षेप घेतला जातो त्याचे निराकरण ‘दुसरे टागोर म्हणवल्या जाणाऱ्या कारंत यांच्या लेखनात दिसून येते.