गुप्तचर विभागात काम करणाऱ्यांचे आयुष्य नेमके कसे असेल? प्रत्येकाच्या मनात याविषयी कुतूहल असते. तसे नसते, तर या विषयावरच्या चित्रपटांच्या आणि पुस्तकांच्या मालिकांना प्रचंड प्रतिसाद मिळाला नसता. या गूढ विश्वात डोकावण्याचा प्रयत्न आजवर अनेकांनी केला, पण ते त्यात यशस्वी झाले आहेत की नाहीत, याचे मूल्यमापन कोण आणि कसे करणार? स्टेला रिमिंग्टन यांचे लेखन महत्त्वाचे ठरते, ते यामुळेच. ब्रिटनच्या ‘एमआय५’ या गुप्तचर संघटनेचे सर्वोच्च पद भूषवणारी ही पहिली महिला अधिकारी जेव्हा कादंबरी लिहिते, तेव्हा कल्पित आणि वास्तवातली सीमारेषा कोणती हे कळेनासे होते. मग वाचक आपापले तर्क लावत बसतात…
अतिमहत्त्वाच्या, जबाबदारीच्या पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्तीने आत्मचरित्र लिहिणे यात काही नवे नाही. त्यांचे अनुभव वाचकांना समृद्ध करणारे असतातच, पण स्टेला यांनी एका आव्हानात्मक जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर लेखनातही प्रदीर्घ कारकीर्द घडवली. लेखन सुरू केले तेव्हा आपल्या कादंबरीची नायिका ही महिलाच असणार, हे निश्चित केल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
आपण ज्या क्षेत्रात काम करतो, तिथे महिला कोणत्या आव्हानांना तोंड देतात, याचे वास्तवाच्या जवळ जाणारे आणि अतिरंजिततेला फाटा देणारे चित्र त्यांना वाचकांपर्यंत पोहोचवायचे होते. त्यांच्या लिझ कार्लाइल आणि मॅनन टेलर या नायिका साहसी मोहिमा फत्ते करतानाच कौटुंबिक जबाबदाऱ्या, नातेसंबंधांतली आव्हाने, कार्यालयीन राजकारण, असुरक्षितता अशा विविध पातळ्यांवरही लढा देताना दिसतात. गुप्तचर विभागात काम करणारी व्यक्तीही माणूसच असते. तिला कोणतीही दिव्यशक्ती प्राप्त झालेली नसते. तीदेखील सर्वसामान्यांप्रमाणेच विविध पातळ्यांवर झुंज देत असते, हे प्रस्थापित करण्यात स्टेला यांच्या नायिका यशस्वी ठरतात.
लिझ कार्लाइल ही त्यांची पहिली नायिका ३४ वर्षांची (अॅट रिस्क या पुस्तकात) आहे. एमआय५च्या दहशतवादविरोधी विभागात कार्यरत आहे. लिझने अनेक खबऱ्यांचे भक्कम जाळे विणून ठेवले आहे. गुप्तचर विभागातील कामकाजाचा दीर्घकाळाचा अनुभव तिच्या गाठीशी आहे. एखाद्या घटनेबाबत, माहितीबाबत आपल्याला या क्षणी काय वाटते यावर (इन्स्टिंक्ट) विश्वास ठेवून त्यानुसार झटपट पावले उचणारी आणि एखादा गुंता सोडवण्यासाठी झपाटून कामाला लागणारी अशी ही अतिशय तल्लख गुुप्तचर अधिकारी आहे.
नऊ पुस्तकांच्या या मालिकेत लिझचा सामना कधी ब्रिटिश पासपोर्टवर फिरणाऱ्या आणि देशात हल्ला घडवून आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्याशी होतो (अॅट रिस्क) तर कधी तिला एका इस्लामशी संबंधित पुस्तकांची विक्री करणाऱ्या दुकानात काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची खबर मिळते आणि त्यातून पुढे एकमेकांत गुंतलेले अनेक धागे-दोरे सोडवावे लागतात (सीक्रेट अॅसेट). ‘इललीगल अॅक्शन’ या पुस्तकात ती ब्रिटनमध्ये राहणाऱ्या रशियन गुप्तहेराचा कट अगदी अल्पावधीत वेगाने निर्णय घेऊन उधळून लावते.
‘डेड लाइन’मध्ये ती मध्य पूर्वेतील संघर्षासंदर्भात स्कॉटलंडमध्ये होऊ घातलेल्या अत्युच्चस्तरीय परिषदेला लक्ष्य केले जाण्याची खबर मिळताच प्रत्येक शक्यता पडताळत परिषदेपूर्वी प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्याचा आटापिटा करताना दिसते. कधी ती शस्त्रास्त्रांच्या व्यापारात सहभागी असलेल्या बंडखोरांच्या गटाचा माग काढते (प्रेझेंट डेंजर), तर कधी सोमालियन चाच्यांनी एका मालवाहू जहाजावर केलेल्या हल्ल्यात ब्रिटिश मुस्लीम नागरिक बेपत्ता होतो तेव्हा त्याचा शोध घेण्याच्या मोहिमेवर निघते (रिप टाइड).
‘द जिनिव्हा ट्रॅप’ या पुस्तकात ती अमेरिकी नौदलाचा उपग्रह हिंद महासागरात कोणी पाडला, त्यात रशियाचा हात आहे की अन्य कोणाचा, याच्या तपासासाठी निघते. मॅनन टेलर ही नायिका असलेल्या ‘द डेव्हिल्स बार्गेन’ आणि ‘द हिडन हँड’ या कादंबऱ्याही अशाच खिळवून ठेवणाऱ्या आणि त्याचबरोबर गुप्तचर विश्वाची झलक दाखवणाऱ्या आहेत. ओपन सीक्रेट हे त्यांचे आत्मचरित्र गुप्तचरांच्या जीवनाचा चालताबोलता आलेखच आहे.
स्टेला यांच्या कादंबऱ्यांतून ब्रिटिश गुप्तचर विभाग कसे काम करत असावा याचा आदमास वाचकांना येऊ शकतो. शीतयुद्ध काळात गुप्तचरांसमोर कोणती आव्हाने होती, इस्लामी दहशतवादाशी लढा देताना पाश्चिमात्य जगात उचलली गेलेली पावले, एमआय५ आणि एमआय६ या अनुक्रमे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या गुप्तचर आणि गुप्तहेर यंत्रणांचे परस्परसंबंध आणि या यंत्रणांतील राजकारणाशी ओळख होते.
स्टेला या गुप्तचर सेवेत अपघाताने दाखल झाल्या होत्या. एडिनबरा विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी आणि साहित्य विषयात मास्टर्स डिग्री प्राप्त केली होती. अर्कायव्हिस्ट म्हणजे संग्राहकाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या जॉन रिमिंग्टन यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. पुढे जॉन यांची भारतातील ब्रिटिश दूतावासात नियुक्ती झाली आणि स्टेलाही त्यांच्याबरोबर भारतात आल्या. तिथे असतानाच त्यांना एमआय५मध्ये कार्यरत असणाऱ्या एका उच्चपदस्थ सचिवासाठी काम करू शकाल का, असे विचारण्यात आले आणि त्या या गुप्तचर सेवेत दाखल झाल्या.
१९६८ ते १९९९ अशी प्रदीर्घ आणि झळाळती कारकीर्द घडवल्यानंतर २००४ साली त्यांनी लेखन सुरू केले. ‘अॅट रिस्क’ २००६ मध्ये प्रकाशित झाले आणि त्यांची दुसरी इनिंग सुरू झाली. अल्पावधीतच त्या चार्ल्स मॅककॅरी, ग्राहम ग्रीन, ब्रायन फोर्ब्ज यांसारख्या हेरकथा लेखकांच्या पंक्तीत जाऊन बसल्या. महाविद्यालयातील इंग्रजी आणि साहित्य विषयाचा अभ्यास त्यांना या दुसऱ्या कारकीर्दीत उपयुक्त ठरला असावा.
स्टेला यांची भाषा हा काही वेळा टीकेचा विषय ठरत असे. काही समीक्षकांच्या मते त्यांना कथानकात रंग भरता येत नसत, वापरून गुळगुळीत झालेल्या वाक्प्रचारांचा त्यात भरणा असे. पण आयुष्यभर गुप्तचर क्षेत्रासारख्या तथ्यांवर आधारित क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तीकडून कथानकात रंग भरण्याची अपेक्षा जरा जास्तच आहे. त्यांच्या कादंबऱ्यांतून प्रतिबिंबित होणारा अनुभव या क्षुल्लक त्रुटींवर मात करतो.