तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केलेल्या आजवरच्या आत्मकथनपर लेखनाचे विहंगमावलोकन करीत असताना लक्षात येते की, त्यांच्या भवतालात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, मानवेंद्रनाथ रॉय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य विनोबा भावे, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर प्रभृती मान्यवर होते नि त्यांचा प्रत्यक्ष सहवास, संपर्क, संवाद तर्कतीर्थांशी होता. तो औपचारिकतेपलीकडचा कार्यमय नि वैचारिक आदान- प्रदानाचा होता. म्हणून तर्कतीर्थांना वाटत असे की, त्यांच्या आजूबाजूचा काळ हा त्यांच्या घडणीत मोठी भूमिका बजावत आहे. त्या व्यक्ती आणि काळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत तर्कतीर्थांनी केलेले एक भाषण आकाशवाणी, पुणे केंद्राने ४ नोव्हेंबर, १९६० रोजी प्रक्षेपित केले होते. त्याचे शीर्षकच होते मुळी ‘आमच्या काळाने आम्हास असे घडवले.’
त्यात तर्कतीर्थांनी म्हटले आहे की, हे भाषण ही माझी आत्मकथा असली तरी खऱ्या अर्थाने ती ‘कालकथा’ आहे. हा ६० वर्षांचा काळ आहे. माझे जीवन म्हणजे या काळातला सूक्ष्मातील सूक्ष्म पापुद्रा आहे. या पापुद्र्यावर काळाच्या स्थित्यंतराची हस्तलक्षणे (हस्तरेषा) उमटली आहेत.
तर्कतीर्थांच्या घरचे वातावरण साधे, सनातनी व कर्मठ होते. घरातील चीजवस्तू, छापील पुस्तके व छायाचित्रे सोडल्यास अठराव्या शतकातील घराप्रमाणे होत्या. या अठराव्या शतकाच्या वातावरणात मिसळून टाकणारी एकच खिडकी त्यांच्या घराला होती, ती म्हणजे ‘केसरी’ वृत्तपत्र! १९०८ मध्ये लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा खटला होऊन दीर्घमुदतीची कारागृहवासाची शिक्षा त्यांना झाली. तर्कतीर्थांच्या घरात कारावासाची शिक्षा ऐकताक्षणी विषाद व शोकाची छाया पसरली. त्या दिवसापासून टिळकांची तसबीर तर्कतीर्थांच्या देवघरात पुजली जाऊ लागली. १९१४ मध्ये वेदाध्ययनार्थ प्राज्ञपाठशाळेत दाखल केल्यानंतर निरोप देत वडील तर्कतीर्थांना म्हणाले की, ‘‘टिळकांसमोर टिळकांच्या वाड्यात उपनिषदांवर प्रवचन करून त्यांचे आशीर्वाद मिळविण्याइतकी तयारी कर बरं!’’ तो प्रसंग तर्कतीर्थांच्या जीवनात घडून येऊ शकला नाही, तरी तर्कतीर्थ वेदाध्ययनाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी जेव्हा काशीस निघाले होते, तेव्हा त्यांनी पुण्यास जाऊन लोकमान्य टिळकांचे आशीर्वाद घेतले नि मगच काशीस प्रस्थान केले. ही होती एका अर्थाने वडिलांच्या अपेक्षेची पूर्तता.
वाईच्या प्राज्ञपाठशाळेत दिनकरशास्त्री कानडे नावाचे शिक्षक होते. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाचा खोलवर ठसा तर्कतीर्थांवर उमटला होता. ते देशभक्तांच्या कथा सांगून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय वृत्तीचे संस्कार देत. त्यामुळे आपल्यात घडून आलेल्या एका दिशांतराची नोंद करीत या भाषणात तर्कतीर्थांनी सांगितले आहे की, त्यांच्या मनाची एकमार्गी दिशा एकाएकी पूर्वेकडून पश्चिमेकडे वळली. कानडे गुरुजींनीच तर्कतीर्थांना ते विचाराने पंचाहत्तर वर्षे मागे असल्याची जाणीव करून दिल्याची आठवण या भाषणात आहे. तर्कतीर्थांवर असाच प्रभाव विनोबा भावे यांच्या प्रखर बुद्धिमत्ता, नितांत अंतर्मुखता आणि मोहक वाक्चातुर्याचा होता. तर्कतीर्थ त्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य आवडीने वाचत; पण विनोबांनी तर्कतीर्थांना ह्यसुधारकह्णकार गोपाळ गणेश आगरकरांच्या वैचारिक साहित्याच परिचय करून दिला. तसे तर्कतीर्थ इहवादी झाले. विनोबांनीच त्यांना भारतीय अध्यात्मवाद आणि गांधीवादाची उज्ज्वल बाजू समजावून सांगितली. ती जर विनोबांनी सांगितली नसती, तर आपण भौतिकवादी बनून राहिलो असतो, हे तर्कतीर्थांनी या भाषणात स्पष्ट केले आहे. अशीच गोष्ट भास्करराव जाधव यांची. त्यांच्यामुळे तर्कतीर्थांना सत्यशोधक चळवळीचा परिचय झाला.
आपण शुद्ध बुद्धिवादी महात्मा गांधी आणि मानवेंद्रनाथ रॉय यांच्यामुळे झाल्याची कबुली तर्कतीर्थ या भाषणात नि:संदिग्ध शब्दात देतात. आयुष्यात गत सहा दशकांतील व्यक्ती व आपण विचारांच्या प्रभावाने कसे बदलत गेलो, हे सांगणारे प्रस्तुत भाषण म्हणजे या काळाने त्यांना कसे घडविले याचा तो एकीकडे वस्तुपाठ आहे, तर दुसरीकडे वैकासिक आलेख म्हणून त्याचे असाधारण महत्त्व आहे. या काळात जगात जी स्थित्यंतरे घडली, त्याचा प्रभावही तर्कतीर्थांच्या जडणघडणीत स्पष्टपणे दिसून येतो. या काळानेच तर्कतीर्थांना जातिबद्ध हिंदू समाजाच्या जीर्ण, पुराणमतवादापासून बुद्धिवादमिश्रित मानवतेकडे नेले. त्यामुळे त्यांना विश्वदर्शन घडले. यामुळेच मुळात काळामागे असलेले तर्कतीर्थ उत्तरायुष्यात काळाच्या अद्यायावत क्षणांवर उभे राहू शकले.
आमच्या काळाने आम्हास घडविले!
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com