ही गोष्ट आहे कोल्हापुरी घडलेली. तो दिवस होता १ ऑगस्ट, १९५६. लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे व्याख्यान योजले होते. हा काळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा होता. तर्कतीर्थ काँग्रेसचे कार्यकर्ते आणि तत्कालीन महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस द्वैभाषिक महाराष्ट्र समर्थक होती. भाई माधवराव बागल हे संयुक्त महाराष्ट्र समितीचे कोल्हापुरातील नेते होते. भाई आणि तर्कतीर्थ एकमेकांचे स्नेही; पण राजकीय मतप्रवाह लक्षात घेता एकमेकांचे राजकीय विरोधक होते. राजकीय धोरण व नीतीचा भाग म्हणून संयुक्त महाराष्ट्र समितीने तर्कतीर्थांच्या भाषणास विरोध करण्याचा पवित्रा घेतला. कोल्हापुरातील कॉमर्स कॉलेजमध्ये भाषण होणार होते. विरोधाची नोंद घेऊन कॉलेज नि परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमानंतर तर्कतीर्थांचे स्नेहभोजन भाई माधवराव बागल यांच्याकडे व्हायचे होते.
प्रत्यक्षात भाषणास विरोध लाक्षणिक न राहता कार्यकर्त्यांच्या रोषाचा उद्रेक करणारा ठरला. पोलीस गुप्तचर विभागास याची कुणकुण लागलेली असल्याने काही पोलीस साध्या वेशातही होते. उद्रेकाचा प्रसंग इथे लिहिणे प्रशस्त नाही. तथापि, तो प्रसंग माधवराव गडकरी यांच्या ‘साहित्यातील हिरे आणि मोती’ या पुस्तकातील ‘तर्कतीर्थांच्या सहवासात’ या लेखात तर्कतीर्थांच्याच शब्दात जिज्ञासू वाचकांसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे भाषणास तर्कतीर्थ उभे राहिले नि तो कटू प्रसंग दोन-तीन मिनिटांत अनपेक्षितपणे घडला. तर्कतीर्थ क्षणभर भांबावले. ती अघटित घटना करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना गुप्तचर पोलिसांनी अटक करून सभागृहाबाहेर नेले. नंतर दुसऱ्याच क्षणी तर्कतीर्थ सावरले नि त्यांचे त्या विपरीत प्रसंगानंतरही दीर्घकाळ भाषण चालले. अटक केलेले संयुक्त महाराष्ट्र समितीचे १२-१३ कार्यकर्ते वगळता सभात्याग करणारे समितीचे कार्यकर्ते परत सभागृहात आले नि त्यांनी तर्कतीर्थांचे संपूर्ण भाषण ऐकले.
भाषण झाल्यानंतर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार तर्कतीर्थ भाई माधवराव बागल यांच्या घरी गेले. दरम्यान, घडलेल्या घटनेची कुणकुण भाईंना लागल्याने त्यांनी भूमिगत होणे पसंत केले. झाल्या प्रसंगाच्या अनुरोधाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी, भाई माधवराव बागल यांना लिहिलेले ९ सप्टेंबर, १९५६ रोजीचे अनावृत पत्र ‘मौज’ साप्ताहिकाच्या १६ सप्टेंबर, १९५६च्या अंकात प्रसिद्ध झाले. हे पत्र तर्कतीर्थ समग्र वाङ्मय संचातील ‘पत्रसंग्रह’ (खंड १३)मध्ये उपलब्ध आहे. त्यात त्यांनी लिहिले होते की, ‘‘…आपल्या निमंत्रणावरून तेव्हा मी आपणाकडे येऊन गेलो. आपली भेट होऊ शकली नाही. माझ्या अध्यक्षतेखाली भरलेल्या टिळक पुण्यतिथी सभेत काय प्रकार घडला तो आपणास कळला असेलच…’’
‘‘आपण संयुक्त महाराष्ट्रवादी आघाडीचे एक प्रमुख नेते आहात व मी काँग्रेस पक्षाचा एक सर्वसाधारण सभासद आहे. गेल्या दहा महिन्यांत जी अत्यंत खळबळीची व चिंताक्रांत सार्वजनिक परिस्थिती उत्पन्न झाली, तिची चांगली माहिती आपणा दोघांसही आहे. आपण दोघे भिन्न चाकोरीतून चाललो आहोत. परंतु, अशाही परिस्थितीत मनाने व विचाराने त्या चाकोरीच्या बाहेर पडून अधिक व्यापक भूमिकेवरून अनेक विरुद्ध प्रवाहांचा विचार करणे, ही गोष्ट सत्यशोधनाच्या आणि सर्वव्यापी हिताच्या दृष्टीने आवश्यक असते. विशेषत: संघर्षाने व विद्रोहाने भरलेल्या वातावरणात अशी भूमिका घेणे अत्यंत कठीण असले, तरी ते अत्यंत महत्त्वाचे सामाजिक कर्तव्य ठरले’’
‘‘सार्वजनिक जीवनात विशेष आवश्यक असलेला तारतम्य विचारच नष्ट होतो की काय, अशी भीती उत्पन्न झाली आहे. आणि दुसऱ्याच्या अविचाराच्या आधाराने स्वत:च्या अविवेकाचे समर्थन करण्याची प्रवृत्ती बळावू पाहात आहे. प्रतिपक्षाला (काँग्रेसला) लोकशाहीची चाड नाही, तर आम्हीच (समिती) काय म्हणून लोकशाहीच्या मर्यादा पाळायच्या, हे कानावर येणारे विधान आहे. यामुळेच सभेतील घटनेचा अर्थ होऊ (लागू) शकतो. सामाजिक जीवनाचा पाया उखडणारा हा दृष्टिकोन आहे, असे मला वाटते.’’
(उद्याच्या अंकात : तर्कतीर्थांना भाई बागलांचे खुले पत्रोत्तर)
– डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com