‘शांकरभाष्य’ शिकायला प्राज्ञपाठशाळेत आलेले विनोबा भावे १९१७ला प्राज्ञपाठशाळेतील आपले शांकरभाष्याचे अध्ययन आटोपून परत गेले. ते म्हणत असत, हे जे प्राचीन अध्ययन आहे, घटपटाची खटपट आहे, त्याने देशाचा काही उद्धार व्हायचा नाही, तर आधुनिक शिक्षण घेतले पाहिजे आणि या देशामध्ये यंत्रोद्याोग आले पाहिजेत. ‘त्याच्यासाठी तुला अमेरिकेत जरी जावे लागले तरी जा,’ असे ते मला म्हणाले. मी स्वामी सत्यदेव यांचे हिंदीमधील निबंध वाचले होते. हे स्वामी सत्यदेव कामगार नेते होते; पण होते संन्यासी. त्यांचा आशयही असाच होता. याचा माझ्या विचारावर फार परिणाम झाला. मी तोपर्यंत आगरकरांचेही निबंध वाचले होते आणि जुन्या परंपरेवरील माझी श्रद्धा ढिली झाली होती, मात्र नेस्तनाबूत नव्हती झाली. तेव्हा मी स्वामींना न सांगताच विनोबांबरोबर बडोद्याला त्यांच्या घरी इंग्रजी शिकायला गेलो. माझ्याबरोबर दामोदरशास्त्री कोनकर आणि धुंडिराज देव होते. ते पुढे सेनापती बापटांचे सहकारी झाले. त्यावेळी दिनकरशास्त्री कानडे हे राजकीय नेते, क्रांतिकारक आणि उत्कृष्ट वक्ते असलेले पाठशाळेच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांनी आमचा सुगावा काढला.

मी कुणालाही न सांगता निघून गेलो. कारण, मला सरळ परवानगी मिळणार नाही, याची खात्री होती. विशेष म्हणजे, मी कुठे गेलो याचा पत्ता पोलिसांनाही लागला नसता. कारण, माझा वेश तोपर्यंत गोसाव्याचा होता. म्हणजे जटा होत्या, मिशा नव्हत्या. कारण, मी १७ वर्षांचा होतो. बडोदा स्टेशनवर पोहोचलो, तेव्हा तेथे जवळच केस कापून घेतले आणि गोटा केला. आम्ही तिघे विनोबांच्या घरी गेलो. त्यांनी आमची व्यवस्था केली होती. तिथे एक विद्यार्थी मंडळ होते. आम्ही तिथे रावपुऱ्यामध्ये राहिलो.

विनोबांनी मला इंग्रजी शिकविले. हे माझे शिक्षणही व्युत्पत्ती पद्धतीने झाले. म्हणजे तर्खडकरांची भाषांतरमाला -तीन पुस्तकांची – तीन महिन्यांत पुरी झाली. त्यानंतर ‘टीचिंग ऑफ ख्राइस्ट’ हे टॉलस्टॉयचे सोप्या भाषेतील पुस्तक, ‘सॅन्फर्ड अॅण्ड मर्टन’. हे पुस्तक आणि लॅबचे ‘टेल्स फ्रॉम शेक्स्पीअर’ हे पुस्तक, अशी तीन पुस्तके मी सहा महिन्यांत वाचली. अर्थात् माझे स्पेलिंग कच्चे होते. ते अजूनही आहे, परंतु वाक्यरचना, संदर्भ वगैरे व्यवस्थित येऊ लागले. मी शुद्ध वाक्येही बनवीत असे. विनोबा मला जुन्या पद्धतीनेच शिकवत होते. ते मला ‘लॅब्स टेल्स’ शिकवू लागले, तेव्हा मी त्यांना म्हणालो की, तुम्ही मला शिकविण्याऐवजी, मला समजते का नाही हे पाहूया. ‘‘इंग्रजी शिकून झाले. आता आपण साबरमतीच्या सत्याग्रहाश्रमामध्ये जायचे आणि तिथे सेवा करायची,’’ असे ते म्हणाले.

हे ऐकून माझ्या मनात धस्स झाले. मी अमेरिकेला जाण्यासाठी इंग्रजी शिकत होतो आणि त्याच्याऐवजी विणकाम करायचे, चरखा चालवायचा हे काही मला पटेना. तेव्हा मी तिथूनही रात्री गुपचूप पळून गेलो. सोबत दामोदरशास्त्री कोनकर होते. धुंडिराज देव आधीच तिथून निघाला होता. कारण, मध्यंतरात कानडेशास्त्रींनी आम्हाला शोधून काढले होते आणि त्यांनी वाईला लिहिले होते, ‘हे तिघे येथे बडोद्याला सुखरूप आहेत.’ माझ्या गुरुजींना मी पळून गेलो आणि बेपत्ता झालो याचे वाईट वाटले होते. त्यांनी माझ्या वडिलांना त्याविषयी पत्र लिहिले.

वडिलांनी गुरुजींना उलट लिहिले की, ‘तुम्ही काही काळजी करू नका, तो धावेल-धावेल, थकेल आणि परतेल. यांनी म्हटल्याप्रमाणे मी परत आलो. कानडेशास्त्रींना भेटलो. मग गुरुजींची भेट घेतली. त्यांच्या पाया पडून त्यांना शरण गेलो. क्षमा मागितली. ते म्हणाले, ‘क्षमा कसली मागतोस? आलास ना? याच्यात सर्व आले.’यामुळे अमेरिकेत जाऊन आधुनिक शिक्षण घेण्याची वासना तशीच अतृप्त राहिली.

तर्कतीर्थांनी हे म्हटले असले तरी पुढे त्यांचा मुलगा मधुकर, मुलगी मालती, पुतण्या अशोक जोशी, नातू अशोक खंडकर ही सर्व मंडळी लग्न, शिक्षण, नोकरी इत्यादींच्या निमित्ताने अमेरिकावासी झाले. तर्कतीर्थ अनेकदा सपत्नीक अमेरिकेला गेले. व्याख्याने दिली. नवे वाचले आणि लिहिलेही.

– डॉ. सुनीलकुमार लवटे / drsklawate@gmail.com