तर्कतीर्थांची जी पत्रसाधने हाती आली आहेत. त्यातून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे मनुष्यसंग्रही गृहस्थ होते हे लक्षात येते. पत्रव्यवहारातून व्यक्त होणारे त्यांचे जीवनविश्व सार्वजनिक अधिक होते, हे स्पष्ट दिसते. त्यांचा राजकारण, समाजकारण, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रांतील थोरामोठ्यांशी संबंध होता. त्यामुळे त्यांचा पत्रव्यवहार महात्मा गांधी, मानवेंद्रनाथ रॉय, द्वा. भ. कर्णिक, साहित्यसम्राट न. चिं. केळकर, बाबा आमटे, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, पु. ल. देशपांडे यांच्यासह विविध संपादक, मंत्री, संस्था-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी होता, तितकाच जनसामान्य, कार्यकर्ते, मित्र, स्नेहीशींही होता. जो पत्रव्यवहार हाती आला, ते हिमनगाचे दर्शनी टोक होय. त्याआधारे आज शितावरून भाताची परीक्षा करता येणेच शक्य आहे.

त्यांची पत्रे दीर्घ, संक्षिप्त असतात; पण या पार्श्वभूमीवर ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पत्रसंग्रहा’चा विचार करता तो विविधरूपी दिसतो. त्याचा पाया सार्वजनिक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्य हाच आहे. पत्रे वैयक्तिक असली तरी त्यांचा विषय सार्वजनिक हितच असल्याचे दिसते. यातील कौटुंबिक पत्रांचा अपवाद वगळता शेषपत्रे व्यापक समाजहितार्थ लिहिलेली दिसतात. त्यात बरीच कोशकार्य, साहित्य कार्यास वाहिलेली आहेत. त्यातून तर्कतीर्थ प्रगल्भ ज्ञानसमाज निर्मू पाहात होते, हे लक्षात येते. ही धडपड मराठी लेखन व्यवहार शिस्तीचा नि शास्त्रोक्त करण्याची तर्कतीर्थांची तळमळ अनुकरणीय ठरते. आपण शिक्षित झालो खरे; पण प्रगल्भ झालो का? त्याची कसोटी जर बुद्धिवाद, विवेकवाद, जडवाद, आनंदवाद, समाजवाद असेल, तर आपण कुठे उभे आहोत? परंपरागततेतून मुक्ती हीच आपल्या प्रागतिकतेची कसोटी ठरणार असेल, तर मग ही पत्रे त्यासाठीचा मार्गदर्शक ऐवज, दस्तावेज म्हणून पुढे येतात, हे स्पष्ट होते.

एखादे पत्र स्वहस्ताक्षरात असणे आणि मिळणे त्याची रंगतच काही और असते. त्यात आत्मीयता असते! कितीतरी मोठी माणसे टंकलिखित पत्रे पाठवतात; पण त्यांना एखादे पत्र स्वहस्ताक्षरात पाठवावे वाटणे यात आपलेपणाचा ओलावा व्यक्त करण्याची भावना असते. तर्कतीर्थांनीही अनेक पत्रे टंकित करून पाठविली; पण विशेष प्रसंगी स्वहस्ताक्षरात त्यांनी लिहिली आहेत. तीच गोष्ट त्यांना आलेल्या पत्रांचीही. ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’ प्रकल्पाच्या या १३व्या खंडात अनेक स्वरूपांच्या पत्रांचा संग्रह आहे. त्यात केलेल्या वर्गवारीत स्वहस्ताक्षरातील पत्रांचा विशेष विभाग करून ती इथे प्रस्तुत केली आहेत. त्यात तर्कतीर्थांच्या हस्ताक्षरातील पत्रांशिवाय महात्मा गांधी, न. चिं. केळकर, शंकरराव देव, डॉ. हरिकृष्ण मोहनी, प्रा. मे. पुं. रेगे, पु. ल. देशपांडे, द्वा. भ. कर्णिक, भा. रा. भागवत, सुहास बहुळकर, प्रा. संभाजी कदम, प्राचार्य देवदत्त दाभोळकर यांची स्वहस्ताक्षरातील पत्रे समाविष्ट आहेत.

स्वहस्ताक्षरित पत्रे माणसाचे आपलेपण घेऊन येतात, तसेच लिहिणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वस्व त्यात प्रतिबिंबित असते. त्यात विचारांपेक्षा भावभावनांचा पाझर मोठा असतो. अशा पत्रात नात्यातील निकटता भरलेली असते. अशी पत्रे छोटी असोत वा मोठी, स्वहस्ताक्षरित म्हणून ती अपवाद ठरतात नि कालौघात त्यांना ऐतिहासिक वारशाचे स्वरूप प्राप्त होते. स्वहस्ताक्षरातील ही पत्रे वरवर औपचारिक वाटली तरी ती महत्त्वाची आहेत. तर्कतीर्थांना महात्मा गांधी भेटायला बोलवतात; पण ते महात्मा गांधींच्या जीवनातील धर्मसंकटप्रश्नी. न. चिं. केळकर पत्राद्वारे पुस्तक परीक्षण करतात; पण त्यातून पुस्तक ऐतिहासिक बनते. पु. लं. मराठी विश्वकोश नोंदीसंदर्भात पत्र लिहितात; पण ती नोंद असाधारण असते. कुलगुरू देवदत्त दाभोळकरांचे पत्र शोक प्रस्ताव आहे; पण त्यात सार्वजनिक सद्भाव भरलेला आहे. असे यातील प्रत्येक पत्राचे आगळेपण हेच त्याचे ऐतिहासिकपण ठरते.

हा सर्व पत्रव्यवहार तर्कतीर्थांच्या चित्र, चरित्र नि चारित्र्यावर प्रकाश टाकणारा असल्याने तो त्यांच्या संदर्भातील समृद्ध साधनसंग्रह आहे. विसाव्या शतकाचा उत्तरार्ध हा या पत्रांचा काळ होता. तार, टेलिफोन, टेलेक्स ही दळणवळणाची साधने समाजमनात रुजली, तरी पत्रलेखनाचं गारूड स्थिर होते. सन १९९० नंतरच्या काळात समाजात मोबाइल व इंटरनेट रूढ होत गेला, त्यामुळे आता पत्रसंवाद क्षीण पडू लागला आहे.

drsklawate@gmail.com