नारायणशास्त्री मराठे व स्वामी केवलानंद सरस्वती आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे गुरू-शिष्य नाते सर्वपरिचित आहे. नारायणशास्त्री मराठे यांनी त्यांचे गुरू स्वामी प्रज्ञानंद सरस्वती यांच्या स्मरणार्थ प्राज्ञमठाची स्थापना १९०४ मध्ये केली. त्यांच्याच नेतृत्वाखाली पंडित दिनकरशास्त्री कानडे, पंडित महादेवशास्त्री दिवेकर, सोहनी शास्त्री, नेनेशास्त्री प्रभृती मान्यवरांच्या सहाय्याने ६ ऑक्टोबर, १९१६ रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर ‘प्राज्ञमठ’चे रूपांतर ‘प्राज्ञपाठशाळा मंडळ’मध्ये करण्यात आले. त्यानंतर २१ जुलै, १९२० रोजी या मंडळाची नोंदणी करण्यात आली.

या मंडळाशी नारायणशास्त्री मराठे यांचा संबंध प्रारंभापासून ते मृत्यूपर्यंत होता. तर्कतीर्थ प्राज्ञपाठशाळेशी विविध टप्प्यांवर जोडले गेले. प्राज्ञपाठशाळेत नारायणशास्त्री मराठे पाच दशके, तर तर्कतीर्थ क्रियाशीलपणे साधारण सात दशके कार्यरत होते. उभयतांनी मिळून प्राज्ञपाठशाळा, धर्मकोश, मीमांसाकोश, नवभारत मासिक, प्रकाशन, मुद्रणालय इत्यादींद्वारे कार्य केले.

नारायणशास्त्री मराठे यांनी मतभेदांमुळे १९३१ मध्ये प्राज्ञपाठशाळेपासून स्वत:स अलग केले. ते नाममात्र सभासद आजन्म होते. १९३१ मध्येच आतूर संन्यास धारण करून ते वाई सोडून टेंभू येथे राहू लागले. १९३१ ते ३४ ही वर्षे त्यांनी भ्रमण, प्रवासात घालविली. १९३४ ला यांनी धर्मकोश मंडळ स्थापले व १९२५ मध्ये सोडलेल्या संकल्पानुसार ‘धर्मकोश’ आणि ‘मीमांसाकोश’ निर्मितीस स्वत:स समर्पित केले.

नारायणशास्त्री मराठे यांच्या राजीनाम्यानंतर प्राज्ञपाठशाळेचे संचालन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पाहू लागले. हा इतिहास सांगतो की, नारायणशास्त्री मराठे यांनी जे रोप लावले, त्याचे वटवृक्षात रूपांतर करण्यात तर्कतीर्थांचे योगदान महत्त्वाचे ठरले. स्वामी म्हणून संन्यासोत्तर काळात शिष्याने गुरूसह जे कार्य विस्तारले ते देशकालास अनुरूप होते. विचार करणारे, व्यवहारतज्ज्ञ शास्त्री निर्मिणे, धर्मोपदेशक निर्माण करणे या उद्देशाने सुरू झालेले प्राज्ञमठाचे कार्य शाळा, माध्यमिक शाळा, धर्मनिर्णय मंडळ, धर्मकोश व मीमांसाकोश निर्मिती, असे अनुदिन चंद्रकलेप्रमाणे विकसित होत राहिले.

या काळचा विस्तृत पत्रव्यवहार उपलब्ध असून, ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’मधील पत्रसंग्रहात (खंड-१३) तो जिज्ञासू वाचकांसाठी उपलब्ध आहे. त्यातील ४ एप्रिल, १९३१ चे पत्र नारायणशास्त्री मराठे यांचे असून, त्यात ‘‘सभासदांची मते आणि तज्ज्ञ अशा विद्वानांची मते मला बंधनकारक नसून, ‘सल्ला’ या स्वरूपात उपयोगात आणावयाची व शेवटचा निर्णय माझ्याच मतावर अवलंबून असायचा, अशा सर्वाधिकाराने हे ‘धर्मकोश’चे कार्य मी करावे, असे मंडळास मान्य असल्यास मला ते कार्य स्वीय सर्व खर्च करून करावयाचे आहे.’’ अशी भूमिका स्पष्ट होते. त्यानुसार ‘धर्मकोश’ आणि ‘मीमांसाकोश’चे कार्य प्रगतिशील आहे. ‘धर्मकोश’ पूर्णत्वाकडे झेपावत आहे. ‘मीमांसाकोश’ पूर्ण प्रकाशित आहे.

‘धर्मकोशा’साठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे, यासाठी तर्कतीर्थ हरप्रकारे प्रयत्न करीत होते. विशेषत: केंद्र व राज्य सरकारकडून असे सहाय्य मिळावे म्हणूनच हा पत्रव्यवहार आहे. ‘नवभारत’ मासिक प्राज्ञपाठशाळेने सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला ट्रस्टकडून अगोदर चालविण्यास घेतले. नंतर त्याचे स्वामित्व प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाईकडे आले. यासंबंधीचा पत्रव्यवहार उपलब्ध असून, तोही तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे अथक परिश्रम अधोरेखित करणारा आहे.

प्रत्येक उपक्रम स्वतंत्ररीत्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा म्हणून तर्कतीर्थांनी जी रचना व कार्यपद्धती अंगीकारली होती, ती कार्यपद्धती या पत्रव्यवहारातून प्रतिबिंबित होते. ती कार्यपद्धती तर्कतीर्थांना ‘दुर्लभ योजक’ सिद्ध करते, तद्वत कुशल प्रशासक, संयोजक, संपादकही. प्राज्ञपाठशाळा मंडळाचे अध्यक्ष म्हणून तर्कतीर्थांनी केलेले कार्य अनेकांगांनी स्पृहणीय ठरते. तर्कतीर्थ एक पत्रलेखक म्हणून ज्या चिकाटीने हा सर्व व्यवहार करतात, तो सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी अनुकरणीय वस्तुपाठ सिद्ध होतो. सामाजिक संस्थांचा महाराष्ट्राचा विकास असे सांगतो की, या संस्था व्यक्तिकेंद्रित राहतात. व्यक्ती असेपर्यंत चालतात. सक्षम उत्तराधिकारी न लाभल्यास त्यांना उतरती कळा लागते. प्राज्ञपाठशाळेचा डोलारा तर्कतीर्थांनी विचारांवर उभा केल्याने ते जाऊन तीन दशके लोटली तरी कार्यशील आहे.

drsklawate@gmail.com