‘ललित कला आणि वाङ्मय समीक्षेचे प्रश्न’ विषयावर दुसऱ्या गोमांतक मराठी साहित्य संमेलनात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी कला आणि मूल्य यांच्या संबंधावर विस्ताराने विवेचन केल्याचे दिसून येते. कला हा विषय मुळातच एका व्यापक विश्वाचा भाग आहे. यात कला, कलाकार, जीवनदृष्टी, मूल्य, नैतिकता आदी अंगांनी विचार करता येतो, हे तर्कतीर्थांनी प्रस्तुत व्याख्यानातून दाखवून दिले आहे.
‘‘कला हृद्या व आस्वाद्या असते. कला शब्दात काव्य, नाट्य, कथा, कादंबरी, गायन, वादन, नृत्य, चित्रण, मूर्तिकला, स्थापत्य इत्यादी सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो. कलेचा विचार तिचे विषय, कलामूल प्रतिभा, अनुभूती अशा विविधांगांनी करता येतो. कलेचे विविध प्रकार वा भेद हे द्रष्ट्यावर (कलाकार) होणाऱ्या संवेदनात्मक प्रतिक्रियांमधून निर्माण होतात. मानसिक प्रतिक्रिया व संकेत यांना अनुरूप वस्तुस्थिती म्हणजे मूल्य होय. मूल्ये शारीरिक, संघजीवनजन्य (सामूहिक वा सामाजिक), आर्थिक, राजकीय, धार्मिक, नैतिक, सौंदर्यरूप व ज्ञानसंबंधी अशी विविध प्रकारची असतात. ही सर्व मूल्ये कलेशी संबंधित असतात. ही मूल्ये ललित कला वा वाङ्मयाची कच्ची सामग्री असतात. भारतीय साहित्यशास्त्रातील रस, ध्वनी तत्त्वे या विचारमर्माचा भाग असला, तरी ती तत्त्वे मूल्यस्पर्शी असतात.
मूल्ये जीवनसापेक्ष असतात. कार्यप्रवण जीवनकोटी (चेतन वा सजीव) व वस्तू (जड) यांच्या संगमाने ती मूल्ये तयार होतात. जीवनरहित स्थितीत जीवनकोटीला वगळून मूल्ये राहात नसतात. मानवी मूल्ये मानवरहित स्थितीत अस्तित्वात नसतात. मानवी मूल्ये वैश्विक (कॉस्मिक) नसून, ती मानवी अस्तित्वातच असतात. ती सामाजिक असतात. जीवनातील न्याय-अन्याय, पाप-पुण्य, श्रेयस-प्रेयस, सौंदर्य-कुरूप, योग्य-अयोग्य, धर्माधर्म या सर्वांचा मध्यमेरू मानव होय. मूल्ये केवळ मानसिक किंवा जीवननिष्ठ नाहीत आणि जीवनावर विविध परिणाम करण्याची त्यांची शक्ती वस्तुनिष्ठ असते. ही परिणाम करणारी वस्तुशक्ती मूल्यांची जननी होय. जीव हाच शक्तीचा जनक आहे.
मूल्ये जीवनसंवेदनेत तयार होतात. जीवपिंडाच्या व मनुष्यांच्या ठायी परिस्थितीबद्दल ज्या सुख-दु:खादी भावना, इच्छा, द्वेष, क्रोध, भयादी विकार आणि प्रवृत्ती, निवृत्ती भाव उत्पन्न होतात. त्यांच्यापासून इष्ट व अनिष्ट मूल्यांची निष्पत्ती होते. ज्ञान, वासना, भावना या संवेदनांच्या समुच्चयाने मूल्ये सिद्ध होतात. वासनांच्या वसनात, भावनांच्या वलयात, अनुरूप विकारांच्या रंगात, ज्ञेय वस्तूंचा प्रत्यय म्हणजेच मूल्यप्रत्यय होय. शास्त्र, ज्ञान, कला इत्यादी वस्तूंचीही (व्हॅल्यू डाटा इज एक्सस्ट्रिन्टिक टू सायन्टिफिक कॉग्निशन्स) वसने, वलये रंग काढून टाकून तिचा अनुभव घ्यावा लागतो.
भारतीय दर्शने (‘प्रशस्त पादभाष्य’, इत्यादी) जीवयोनियत्न म्हणजे जीवाचे जीव अस्तित्व सतत व अविरत (नित्य) सुरू ठेवण्याचा प्रयत्न होय, असे मानतात. हा यत्न वा प्रयत्न जीवाच्या सर्व अस्तित्वास व्यापून असतो. या प्रयत्नांचे रूपांतर म्हणजे इंद्रियव्यापार, बुद्धी, संकल्प-विकल्प, भावना, इच्छा, द्वेष इत्यादी रूपांतील प्रेरणा होत. इंद्रियजन्य अनुभव, तार्किक कल्पना, निश्चय, अनुमान इ. या प्रयत्नांचीच उच्चतर परिणती होय. या प्रयत्नामुळे व्यक्तीचा इतर व्यक्तींबरोबर व इतर वस्तूंबरोबर संसर्ग आणि व्यवहार घडतो. सहकार्य, विरोध, युद्ध, वस्तूवापर, टाकणे, हलवणे, भोगणे इ. तसेच त्यापासून दूर जाणे, असे व्यवहाराचे बहुविध रूप असते. त्यातून सुंदर व कुरूप, श्रेयस व निंद्या इ. विधिनिषेधात्मक मूल्ये तयार होत असतात. ही मूल्ये एकदम तयार होत नाहीत. त्याला बराच काळ जावा लागतो. त्याकरिता वारंवार व्यवहार घडावा लागतो.
मनुष्य बुद्धीने जितक्या प्रमाणात बाह्यात्कारी जगावर ताबा मिळवितो, तितक्या प्रमाणात मूल्ये निर्माण करतो. या मूल्यांवरच मनुष्य हा संस्कृती मंदिरे उभारत असतो. मनुष्य व जग मुळात वाईट आहे, असे मानले तरच मनुष्य स्वत:स चांगले बनविण्याची व त्यातून जग बदलण्याची आवश्यकता सिद्ध करतो. कला विधायक मूल्यांतून जग सुंदर बनविण्याचा प्रयत्न करीत असते. तर्कतीर्थांनी आपल्या या गुंतागुंतीच्या मूल्य निर्माण प्रक्रियेची जी तार्किक परंतु जीवन सुसंगत मांडणी केली आहे, त्यातून कला व मूल्य यांच्या संबंधाची उकल सुकर व सुलभ होते.’’
drsklawate@gmail.com
