डॉ. ना. भि. परुळेकर यांच्या जयंती व्याख्यानाची महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे. २० सप्टेंबर, १९७८ रोजी या शृंखलेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे ‘देशापुढील आव्हाने’ विषयावरील संपन्न व्याख्यान म्हणजे लोकशाही रक्षणार्थ केलेले विवेचन होते.
आपल्या या विवेचनात तर्कतीर्थांनी समजावले होते की, ‘सत्तेपासून अलिप्त असणारे परंतु सत्तेवर अंकुश ठेवू शकणारे दबाव गट लोकशाहीच्या समर्थनासाठी आजच्या परिस्थितीत समाजात आवश्यक आहेत.’ लोकशाही मूल्यांसाठी लोक संघटित होणे आवश्यक आहे. यासाठी समाजात लोकशाही संस्था निर्माण होण्याची गरज आहे. असे झाल्यास लोकशाहीला कितीही मोठा धोका निर्माण झाला तरी त्याचा काही परिणाम होणार नाही.
आपण अतिशय आदर्श अशी घटना स्वीकारली. परंतु या घटनेसाठी लोक तयार नव्हते. तीन पिढ्या नेहरू घराण्याचे वर्चस्व मानले. लोकांनी त्यांची पूजाच बांधली. आज एक गोष्ट चांगली झाली आहे की, व्यक्तिपूजा का करू नये, याची कारणे मिळू लागली आहेत. ‘‘पोटची मुले भ्रष्टाचारी झाली. सत्ताधाऱ्यांकडून खून पाडले जातात. बँका लुटल्या जातात. जिवंत माणसाची पूजा बांधल्याने, त्याला देव ठरविल्यानेच हे अनाचार होतात. निदान जिवंत माणसाला तरी देवपण देऊ नये.’’
माणसात सर्व विकार असतात. त्याला अवास्तव महत्त्व देता कामा नये. शेवटी किती महत्त्व द्यायचे याची मर्यादा आपणच घालून घेतली पाहिजे. ‘रशियामध्ये झारशाहीतून एकदम क्रांती झाली. त्यामुळे लोकशाहीचे मूळ घटक बनू शकणारे सोव्हिएत हुकूमशाहीचे घटक बनले. आपल्याकडे तसे झाले नाही. आपल्याकडे स्वातंत्र्य क्रमाक्रमाने व विनयाने आले. लोकमान्य टिळकांसारख्या लोकप्रिय नेत्याने आपण लोकांचे उद्धारकर्ते आहोत, ही वृत्ती कधी बाळगली नाही.’
शेवटी विचार आपल्या हृदयातून निघतात. कोणी नेता नाही. आपल्या धारणेत हाच नेता असावा, ही परिस्थिती निर्माण होण्यास आज अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे मी आशावादी आहे. राजकीय पक्षात शिथिलता आलेली आहे. त्यांच्यात आपसात हेवेदावे निर्माण झालेले दिसतात. परंतु विविध दृष्टिकोनांचे पाच पक्ष एकत्र आले, ही चांगली गोष्ट आहे. याबाबत जनता व काँग्रेस पक्ष बिंब-प्रतिबिंबासारखे आहेत. काँग्रेस पक्षातही जवळजवळ १०० वर्षे भिन्न दृष्टिकोन असणारे गट आहेत.
‘आपल्या राजकीय पक्षांत लोकशाही मूल्ये रुजलेली नाहीत. एखादा जबरदस्त नेता वर येतो आणि पक्षाशी जमले नाही, तर पक्ष मोडून टाकतो. काँग्रेस पक्ष याच पद्धतीने निदान दोनदा तरी मोडला आहे.’ ‘जे घर सत्तेच्या ठिकाणी चालते, त्याचेच प्रत्यंतर तळाच्या ग्रामपंचायतीपर्यंत दिसते. जिल्हा परिषदा, सहकारी संस्था येथेही एकाला धरून दुसरा राहतो. यामुळे लोकशाहीचा नुसता आराखडा अस्तित्वात आहे. परंतु लोकशाही जीवन प्रत्ययास येत नाही असे चित्र दिसते.’ आता नवीन ऋषी-महर्षी निर्माण झाले आहेत. हे शब्दही पारंपरिक संस्कारातून येतात. आपल्या पारंपरिक संस्कृतीचीही मूल्ये आपल्या गळ्याला चाप लावीत आहेत.
लोकशाहीच्या या आराखड्यात जीव ओतण्याचे काम राजकीय पक्ष करणे कठीण आहे. महात्मा गांधी, एम. एन. रॉय व जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या द्रष्ट्यांनी सांगितले आहे की, सत्तेपासून अलिप्त असणारी तरीही सत्तेवर अंकुश ठेवू शकणारी माणसेच हे काम करू शकतील. दलितांचा हा प्रश्न नामांतराच्या निमित्ताने एकदम उफाळून येतो. याचे कारण, ते साठलेले संस्कार आहेत. हे संस्कार नीट पुसले गेले नाहीत, तर लोकशाहीचा पाया येथे निर्माण होऊ शकणार नाही.
आपल्यासमोरील प्रश्नांना विचारवंतांनी उत्तरे देऊन ठेवली आहेत. परंतु ती कार्यक्रमाच्या आधारे जीवनात उतरतील तेव्हाच प्रश्न सुटतील. पक्ष फुटले व वेगवेगळे राहिले तर बेबंदशाही येईल. हुकूमशाही येण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. लोकशाहीची नैतिक मूल्ये समाजात रुजली नसल्याने हुकूमशाहीचेही स्वागत होण्याची शक्यता आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे हे विचार सुमारे पाच दशकांपूर्वीचे असले तरी आजही तंतोतंत लागू पडतात. स्वातंत्र्योत्तर आठ दशकांच्या वाटचालीत आपण लोकशाहीची मूल्ये खऱ्या अर्थाने रुजविली नि अंगीकारली नाहीत हेच खरे!
drsklawate@gmail.com