सन १९५७ च्या सुमारास प्रा. रा. भि. जोशी यांनी ‘साहित्य, साहित्यिक आणि सरकार’ शीर्षक लेख लिहिला होता. स्वातंत्र्यानंतरचा भारत व महाराष्ट्र साहित्यविश्वाची मांडणी नव्याने करू पाहात होते. सरकारेही भाषा, साहित्य, संस्कृतीबद्दल सजग होती. १९५४ ला साहित्य अकादमी स्थापन होऊन १९५५पासून १४ भारतीय भाषांतील राजभाषा भारतीय राज्यघटनेने आपल्या आठव्या परिशिष्टात मान्य करून त्यांच्या विकासास प्रकाशन, पुरस्कार, भाषांतर इत्यादींद्वारे प्रोत्साहन देणे सुरू केले होते. १९५७ हे भारतीय स्वातंत्र्याचे दशकपूर्ती वर्ष होते. १९४७ ते १९५६ या दशकभराच्या काळात साहित्य, साहित्यिक आणि सरकार संबंधांची समीक्षा करण्याच्या उद्देशाने लिहिलेल्या वरील लेखाची खूप चर्चा साहित्यविश्वात त्या वेळी सुरू होती. त्याची नोंद घेत ‘सत्यकथा’ मासिकाच्या संपादकांनी वरील लेख तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, अनंत काणेकर, प्रा. स. शि. भावे, प्रा. मं. वि. राजाध्यक्ष, दि. के. बेडेकर, प्रा. वसंत बापट यांना पाठविला. लेखावरील त्यांच्या प्रतिक्रिया संग्रहित करण्यात आल्या होत्या. त्या ‘सत्यकथा’ (दिवाळी) अंकात नोव्हेंबर, १९५७ मध्ये प्रकाशित करण्यात आल्या.

तर्कतीर्थांनी आपला अभिप्राय देत स्पष्ट केले आहे की, शुद्ध साहित्यनिर्मिती व्यक्तितंत्र असते. व्यक्ती हेच साहित्याचे मूळ व बीज असते. व्यक्तित्वाचा परिपोष, उत्कर्ष व निर्दोषता ही साहित्य परिपोष, उत्कर्ष आणि निर्दोषतेसाठी आवश्यक असते. बंधन हे व्यक्तित्वाच्या ऱ्हासाचे असाधारण कारण होय. कला व ललित साहित्यास प्रसवणारी प्रतिभाशक्ती स्वैरविहारिणी असावी लागते. वैचारिक साहित्य निर्मितीस बौद्धिक प्रेरणा अप्रतिहत असावी लागते. विचारांचे एकच इष्ट बंधन असते. ते म्हणजे ‘तर्क’. ‘तर्कशास्त्र’ म्हणजे विचारांच्या स्वाभाविक नियमांचा सारसंग्रह होय. प्रतिभा अनियंत्रित हवी. आत्मनियंत्रणच तिच्या प्रगल्भतेस आवश्यक तत्त्व. साहित्यशास्त्र यातूनच विकसित होत असते.

साहित्य ही साक्षर समाज व उच्च संस्कृतीची अपरिहार्य गरज असते. ती भागविण्यासाठी राजाश्रय व लोकाश्रय जरुरीचा असतो. साहित्यिकाचे निवेदन सामुदायिक अभिव्यक्ती असते. ती वक्ता-श्रोता, कवी-रसिक, निर्माता-निरीक्षक (समीक्षक) अशी द्वैताश्रित असते. साहित्य भिन्न लोकाभिरुची व संस्कृती वैविध्यातून साकारत असते. ते स्वातंत्र्यपोषक असते. राजाश्रयाची पर्वा न करता ते बहरत असते. त्यास एकच धोका असतो, तो म्हणजे एकमार्गी, गतानुगतिक व अंधश्रद्ध लोक. ते उदार मतवाद व वैचारिक स्वातंत्र्यविमुख असतात. हे लोक जुलमी हुकूमशाहीइतकीच प्रतिभा व विचारांची कुचंबणा करू शकतात. त्यांची परंपरा हुकूमशहांपेक्षा दीर्घकाळ टिकते. असे लोक इतिहास, संशोधन, मुक्त धर्मचर्चा, बुद्धिवादी टीका यांचा कोंडमारा करू शकतात. सत्यशोधन अनंत काळ चालावे लागते. मानवी बुद्धी प्रमादक्षम असल्याने विरुद्ध व विविध विचारांचा अवसर दिल्यानेच सत्यवर्धिष्णू होत असते, अशी धारणा रुजलेली संस्था व समाज साहित्याच्या योगक्षमास योग्य ठरतो. यात सरकारचाही अंतर्भाव असावा, असतो.

भारतातले स्वराज्य सरकार साहित्याच्या या योगक्षमाची विचारपूस करू लागले आहे. काही संस्था सरकारतर्फे काम करू लागल्या आहेत. साहित्य अकादमी, प्रादेशिक पारितोषिक समित्या कार्यरत आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये साहित्यिकांची वर्णी लागत आहे. त्यांचा प्रभाव दिसण्याअगोदरच साहित्य व साहित्यकारांवर प्रभाव वा बंधन पडेल, असा आरडाओरडा सुरू झाला आहे. पारितोषिके आणि नोकऱ्यांतून साहित्यिक मिंधे होतात. मिंधेपणाची सवय अत्यंत कुचकामी असते. यातून त्यांचे नुकसान होते. सरकार तत्त्वाधारित असेल, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष बंधने साहित्यिकांवर व साहित्यावर घालीत नसेल, तर सरकारी आश्रय सद्गुण मानायला हवा. साहित्य व साहित्यकारांनी लोकाश्रयालाच महत्त्व दिले पाहिजे.

प्रबोधन पावलेली आत्मशक्ती बंधनास जुमानित नसते. ती अनंत असते. ती ज्याच्या ठिकाणी प्रबोधन पावलेली आहे, असे साहित्यकार व लेखक लोकबंधन व राजबंधन या उपाधीच्या बाहेरच मनाने वावरत असतात. अशांच्या साहित्यापुढे लोक, राजे व राज्ये अखेरीस नमतातच. तर्कतीर्थांचे हे विचार १९५७चे. दरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. इतक्या काळानंतरही त्यांचे प्रस्तुत राहणे, हेच या विचारांचे सौंदर्य, गांभीर्य व महत्त्व होय.
drsklawate@gmail.com

Story img Loader