भारतातील वैविध्य लक्षात घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचा विचार स्वातंत्र्योत्तर काळात अनेकदा चार्चिला गेला असला, तरी हा विचार वेद, पुराण, भगवद्गीता या प्राचीन वाङ्मयातही आढळतो. यावरून भारतीय ऐक्याचा विचार पूर्वापार चालत आल्याचे लक्षात येते. ही गोष्ट तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आकाशवाणी, पुणे केंद्रावरून २३ ऑक्टोबर, १९६१ रोजी प्रसारित करण्यात आलेल्या भाषणातून अधोरेखित केली आहे.

तर्कतीर्थांनी दाखवून दिले आहे की, भारताच्या ऐक्याची घडण हजारो वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. ‘विश्वामित्र स्तोत्रा’मध्ये भारतजनाचे रक्षण करणारा मानवाचा समुदाय असल्याचा उल्लेख आहे. ‘विष्णुपुराणा’त ‘भारतवर्ष’ नामक भूभागात जे जन्माला येतात, ते धन्य होतात, असे सांगितले आहे. ऋग्वेदात सप्तसरितांच्या प्रदेशाचे वर्णन येतेे. दुर्गा, उमामहेश्वर, राम, परशुराम विष्णू आदी देवतांनी या प्रदेशास तीर्थस्थान बनविल्याचे अनेक उल्लेख प्राचीन काव्यात येतात. ‘पुराण’, ‘महाभारत’, ‘रामायण’ही यास अपवाद नाहीत.

सर्वधर्म समन्वयाची पार्श्वभूमी भारतास वेद, वेदान्त तत्त्वज्ञानापासून असल्याचे सांगत तर्कतीर्थ बौद्ध आणि जैन धर्म प्रसार काळातही ती होती, असे या लक्षात आणून देतात. ज्यू, ख्रिाश्चन, मुस्लीम धर्म प्रसार काळात जशी जी ‘धर्मयुद्ध’ झाली, तशी युद्धे भारतीय धर्मांसंदर्भात झाली नाहीत, हे या भाषणातून तर्कतीर्थ निदर्शनास आणून देतात. भारतीय धर्म अहिंसा, सत्य, नीती, मनोनिग्रह, भूतदयेचा समर्थक होत. ‘धर्मयुद्ध’ शब्द प्राचीन साहित्यात येतो. याचा अर्थ भिन्न धर्मीयांचे स्वत:च्या धर्मसंप्रदायाचे महत्त्व स्थापित करण्याकरिता किंवा अन्य धर्मीयांच्या नि:पाताकरिता होणारे युद्ध असा नाही. धर्मयुद्ध म्हणजे न्यायाने केले जाणारे शिष्टसंमत युद्धा होय.

भारताच्या एकराष्ट्रीयत्वाची घडण ज्या प्राचीन काळापासून येथील संस्कृतीने केली आहे, त्यातील मूलभूत तत्त्व विभिन्नता व वैचित्र्यास मान द्यावयास शिकविते. भारतीय एकतेची निर्मिती करणारी मूलभूत तत्त्वे कोणत्याही राष्ट्रातील संस्कृतीच्या परंपरेत नाहीत. निदान अन्य राष्ट्रांतील संस्कृतीवर श्रेष्ठ मूल्यांचा प्रभाव पडलेला नाही. भारतीय एकतेची निर्मिती करण्यात भूप्रदेशाच्या पावित्र्यावरील श्रद्धा आणि सर्वधर्मसमन्वयाच्या दृष्टीचा मोठा वाटा आहे.

भिन्न धर्मीय समाजांना एकाच सहकार्याच्या जीवनात गोवणे हाच भारतीय संस्कृतीचा हेतू आहे. सर्वधर्मसमन्वयाचे वर्णन वैष्णवांच्या एका सुप्रसिद्ध प्रार्थनेत सुरेख रीतीने आले आहे. ती प्रार्थना अशी :

यं शैवा: समुपास्ते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो।

बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटव: कर्तेति नैयायिका:।।

अर्हन्नित्यच जैनशासनरता: कर्मेति मीमांसका:।

सोयं वो विदधातु वांछितफलं त्रैलोक्यनाथो हरि:।।

याचा अर्थ, ‘ज्याची शैवलोक शिव म्हणून, वेदान्ती ब्रह्म म्हणून, बौद्ध बुद्ध म्हणून, तर्कशास्त्री नैय्यायिक विधाता म्हणून, जैन अर्हत् तीर्थंकर म्हणून, मीमांसक कर्म म्हणून उपासना करतात तो हरी तुमची इष्ट कामना पूर्ण करो.’ ही प्रार्थना मुस्लीम व ख्रिाश्चन लोक भारतात प्रभावीपणे नांदू लागण्याच्या पूर्वीची असावी. या प्रार्थनेत जी तत्त्वदृष्टी सूचित केली आहे, तिच्या अनुरोधानेच अशी भर या प्रार्थनेत घालावी. तो पुन: श्लोक असा –

यं शैवा: समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदन्तिनो।

बौद्धा बुद्धपदे कुराणशरणा अल्लेति माहंमदा:।।

आकाशस्थपितेति ख्रिास्तनिरता जैना विरागं मुनिम्।

सोयं वो विदधातु वांछितफलं त्रैलोक्यनाथो हरि:।।

‘ज्याची आकाशस्थापिता म्हणून ख्रिाश्चन व सर्वाधिपती अल्ला म्हणून मुस्लीम उपासना करतात, तो हरी इष्टकामना पूर्ण करो.’

तर्कतीर्थांचे या भाषणातील उपरोक्त विवेचन धर्म, राष्ट्र आणि ऐक्य या त्रितत्त्वांची सामंजस्यपूर्ण गुंफण म्हणून पाहता येते. तर्कतीर्थ एक धर्मज्ञ, राजनीतिज्ञ व देशप्रेमी म्हणून इतिहास आणि वर्तमानाची अशी संयत, सम्यक, समन्वयी मांडणी करतात, ती परंपरेचा विस्तार म्हणून जितकी महत्त्वाची ठरते, तितकीच वर्तमानाच्या विभेदी वातावरणात डोळ्यांत अंजन घालणारी म्हणून मानवीय ठरते.