देशातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसने तिच्या मनुष्यबळात दोन टक्क्यांच्या कपातीची योजना जाहीर केली आहे. हे दोन टक्के प्रमाण म्हणजे तब्बल १२ हजारांच्या घरात जाणारे भरते. संपूर्ण आर्थिक वर्षात म्हणजेच मार्च २०२६ पर्यंत कंपनीच्या देशभरातील कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याची ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविली जाईल. इतक्या तपशिलासह हे नियोजन टीसीएसचे मुख्याधिकारी के. कृतिवासन यांनी रविवारी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत कंपन्यांचे सध्या सर्वात आव्हानात्मक काळातून मार्गक्रमण सुरू आहे. या कंपन्यांनी तंत्रज्ञानातील वेगवान बदल घडविणाऱ्या उलथापालथीने विचारात पडावे आणि त्यासंबंधाने त्यांच्या चिंतनाने अखेर नोकऱ्यांनाच कात्री लावण्याचे टोक गाठावे, असे वारे जगभरात गेल्या काही वर्षांत वेगाने वाहत असल्याचे दिसत आहे. तथापि हे पाश्चिमात्य वारे इतक्या लवकर भारतातही यावेत आणि भारतीय कंपनीने त्याबरहुकूम आजवरच्या सर्वात मोठ्या नोकरकपातीचा कार्यक्रम जाहीर करावा, हे धक्कादायकच. अनेकार्थाने ती सर्वच संबंधितांसाठी धोक्याची घंटाही ठरावी.
एका ढोबळ अंदाजानुसार, गेल्या वर्षभरात म्हणजेच एकट्या २०२४ मध्ये जगभरातील ४२२ कंपन्यांनी, एक लाख ३६ हजार कर्मचाऱ्यांना घरी बसविले. असे पाऊल उचलणाऱ्या बहुतांश तंत्रज्ञान कंपन्यांच आहेत. यात आयबीएम, इंटेल, सिस्को ही बडी नावे अग्रस्थानी आहेत. बरोबरीने त्यांच्याच छत्रछायेत मूळ धरलेल्या नवउद्यामी (स्टार्टअप्स) उपक्रमांतही मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांवर कुऱ्हाड चालविली गेली. अलीकडे म्हणजे २०२५ मध्येही गूगल (अल्फाबेट), कॉग्निजंट, अॅपल, डेल या कंपन्यांमध्ये हा क्रम सुरूच असल्याचे दिसून येते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ म्हणून आज सर्वतोमुखी बनलेले कृत्रिम प्रज्ञा हे नवोन्मेषी तंत्रज्ञान मोठे मन्वंतर घडवून आणत आहे. त्याचे फायदे पाहता सर्वच प्रस्थापित तंत्रज्ञान कंपन्यांना त्याचा ध्यास जडावा हे नवलाचे नाही. परंतु हा ध्यास एकीकडे खूप खर्चीक आहे. तरी त्यातून साधले जाणारे कथित गुडविल म्हणजेच ख्यातीमूल्य, बरोबरीने कार्यक्षमतेत विलक्षण भर घालणारे लाभ पाहता कंपन्यांसाठी हा ध्यास अटळही ठरत आहे. पर्यायाने ‘एआय’ची खर्चीकता पाहता, काटकसरीच्या जागा शोधण्याचे प्रयत्न म्हणून म्हणा, अथवा कार्यक्षमता वाढत असल्याने अतिरिक्त ठरलेला कर्मचारी संख्येचा टक्का घटवताना म्हणा, दोन्ही अंगाने रोजगाराचा घास घेतला जात आहे.
टीसीएसमधील नियोजित कपातीमागे मात्र ‘एआय’ हे कारण नसल्याचा खुलासा कंपनीचे मुख्याधिकारी कृतिवासन यांनीच सुस्पष्टपणे केला आहे. अर्थात या तंत्रज्ञानाच्या अवलंबाने कार्यक्षमता वाढल्याचे आणि त्यामुळे मोठ्या संख्येने कर्मचारी अतिरिक्त ठरल्याचे देखील ते सांगतात. विशेषत: या नोकरकपातीचा सर्वाधिक दणका हा मध्यम तसेच वरिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना बसणार असल्याचे त्यांनी सूचित केले. त्यांच्याकडे आवश्यक कौशल्याचा अभाव आहे आणि नोकरीत स्थिरावलेल्या या मंडळींना पुन्हा प्रशिक्षणाच्या प्रक्रियेतून जाण्यास सांगण्यासारखीही स्थिती नसल्याचे कृतिवासन यांचे म्हणणे. कोणतीही नोकरी शाश्वत नाही आणि व्यासंग, निरीक्षण, प्रशिक्षणाने पारंगत राहत स्वत:ची कालसुसंगत महत्ता कायम राखण्याचे कसब आता प्रत्येकाला आवश्यक ठरेल, हा या निमित्ताने गिरविला जावा असा धडा आहे. दुसरीकडे हे अधिक भीतीदायी अशासाठी, की अधिक मेहनताना द्याव्या लागणारे कर्मचारी मग ते कितीही इमानी अथवा अनुभवी का असेना, त्यांचा सर्वात आधी बळी दिला जाईल असेही ते सुचविते. चपळ आणि स्मार्ट नवपदवीधर त्यांची जागी घेतील. अर्थात त्यांच्या वेतनमानावरील खर्चही कमी राहील, असा शुद्ध व्यावहारिक हिशेबही यामागे आहे.
ताज्या घडामोडींचा अर्थ संपूर्ण उद्याोग क्षेत्राला व्यापणाऱ्या अधिक गंभीर स्वरूपाच्या बदलांकडे संकेत करणारा आहे. ऑटोमेशन अर्थात स्वयंचलित प्रक्रियांच्या अंमलबजावणीसाठी नवनवीन तंत्रज्ञानांत गुंतवणुकीची अपरिहार्यता एकीकडे, तर दुसरीकडे मंदावलेले कार्यादेश आणि व्यवसायामुळे अनेक कंपन्यांच्या नफ्याच्या प्रमाणावरही मर्यादा आल्या आहेत. याचा एकत्रित परिणाम म्हणून कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी करण्यास कंपन्यांना भाग पाडले जात आहे. देशाच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेला चिकटलेला अनिश्चिततेचा पदर पाहता, रोजगारावर आलेले हे अटळ संक्रमण आहे. मात्र नोकरीच्या सुरक्षिततेसाठी म्हणून ज्यांचे नाव आजवर खात्रीशीरपणे घेतले जात होते, त्या टाटा समूहापासूनच हे संक्रमण सुरू व्हावे हे अधिक दु:खप्रद!