‘इज द आयडिआ ऑफ हीलिंग टू गेट यू बॅक टू द वे यू यूज्ड टू बी, ऑर टू टर्न यू इन्टू समथिंग न्यू?’
- बेन मार्कोविट्स, द रेस्ट ऑफ अवर लाइव्ज’
‘द रेस्ट ऑफ अवर लाइव्ज’ कादंबरीचं मुखपृष्ठ अर्थपूर्ण आहे. थोडक्यात आणि मिनिमलिस्ट पद्धतीने ते ही कादंबरी काय आहे, कशाविषयी आहे, हे आपल्याला सांगतं. गाडीच्या आत बसलेल्या चालकाला दिसणाऱ्या दृश्याचा हा एक भाग आहे. खाली डाव्या कोपऱ्यात स्टीअरिंग व्हीलचा काही भाग आहे, तर समोर वरच्या बाजूला आहे रीअर व्ह्यू मिरर. या आरशात आपल्याला दिसतात त्या सहप्रवाशांच्या सावल्यासारख्या आकृती आणि त्यांच्याही मागे दिसणारा सूर्योदय, किंवा कदाचित तो सूर्यास्त असेल. पूर्ण चित्रात जो काही तपशील आहे तो यामागचं दाखवणाऱ्या आरशातच. समोर क्षितिजासारखी एक आडवी रेघ आहे, पण समोरचा विस्तार मोकळा आहे. आत्ता तरी यात तपशील भरला गेलेला नाही. नीट पाहिलं, तर या मुखपृष्ठात बरंच काही आहे. ते सांगतं की कादंबरी ‘रोड ट्रिप’विषयी आहे; जी कथानकात प्रत्यक्ष घडत असली, तरी हा प्रवास हे प्रतीकही आहेच. कादंबरीचं शीर्षक जरी उर्वरित आयुष्याबद्दलचं असलं, तरी प्रत्यक्षात ते ‘रिअर व्ह्यू मिरर’मध्ये दिसणाऱ्या, होऊन गेलेल्या आयुष्याबद्दलचं आहे, त्यात आलेल्या व्यक्तिरेखांबद्दलचं आहे, ज्यांच्या सावल्या आरशात उतरलेल्या दिसतायत. समोर दिसणारं सारं कोरं आहे, कथानायकाच्या दृष्टिकोनानुसार ते भरलं जाऊ शकतं. हे मुखपृष्ठ जसं साधंसं भासूनही अर्थवाही आहे, तशीच कादंबरीही. क्वचितच आपल्याला अशी मुखपृष्ठं सापडतात जी कथानकाशी इतकी सुसंगत असतात. त्यामुळे ही इथली एक वैशिष्ट्यपूर्ण बाब.
मी अनेकदा पाहिलंय, की चित्रपटातल्या वा साहित्यातल्या कथनात्मक निवेदनांबद्दल प्रेक्षक वा वाचक आपली एक अपेक्षा तयार ठेवतात, की ते अमुक रीतीने पुढे सरकत असेल, त्याचा प्रवास असा असा असेल, शेवटाला अमुक गोष्ट होईल, किंवा व्हायला हवी. जर प्रत्यक्षात तशी घडली नाही, तर त्यांना बिचकल्यासारखं होतं, आणि या कृतीबद्दलच त्यांच्या मनात शंका उपस्थित होऊ शकते. ‘द रेस्ट ऑफ अवर लाइव्ज’चंही असं काहीतरी झाल्याचं आपण त्याची परीक्षणं पाहिली तर लक्षात येऊ शकतं. मी कादंबरी वाचण्याआधी बुकरच्या लाँगलिस्टमध्ये निवडल्या गेलेल्या पुस्तकांबद्दल बोलणाऱ्या काही परीक्षणांमधून त्याबद्दल बऱ्याच नकारात्मक गोष्टी ऐकल्या होत्या, आणि ती लिहिणाऱ्या अनेकांना ती बुकर यादीत निवडली गेली याचं आश्चर्यच वाटलेलं दिसलं. माझ्या मते यामागे दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे त्यात काहीतरी मोठी घटना घडावी अशी या मंडळींची इच्छा होती. अशी काहीतरी नाट्यपूर्ण घडामोड, जी ज्यामुळे नायकाचं आयुष्य वैशिष्ट्यपूर्ण रीतीने बदलेल. किंवा निदान अशा घटना ज्यांमधून म्हणण्यासारखं कथानक आकाराला येईल. यातलं काहीच इथे होत नाही. दुसरं कारण आहे, ते म्हणजे या कादंबरीची मिरांडा जुलायच्या ‘ऑल फोर्स’ या गाजलेल्या कादंबरीशी झालेली तुलना. प्रत्यक्षात या तुलनेला विशेष अर्थ नाही, कारण रोड ट्रिप दोन्ही पुस्तकात असली, तरी त्यापलीकडे हे साम्य जात नाही. या प्रकारे आपल्या अपेक्षा एखाद्या कृतीवर लादण्यात अर्थ नसतो. तिच्याकडे स्वतंत्रपणेच पाहता यायला हवं, आणि त्या मजकुरातूनच कृतीला काय मांडायचं आहे हे लक्षात घ्यायला हवं. मी म्हणेन की बेन मार्कोविट्सला आपल्या पुस्तकात फार काही घडवायचं नाहीच आहे. त्याने निवडलेला मार्ग तचत्त्वचिंतनात्मक आहे.
एका दृष्टीने पाहता ‘द रेस्ट ऑफ अवर लाइव्ज’ हे पुस्तक मिड लाइफ क्रायसिसबद्दल आहे, आणि एज्युकेटेड गेस करायचा, तर साधारण मधल्या वयाचा वाचक त्याचा आस्वाद पूर्णपणे घेऊ शकेल, असं मला वाटतं. अशी व्यक्ती, जी आपल्या पायाखालून गेलेल्या रस्त्याचा विचार पुन्हा एकदा करायला लागली आहे. आयुष्यात आपण घेतलेले मुख्य निर्णय बरोबर होते का चूक? वागलो त्यापेक्षा वेगळं वागायला हवं होतं का? यापुढे जर आपण काही बदल करायचा असं ठरवलं तर ते आपल्याला शक्य होईल का? असे प्रश्न ज्यांना पडत असतील तो वाचक पंचावन्न वर्षांच्या टॉम लेवर्डपुढे आलेला पेच अचूक समजू शकेल. टॉम हा तसा सुखवस्तू माणूस आहे. त्याचं चौकोनी कुटुंब आहे. तो कायदेतज्ज्ञ आहे. प्राध्यापकी करण्याबरोबरच तो सल्लागार म्हणूनही काही काम घेतो. त्याला आर्थिक चणचण नाही. पण त्याचं आयुष्य फार आरामात चाललंय का, तर तसंही नाही. कादंबरीच्या सुरुवातीलाच आपल्याला कळतं, की एमी या त्याच्या पत्नीचं कधीकाळी एक लग्नबाह्य प्रेमप्रकरण होतं. ही गोष्ट तशी जुनी, बारा वर्षांपूर्वीची. त्या वेळी टॉमने कुटुंबाचा विचार करून काहीच हालचाल केली नव्हती, पण ती गोष्ट त्याला बोचते आहे. मुलं मार्गी लागली की आपण घर सोडायचं, असं त्याने पूर्वीच स्वत:शी ठरवलं होतं, आणि आता ती वेळ येऊन ठेपली आहे. तसं तो करणार याची कल्पना एमीलाही आहे, पण नैतिकदृष्या ती त्याला विरोध करण्याच्या परिस्थितीत नाही. टॉम आपल्या मुलीला कॉलेजच्या गावी नेऊन सोडतो आणि परत घरी न जाता पुढे जात राहतो. आपला धाकटा भाऊ, मित्र, एकेकाळची मैत्रीण अशा अनेकांना भेटताना त्याला आपलं पूर्वायुष्य आठवत राहतं. गेलेला काळ आणि हाती उरलेलं आयुष्य याचा विचार करत त्याचा हा प्रवास सुरू राहतो.
पुस्तकातली एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे टॉमचा आवाज. टॉम काही फार सद्गृहस्थ आहे अशातला भाग नाही. त्यानेही आपल्या आयुष्यात चुका केल्या आहेत, त्याची सारीच मतं आपल्याला पटण्यासारखी नाहीत, किंबहुना आताही एका वादग्रस्त घटनेमुळे त्याला काही दिवस कॉलेजमधून निलंबित केलं जाण्याची लक्षणं आहेत. पण हे सारं तो पुरेशा मोकळेपणाने, आडपडदा न ठेवता आपल्यापुढे मांडतो. कथानक उलगडतं ते प्रथमपुरुषी निवेदनातून, त्यामुळे टॉम थेट आपल्याशी संवाद साधतो. विश्लेषण, चिंतन, चिकित्सा, तत्त्वज्ञान, आशावाद या साऱ्याचं मिश्रण वाचकाला या आवाजात सापडतं. तुम्हाला ही कादंबरी आवडेल का याचं उत्तर बऱ्याच अंशी हा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय का यावर आवलंबून असेल.
टॉम तरुण असताना त्याला पुस्तक लिहून पाहावं असं वाटलं होतं. त्याला बास्केटबॉल खेळाचा थोडा अनुभव आहे, आणि त्याला सुचलेली पुस्तकाची कल्पना त्या खेळाशीच जोडलेली होती. गावोगावच्या बास्केटबॉल कोर्टांमध्ये जाऊन तिथल्या लोकांशी खेळावं, गप्पा माराव्या आणि त्यातून पुस्तक लिहावं असं त्यांच्या मनात होतं. ही कल्पना त्याच्या मनातून गेलेली नाही. या प्रवासातही तो काही वेळा या प्रकारे कोर्ट्सवर जाऊन खेळतो, अनोळखी लोकांशी संवाद साधतो, आपली पुस्तकाची कल्पनाही त्यांना सांगतो. तरुण टॉमने जे पुस्तक लिहिलं असतं ते हे निश्चितच नाही, पण वाचताना आपण पुढे जात राहतो तसं आपल्या लक्षात येतं, की बहुधा ते पुस्तकही या प्रकारचंच झालं असतं. खेळणं केवळ एक निमित्त होतं. प्रत्यक्षात टॉमचं व्यक्तिमत्त्वच तिथेही पुढे आलं असतं.
‘द रेस्ट ऑफ अवर लाइव्ज’मधला टॉम हा मुळात दुखावला गेला आहे. तीच या प्रवासाची सुरुवात आहे, आणि या प्रवासात त्याची ही मानसिक जखम भरून येणं अथवा न येणं, आली तर ती काय रीतीने येऊ शकेल, ही या कादंबरीच्या मध्यवर्ती असलेली कल्पना मानावी लागेल. या ‘हीलिंग मेकॅनिझम’ला अधिक स्पष्टता येण्यासाठी कादंबरी एका वेगळ्या हीलिंगचाही विचार करते. टॉमला एक चमत्कारिक आजार आहे. त्याचा चेहरा सकाळी सुजतो. पुढे तास उलटतात तसा तो हळूहळू नेहमीसारखा होतो. हे नक्की काय, कशामुळे झालं, हे त्याला कोणीच सांगू शकलेलं नाही. कादंबरीत हे प्रत्यक्ष दुखणं, आणि भावनिक दुखापत यांची सांगड घातली जाते, तसेच त्यातून टॉम बाहेर पडू शकतो का हे तपासलं जातं.
लग्न, संसार, मुलांचं मोठं होणं, करिअरचा महत्त्वाचा भाग, हे सारं जेव्हा संपत येतं, तेव्हा काय उरतं, याचा विचार लेखक करून पहतो. आपण एका शेवटाच्या जवळ पोचतो आहोत, का यातही एखादी सुरुवात असू शकते, हा प्रश्न टॉमला पडलेला आहे, तसाच लेखकालाही. आतापर्यंतच्या आयुष्याचा टॉमने केलेला विचार महत्त्वाचा यासाठीच आहे, कारण तो या प्रश्नाला ठळक, वास्तव संदर्भ देतो. टॉम आपले प्रश्न कोणत्या पार्श्वभूमीवर सोडवतो आहे, याचा निश्चित तपशील आपल्यापुढे मांडतो. वरवर पाहता टॉम एका निराशावादी वळणावर आहे हे आपल्याला दिसत राहतं, मात्र त्यामुळे ना त्याच्यापुढला प्रश्न सोपा राहात, ना त्याची उत्तरं सहज मिळणारी.
कादंबरीचा शेवट मला व्यक्तिश: थोडा अपुरा वाटला. तो वेगळा हवा, वा त्यात काही निश्चित उत्तरं हवीत अशी माझी अपेक्षा नाही, तशी अपेक्षा लेखकावर लादण्यावर माझा विश्वासही नाही, परंतु तरीही काहीतरी राहून गेलं असं मला वाटलं हे खरं. आपण जेव्हा मोठा प्रवास एका व्यक्तिरेखेबरोबर करतो, तेव्हा या प्रवासाच्या शेवटाला आहे त्यापेक्षा अधिक वजन असावं अशी माझी अपेक्षा होती, जी पुरी झाली नाही. त्यामुळे हा प्रवास मला फोल वाटला का, तर नाही. टॉम एका वेगळ्या जगातला असला, त्याचे प्रश्न माझ्यापेक्षा वेगळे असले, तरी तो ज्या निसरड्या वळणावर उभा आहे, ते वळण मला दिसू शकलं, त्याच्या परिस्थितीचं गांभीर्य मला जाणवू शकलं, त्याच्या भावनांचा खरेपणा माझ्यापर्यंत येऊ शकला. आणि मला वाटतं तेवढं पुरे आहे. शेवटी आपण काय स्वीकारतो आणि काय नाही, हे आपण कोण आहोत यावरही अवलंबून असतं. ‘द रेस्ट ऑफ अवर लाइव्ज’बद्दल ते थोडं अधिकच खरं आहे.
गणेश मतकरी
ganesh.matkari@gmail.com