‘मानवी जिवाची जी लैंगिक ओळख त्याच्या जन्माच्या वेळी ठरविली जाते, ती आयुष्यभर कायम राहतेच, असे नाही. लैंगिक ओळख ही सतत उत्क्रांत होणारी प्रक्रिया आहे,’ असा दावा करणाऱ्या ज्युडिथ बटलर यांचे नवे पुस्तक पुढल्या मार्चमध्ये येणार आहे, त्याची चर्चा मात्र आतापासूनच सुरू झाली आहे! ‘हू इज अफ्रेड ऑफ जेंडर’ हे त्या पुस्तकाचे नाव. ज्युडिथ बटलर यांना आजघडीच्या महत्त्वाच्या तत्त्वचिंतकांपैकी एक मानले जाते. ‘जेंडर ट्रबल’ या तीन दशकांपूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकाने लैंगिक ओळखींविषयीच्या पारंपरिक चौकटीवर प्रहार केले होते. तोवरच्या प्रस्थापित संकल्पनांना या पुस्तकामुळे जोरदार हादरे बसले. त्यानंतर अर्थातच अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आणि प्रकाशित झालेल्या पुस्तकांपैकी सर्वात ताजे (२०२२ च्या अखेरीस प्रकाशित झालेले ) ‘व्हॉट वर्ल्ड इज धिस?’ हे पुस्तक मानवी नातेसंबंध, स्वातंत्र्य यांबद्दल होते. लिंगभाव हा बटलर यांचा खास विषय असल्याने, त्यांच्या आगामी पुस्तकाविषयी वाचकांमध्ये उत्सुकता आहे.

अनेकदा जन्माच्या वेळी निश्चित करण्यात आलेली लैंगिक ओळख वाढीच्या वयात मनावर बिंबविली जाते, मात्र पुढे शरीर आणि मनातील बदलांनुसार या साचेबद्ध ओळखीशी संघर्ष उदभवू शकतो, हीच भूमिका बटलर यांनी या नव्या पुस्तकातून मांडली आहे. हे पुस्तक ही जन्मदत्त लैंगिक ओळखीविरोधातील मोहीम असल्याचा दावा लेखिकेने केला आहे. जन्मदत्त लिंगभाव ही संकल्पना कुटुंब, स्थानिक संस्कृती आणि मानवासाठीही मोठा धोका आहे. त्या संकल्पनेतच उद्ध्वस्त होण्याची भीती सामावलेली आहे. लैंगिक ओळखीविषयीच्या साचेबद्ध संकल्पनांचा प्रचंड प्रमाणात प्रचार झाला आहे. या प्रचारमोहिमांमुळे प्रजननासंदर्भातील हक्क डावलले गेले, लैंगिक हिंसाचाराविरोधातील संरक्षण नाकारले गेले, ‘ट्रान्स’ आणि ‘क्वीअर’ व्यक्तींचा भयमुक्त जीवनाचा हक्क हिरावून घेण्यात आला, अशी निरीक्षणे या पुस्तकात नोंदविण्यात आली आहेत.

बटलर यांचे हे पुस्तक संकुचित लैंगिक विचार, अति उजव्या विचारांमुळे भिन्न लैंगिक ओळखीच्या व्यक्तींविषयीचा भयगंड, गर्भपातविरोधी चळवळी आणि अशाच काही कर्मठ हट्टांना हादरे देणारे ठरेल. विचारवंत, लेखक आणि सामान्य क्वीअर गटामध्ये या पुस्तकाविषयी उत्सुकता आहे. क्वीअर संदर्भातील सिद्धांत मांडणारे हे आजवरचे सर्वात महत्त्वाचे पुस्तक ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया आतापासूनच उमटत आहेत.