तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपल्या कार्य- कर्तृत्वाने महाराष्ट्रातील साहित्य, भाषा, संस्कृती, ग्रंथव्यवहार, प्रकाशन, वृत्तपत्र / नियतकालिक संचालन-संपादन, कोशनिर्मिती इत्यादी क्षेत्रांतील विविध संस्थांचे पालकत्व सांभाळले. त्या सर्व संस्थांच्या प्रतिकूल काळात तर्कतीर्थांनी आपली राजकीय आणि सामाजिक पत वापरून त्या संस्थांना विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली. प्राज्ञपाठशाळा मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, सेंटर फॉर स्टडीज् ऑफ सोशल चेंज, इंडियन रेनासान्स इन्स्टिट्यूट, धर्मकोश मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ ही त्यातील काही नावे. म्हणूनच कदाचित २७ मे, १९९४ला तर्कतीर्थांचे निधन झाले, तेव्हा सर्व वृत्तपत्रे, नियतकालिके, संस्था यांनी श्रद्धांजली लेख, ठराव, पत्रे पाठवून, लिहून त्यांच्या योगदानाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
यात एक दीर्घ टिपण माझ्या हाती लागले. त्याचे हस्ताक्षर, मजकूर, विचार, शैली पाहता ते प्रा. मे. पुं. रेगे यांचे असावे, असा कयास करण्यात भरपूर आधार उपलब्ध होतात. हे टिपण अर्थातच आदरांजली वाहणारे आहे. ते ‘नवभारत’चे संपादकीय, प्राज्ञपाठशाळा मंडळाचा शोकप्रस्ताव वा श्रद्धांजली लेख ठरावा, असा हा मजकूर आहे. त्यात लेखक निर्देश नाही.
प्रा. मे. पुं. रेगे तर्कतीर्थांना ‘शास्त्रीजी’ संबोधत. या टिपणात या शब्दाचा अनेकदा वापर आहे. यात ते म्हणतात, ‘‘शास्त्रीजी खऱ्या अर्थाने भारतीय आणि आधुनिक भारतीय प्रबोधनाचे चालते-बोलते आणि कर्ते प्रतीक होते. त्यांच्याच शब्दात सांगायचे, तर ‘‘मी आधुनिक भारताच्या व महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय आंदोलनाशी एकरूप झालो होतो.’’ जीवनाचे त्यांनी कप्पे पाडले नव्हते, त्याकडे पाहण्याचा त्यांचा समग्रलक्ष्यी (इंटिग्रेटेड) दृष्टिकोन होता. मानवेंद्रनाथ रॉय यांच्याबरोबर ‘इंडियन रेनासान्स इन्स्टिट्यूट’ सन १९४६ला स्थापन करण्यात त्यांचा पुढाकार होता. तर्कतीर्थ या संस्थेचे संस्थापक विश्वस्त होते. या संस्थेच्या उद्देशांचा आयुष्यभर पाठपुरावा करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व मशालीसारखे (टॉर्च बेअरर) होते.
ऐतिहासिक व शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करीत त्यांनी ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ हा अमोल ग्रंथ लिहिला. तो इंग्रजीत लिहिला असता, तर जगातील विद्वानांच्या पंक्तीत ते बसले असते. बनारस, कलकत्त्यातील उच्च शिक्षणाने शास्त्रीजींमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन दृढ होण्यास मदत झाली. शास्त्रीजींनी तत्त्वज्ञानाबरोबर झपाट्याने वाढणाऱ्या वैज्ञानिक ज्ञानावर नजर ठेवली. ‘‘विज्ञान व तंत्रज्ञान यांची इतकी वाढ होऊनही बहुजन समाज बंधनात का राहिला,’’ याचे शास्त्रीजी उत्तर शोधत राहिले. आजचा भारतीय समाज धर्मसत्तेच्या आहारी जात आहे, याची जाणीव त्यांना होती.
शास्त्रीजी हे एक परिपूर्ण मानव होते. राजकारण, समाजकारण, साहित्य, चित्रकला आणि संगीत यांचे रसग्रहण कसे करावे, हे ते शिकले. त्यांची वृत्ती आनंदी जीवन उपभोगण्याची होती. वैदिक ऋषींप्रमाणे त्यांना हे जग सुंदर दिसे. त्यांना हसतमुख, सुजाण, कर्तव्यदक्ष पत्नी सतीकाकूंच्या रूपात लाभली. जगातील रम्य जीवन त्यांनी स्वर्गप्राप्तीचे साधन मानले. आपण ज्या जगात राहतो, तेच शक्य कोटीतील सर्वांत चांगले जीवन त्यांनी मानले.
त्यांनी आपल्यासाठी भरपूर विचारधन ठेवले आहे. याचे सर्व जनतेत वितरण होणे आज जरुरीचे आहे. हे कार्य आपणा सर्वांचे आहे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी यात भर घालणेही आवश्यक आहे. शास्त्रीजींनी दिलेला हा वारसा आपण पुढे चालविला पाहिजे, ही खरी त्यांना आदरांजली होईल.
वर उल्लेखित टिपणाचा हा सारसंक्षेप म्हणजे हे त्यांच्या एकेकाळच्या विश्वासू सहकाऱ्याने व नंतर वारस, उत्तराधिकारी बनून कार्य केलेल्या तत्त्वज्ञान्याचे तर्कतीर्थसंबंधी विचार होत. तर्कतीर्थांच्या जीवन, कार्य नि विचारांचे हे समालोचन होय. आज तर्कतीर्थांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षी हे वाचणे नि त्याप्रमाणे कृती करणे, हे आपणा सर्वांचे कर्तव्य ठरते. कवी जगदीश खेबूडकरांच्या कवितेतील प्रस्तुत लेख शीर्षकाची ओळ या ज्ञानमहर्षीच्या कल्पवृक्षाखाली आपणास समृद्ध करीत वर्तमान अंधारात एक कवडसा दाखविते. ‘जरी कोणी दुष्ट करू शासन, गुणी सज्जनांचे करू पालन’ या काव्यातील गुरुमंत्रच वर्तमानावर उतारा आहे.