कळपात असलेल्या गायीला मिठी मारण्याचा प्रयत्न करू नका. ज्याप्रमाणे तुम्ही ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रेयसी-मैत्रिणीला एकटय़ाने गाठता, तसेच गायीच्या बाबतीत करा. गायीसोबत बैल असेल तर तिला कवेत घेण्याचा प्रयत्न करू नका. बैल रागावला व त्यातून काही बरेवाईट घडले तर त्याची जबाबदारी मंडळावर राहणार नाही.

देखण्या गायी या चिडक्या असतात असे मंडळाचे निरीक्षण आहे. त्यामुळे प्रेयसीच्या संदर्भात असलेली देखणेपणाची अपेक्षा गाय निवडताना बाळगू नका. गायीच्या जवळ जाताना हळुवार पावले टाकत जा. तुम्ही प्रेमिकेला भेटायला जाताना चोरपावलांनी जाता अगदी तसे! गाय तिच्या वासरांना पाजत असेल तर तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करू नका. सकारात्मक ऊर्जेची विभागणी तिला कधीच मान्य नसते हे लक्षात घ्या.गायीजवळ जाताना लाल गुलाबाचे फूल घेऊन जाऊ नका. गवताची पेंडी, केळी, पालक यांसारखे तिच्या आवडीचे खाद्य सोबत न्या. चिखलात बसून आलेल्या गायींना कवेत घेण्याचा प्रयत्न करू नका. त्यापेक्षा तिला त्यातून बाहेर काढा. धुऊन स्वच्छ करा, मगच पुढचे पाऊल उचला. तेवढाच तुमचा ‘स्वच्छ भारत’ कार्यक्रमाला हातभार लागेल.

गायीच्या जवळ जाताना ‘हे गाईज्’ असा पाश्चात्त्य वळणाचा शब्दप्रयोग अजिबात खपवून घेतला जाणार नाही. सर्व प्रकारची काळजी घेऊनही मिठी मारताना गाय उधळली व तिच्या शिंगाने तुम्हाला दुखापत झाली तर तात्काळ मंडळाने सुरू केलेल्या ११४ या हेल्पलाइनवर फोन करा. मिठीला नकार देत एखादी गाय पळू लागली तर तिच्या मागे न धावता दुसरी गाय शोधावी. जशी तुम्ही अनेकदा दुसरी मैत्रीण शोधता. मिठीच्या प्रयत्नामुळे चिडलेल्या गायीने पेकाटात किंवा पार्श्वभागावर लाथ मारली तर होणारी वेदना सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक म्हणून सहन करा.

 तुमच्या प्रेयसीला भडक रंगाचे कपडे आवडत असले तरी गायीजवळ जाताना भडक पेहराव टाळा. जनावरांना (नव्हे गोमातांना) भडक रंग आवडत नाही याची जाणीव असू द्या. गो-मिठीसाठी नाव नोंदवणाऱ्या सर्वाचा विमा काढण्याचा निर्णय सरकारने घेतला असून यात जखमी वा मृत (सरकारी भाषेत बलिदान) झालेल्या प्रत्येकाला दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदांप्रमाणे भरपाई दिली जाईल.

गायीला मिठी मारताना अचानक तिने मान हलवली व त्यात तुम्हाला किरकोळ मुका मार लागलाच तर चिडून तिला मारहाण करण्याचा प्रयत्न करू नका. तो गुन्हा समजला जाईल. त्यापेक्षा झालेले दु:ख हे भावनिक संपन्नता वाढवण्यासाठी उपयोगाचे आहे असा विचार करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– भारतीय पशू कल्याण मंडळ, नवी दिल्ली