‘वा, अशोकजी, बढिया बयान दिया आपने। काँग्रेसला असेच बदनाम करत राहा. पक्षात तुमचे भविष्य अधिकाधिक उज्ज्वल होत जाईल.’ दिल्लीच्या आयटी सेलमधून आलेल्या या फोनने चव्हाण कमालीचे सुखावले. दिवसभर झालेल्या ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर हाच काय तो दिलासा असे म्हणत ते शयनकक्षात गेले. विरोधक काहीही म्हणोत आपण जे म्हटले, ते योग्यच. इथे भविष्य घडवायचे असेल तर हीच भूमिका बरोबर असे मनाशी ठरवत त्यांनी डोळे मिटले. थोड्याच वेळात त्यांना गाढ झोप लागली. पहाटे साखरझोपेत असताना अचानक त्यांच्या स्वप्नात एक सिंहासन दिसू लागले. मोठ्या आशेने ते न्याहाळत असतानाच त्यातून अचानक वाणी ऐकू येऊ लागली.

‘होय, मीच ते सत्तेचे सिंहासन, ज्याच्या प्राप्तीसाठी तुम्ही निष्ठा बदलून नव्या पक्षात गेलात. या जाण्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. अलीकडे ते सर्वत्र घडू लागले आहे. माझा मुद्दा आहे तो मी आजवर तुमच्यावर केलेल्या कृपेचा. दाखवलेल्या औदार्याचा. तुम्हाला आठवत नसेल तर जरा इतिहास सांगतो. तुमच्या वडिलांवरही मी अशीच कृपा दाखवली. आणीबाणीच्या काळात वादग्रस्त ठरलेले संजय गांधी राज्याच्या दौऱ्यावर असताना ते पावसात भिजू नयेत म्हणून मुख्यमंत्री असतानासुद्धा वडिलांनी त्यांच्या डोक्यावर छत्री धरली. खरे तर तेव्हाच त्यांचा संधीसाधूपणा माझ्या लक्षात यायला हवा होता पण नेक मनुष्य म्हणून मी दुर्लक्ष केले. वडिलांचे जाऊ द्या पण मुलगा तरी निष्ठावान निघेल असे समजून मी कायम तुमच्यावर मेहेरबानी दाखवली व तुम्हाला माझ्या वापराची संधी उपलब्ध करून दिली. मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही ‘आदर्श’ जावयाच्या भूमिकेतून चक्क सासूबाईंनाच घर दिले. तेव्हाही जावई माझा भला म्हणत मी काही काळ तुमच्याकडे दुर्लक्ष केले. आता तुम्हाला ती तेव्हाची कृती चूक वाटत नाही याचेही कारण माझ्या सहिष्णू स्वभावात दडलेले. तुमच्या निरागस चेहऱ्याची मला दया आली व नंतर तुम्ही खासदार झालात. सलग चार वर्षे पक्षाची धुरा तुमच्याकडे राहील याची काळजी मी घेतली. सत्ता गेली पण तुमची प्रतिष्ठा, मानसन्मान अबाधित राहावा म्हणून मी कायम तुमची साथसंगत केली. मग अचानक सत्तेची संधी चालत आली. तेव्हा खरे तर मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या व्यक्तीने मंत्री होणे चांगले दिसत नव्हते तरीही तुमचा हट्ट मी पुरवला. तेव्हाच मला तुमच्या प्रामाणिकपणाविषयी शंका यायला हवी होती, पण मी फार लक्ष दिले नाही. राजकारणात थोडाफार स्वार्थीपणा चालतो म्हणत मान वळवली. तुमच्या संतुष्टीचे अवकाश फार मोठे आहे याची कल्पना मला आली, पण राजकारणात हे घडतेच असे समजून मी त्याकडे कानाडोळा केला. राजपदाला नाकारून जो जंगलात जीवन व्यतीत करतो तो वनवास. तुम्ही तर याही काळात सत्तेच्या वर्तुळात राहिलात, मग तो वनवास कसा? वर्षापूर्वी तुम्ही चक्क कोलांटउडी मारली व भाजपत गेलात. तेही मी सहन केले व तुमचे आसन शाबूत राहील याची काळजी घेतली. आता तुम्ही काँग्रेसला नावे ठेवण्याच्या नादात चक्क माझाच अपमान करत आहात. हे योग्य नाही. त्यामुळे तुमच्यावर असलेला वरदहस्त मी काढून घेण्याचा विचार गंभीरपणे करू लागलोय. पंजाबातून इकडे नांदेडमध्ये येऊनही अखेरपर्यंत गुरुगोविंदसिंगाशी निष्ठा जपणाऱ्या वीर बंदा बैरागीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा व सुधारणा करा स्वत:त.’

तेवढ्यात अशोकरावांना जाग आली तेव्हा त्यांचे अंग घामाने भिजलेले होते. तसेच ते उठले व खाली दिवाणखान्यात जाऊन ठेवलेल्या सिंहासनाला ‘सॉरी’ म्हणून आले.