पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीनभौ यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘भारतीय (जनोपयोगी) पणन भांडारा’ला देशभरात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. (दुकान हा फारसी शब्द आहे. आपले ते भांडारच) सवलत वा अन्य मुद्दय़ांवरून नव्या व जुन्या ग्राहकांच्या बाबतीत भेदभाव केला जातो अशा तक्रारी ठिकठिकाणाहून प्राप्त झाल्याने भविष्यात कोणताही संभ्रम राहू नये म्हणून खालील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. त्याचे सर्वानी पालन करावे.
१) भांडाराच्या दर्शनी भागात ठेवलेल्या ‘भविष्य’ या ब्रँडच्या रत्नजडित खुच्र्या व सोफे केवळ नव्या ग्राहकांनाच विकले जातील. जुन्या ग्राहकांसाठी ‘वर्तमान’ ब्रँडच्या साध्या वेताच्या खुच्र्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
२) ‘वॉशिंग मशीन’वर नव्या ग्राहकांना ३० टक्के सवलत मिळेल. जुन्यांनी त्याच्या खरेदीचा मोह टाळावा. दोन्ही ग्राहकांना साबणाच्या वडय़ा व डिर्टजट पावडर मात्र मोफत दिली जाईल.
३) स्वदेशी बनावटीचे जाडेभरडे कापड जुन्यांना सवलतीच्या दरात मिळेल तर उच्च दर्जाची वस्त्रप्रावरणे केवळ नव्या ग्राहकांना मिळतील व ती आहे त्या किमतीत त्यांना घ्यावी लागतील.
४) अफगाणी, काश्मिरी व पर्शियन बनावटीचे लाल गालिचे (रेड कार्पेट) केवळ नव्यांसाठी आहे त्या किमतीत उपलब्ध असतील. जुन्यांना सवलतीच्या दरात फक्त सतरंज्या मिळतील.
५) प्रत्येक भांडारात ‘सेकंड हँड’ वस्तू विक्रीचे स्वतंत्र दालन आहे. त्यात केवळ जुन्यांनाच प्रवेश आहे.
६) पक्षाच्या सूचनेवरून खास तयार करून घेण्यात आलेले ‘परंपरा’ नावाचे मीठ जुन्यांना सवलतीच्या तर नव्यांना पाच टक्के अधिभार आकारून विकले जाईल याची दोन्ही ग्राहकांनी नोंद घ्यावी.
७) ‘त्याग’ नावाची चंदनाचा दरवळ असलेली अगरबत्ती जुन्यांना ५० टक्के सवलतीत तर नव्यांमध्ये त्याचे महत्त्व रुजावे म्हणून आहे त्या किमतीत विकली जाईल.
८) पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या प्रचाराची लेखी हमी दिली तरच कर्णे, ध्वनिक्षेपक आदींचा संच नव्यांना सवलतीच्या दरात मिळेल. जुन्यांसाठी हा संच विक्रीसाठी उपलब्ध नाही.
९) नव्यांना देशभरातील कुठल्याही भांडारातून खरेदीची मुभा असेल तर जुन्यांना ते जिथे राहतात तेथील भांडारातूनच खरेदी करता येईल.
१०) सध्या देशभर नवीन ग्राहकांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे खरेदी करताना नव्यांना प्राधान्य दिले जाईल. भांडारात आलेल्या जुन्यांनी या गर्दीत शिरू नये, वाद तर अजिबात घालू नये. नव्यांचे आटोपेपर्यंत भांडारातील सेवेकऱ्यांशी खंतवजा गप्पा मारल्या तरी कुणाचा आक्षेप असणार नाही.
११) भांडारात आलेल्या जुन्यांनी नव्यांकडे असूया अथवा रागाने बघू नये, तसे घडल्याचे सीसीटीव्हीतून निदर्शनास आल्यास त्याचे कार्ड रद्द करून खरेदीचा तसेच दुकानात प्रवेशाचा अधिकार काढून घेतला जाईल.
१२) नव्यांना खरेदी करताना भांडाराकडून दोन मदतनीस दिले जातील. जुन्यांना मात्र अशी कोणतीही सुविधा मिळणार नाही याची नोंद घ्यावी व यावरून भांडार व्यवस्थापकाशी वाद घालू नये.
(या सूचना प्रसिद्ध झाल्यावर जुन्यांमध्ये असंतोषाचा भडका उडाला. काय करता येईल यावर व्हॉट्सअॅप विद्यापीठात बरेच ‘मंथन’ झाले. ग्राहक मंचाकडे दाद मागण्यावरही विचार झाला; पण पक्षनिष्ठेचा मुद्दा समोर येताच ही चर्चा हळूहळू मंदावत गेली.)