रॅप केले तर पाप काय?
त्याचे काही माप काय?
जो दाखवेल धाडस
त्याची असते आर्ची
जो बसेल जेथे
त्याची असते खुर्ची
बसत असेल तेथे
जरी कुलगुरू
रॅपसाठी बनलो मी गुरू
आता ओरडता काय?
साध्या एका चिंधीचा
साप करता काय?
रॅप केले तर पाप काय?
त्याचे काही माप काय?
तरुण मी
तरुणाईची वापरली भाषा
हटणार नाही मागे
तुम्ही गुंडाळा गाशा
अभिव्यक्ती माझी मी
केली वादळी
भेंडी ठेवून बाजूला
ओरपली नळी
त्याचा मोठा करून घेऊ
जिवाला ताप काय?
रॅप केले तर पाप काय?
त्याचे काही माप काय?
राहिलो नाही साधा
मी सांगितले आधी
खुली आता माझ्यासाठी
दुनियेची गादी
आईसाठी उरी माझ्या
बांधले मी घर
कशाला येईल का
त्याची कधी सर?
बोलायचे काम नाही
लावू आता चाप काय?
रॅप केले तर पाप काय?
त्याचे काही माप काय?
किती सारे आंदोलन
किती गदारोळ?
संस्काराने केला सारा
जगण्याचा घोळ
असे वापरा शब्द
अणि असे असेच जगा
जपून टाका पाऊल
आणि असे असेच वागा
साला किती लावायचा
डोक्याला वात
साफ सांगतो निक्षून
मान्य नाही अजिबात
सारं सोडून बसून घरी
करू आता जाप काय?
रॅप केले तर पाप काय?
त्याचे काही माप काय?
मी माझ्या रक्ताने
आकाश भरून टाकले
संस्कृतीवर असे कोणते
आभाळ कोसळले
विचार नव्या पिढीचा
समजून घ्या जरा
नाहीच काही पटलं
तर मग विरोध करा
एवढय़ा तेवढय़ा गोष्टीने
होत नाही जगबुडी
म्हणूनच टिकून आहे
पिढी दर पिढी
आपण नाही समजलो
तर समजेल आपला बाप काय?
रॅप केले तर पाप काय?
त्याचे काही माप काय?
(पुण्यातील विद्यापीठात सुरू असलेल्या रॅपविरोधी आंदोलनाच्या आधी हे लिहिले गेले की नंतर, याचा तपास सध्या सुरू आहे.)