‘ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगिन्ध पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ स्व:’ बैठक सुरू झाल्याबरोबर साहेबांनी हे शब्द उच्चारताच सारे उभे राहिले. हा तर मृत्युंजयमंत्र हे एव्हाना साऱ्यांच्या ध्यानात आले होते. समृद्धीवरील अपघात कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी महामंडळाच्या कार्यालयात रोज होत असलेल्या बैठकांचा नूर या मंत्राने आज पालटून टाकला हे ध्यानात येताच आनंदित होत साहेब बोलू लागले. ‘शास्त्रीय उपाययोजनांची चर्चा बस झाली. आता जायचे ते या पौराणिक शास्त्राच्या मार्गाने. हा मंत्रच आपला मार्ग सुरक्षित करू शकतो हे बुलढाण्याच्या ‘समर्थ’कांनी दाखवून दिले. त्यामुळे आता अडीच हजार कोटीची निविदा वारंवार काढून हे करा, ते करा असे कंत्राटदाराला सांगण्याची गरज नाही. आता त्या ‘जप’कारांनाच मार्गावर ठिकठिकाणी यंत्र लावण्याचे व जप करण्याचे काम द्यायचे. श्रद्धेचा विषय असल्याने तेही कमी पैशात करतील.’ एवढे बोलून साहेब पाण्याचा घोट घेण्यासाठी थांबले तसा एक सहकारी उद्गारला. ‘पण त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय’ त्याच्याकडे रागाने बघत ते म्हणाले ‘लोकलाजेस्तव असे करावे लागते पण हाच मंत्र यावरचा रामबाण उपाय आहे हे सर्व श्रद्धावान सत्ताकारांचे मत आहे. त्यामुळे आता माघार नाहीच. या संपूर्ण मार्गावर ठरावीक अंतराने भोंगे लावायचे. त्यातून हा मंत्र २४ तास प्रवाशांना ऐकवण्याची सोय करायची. त्यामुळे चालकाची एकाग्रता थोडी भंग होईल. श्रद्धेने त्याचे मन भरून जाईल व अपघात होणार नाही. शिवाय प्रत्येक पाच किलोमीटरवर हा मंत्र ठळक अक्षरात लिहिलेले फलक लावायचे. ते चालक व प्रवाशाचे लक्ष वेधून घेतील. त्यातला मृत्यू हा शब्द प्रत्येकाने उच्चारला की तो आपसूकच भानावर येईल. यामुळे महामार्ग संमोहनाची समस्या सुटेल. याच मार्गावर ठिकठिकाणी हॉटेलऐवजी ‘प्रसादालये’ उभारायची. त्यात मिळणारा प्रसाद व अंगारा मोफत असेल.
अशा थांब्यामुळे चालकाला डुलकी लागण्याचे प्रमाण कमी होईल. असे थांबे विकसित करताना तिथे एखादे लहानसे मंदिरही तयार करून घ्यायचे. भारतीय प्रवासी दर्शन व प्रसादासाठी तिथे निश्चित थांबतील. कुणा प्रवाशाला जप करण्याची ऊर्मी आलीच तर मंदिरात बैठकव्यवस्थासुद्धा करू. हा प्रवास भक्तीमार्गावर नेणारा आहे अशी चर्चा पसरली की दारू पिऊन वाहन चालवण्याचे प्रमाणसुद्धा आपोआपच कमी होईल. तसेही आपल्याकडे देवाला घाबरणाऱ्यांचे प्रमाण जास्तच आहे. त्यामुळे या उपायांचा फायदाच होईल. प्रसाद घेणाऱ्याला त्याच्या वाहनात ठेवायला एक महामृत्युंजय यंत्र मोफत देऊ. यंत्र सोबत असल्यामुळे धोका नाही असा विश्वास त्याच्या मनात निर्माण झाला की तो अधिक जबाबदारीने वाहन चालवेल. यासाठी तातडीने निविदा काढा. हे काम जास्तीत जास्त ५०० कोटीत होईल. त्यामुळे महामंडळाचे दोन हजार कोटी वाचतील व ‘खाऊ’ अशी झालेली प्रतिमाही पुसली जाईल. चला लागा कामाला. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना मी ‘बघून’ घेईन.’ साहेब थांबताच बैठक संपली. सारे आपापल्या कक्षात परतल्यानंतर पाचच मिनिटांनी महामंडळाच्या नियंत्रण कक्षात फोन आला. ‘समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात झाला.’ हे कळल्यावरसुद्धा कुणीही कक्षाबाहेर पडून बैठकीच्या खोलीत फिरकले नाही.