गिरीश कुबेर

पणती, निरांजन वगैरेतला प्रकाश पुरत नाही. लक्कन प्रकाशणारा कॅमेऱ्याचा फ्लॅशच हवा. पण तो काही सलग चालू ठेवता येत नाही..

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
balmaifal article, story for kids, water literacy, Water importance, do not waste water lesson, story cum lesson for water, save water, kids and water, marathi article, loksatta article,
बालमैफल : जलसाक्षरता
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

हा महिना जागतिक पातळीवर बँक-बुडी मास म्हणून ओळखला जायला हरकत नाही. आर्थिक वर्षांचा हा शेवटचा महिना. मराठी कालनिर्णयातला फाल्गुन मास! आता बऱ्याच जणांना या फाल्गुनाशी काही घेणं-देणं असायची शक्यता नाही. पण या महिन्यातला होळी हा सण मात्र अशांनाही माहीत असतो. खरं तर या सणाला राष्ट्रीय सणाचा दर्जा द्यावा इतका तो लोकप्रिय. असो. तर या मराठी फाल्गुनमासात एकापाठोपाठ एक मोठमोठय़ा बँका बुडाल्या. त्यातल्या तीन एकटय़ा अमेरिकेतल्या. पाकिस्तानपाठोपाठ अमेरिकेत असं काही झालं की आपल्याकडे काहींना जरा विशेष आनंद होतो ‘आम्हाला लोकशाही शिकवता काय.. भोगा आपल्या कर्माची फळं’ अशी कोणी उघडपणे न बोललेली वाक्यं ऐकू येतात अशावेळी. यातल्या जवळपास प्रत्येकाला रुपयापेक्षा डॉलरमध्ये कमवायची संधी मिळाली तर पहिल्यांदा घेतील. पण अमेरिकेचं नाक कापलं गेलं आनंदी आनंद गडे गान. असो.

तर पहिल्यांदा सिल्व्हरगेट नावाची बँक गेली. पाठोपाठ सिलिकॉन व्हॅली. आणि शेवटी आचके दिले ती सिग्नेचर. नाव, व्यवसाय वगैरे अंगांनी सगळय़ा ‘स’कारात्मक ! पण नाही वाचल्या बिचाऱ्या. पाठोपाठ तिकडे युरोपातल्या स्वित्झर्लंडमधली ‘क्रेडिट स्विस’पण गेली. ठीक आहे. आता त्याची चर्चा करण्याचं कारण नाही. उपयोगही नाही. तरीही हा उल्लेख इथे केला कारण यातल्या तीन अमेरिकी बँका स्टार्टअप नावे ओळखल्या जाणाऱ्या नवउद्यमींना पतपुरवठा करण्यात आघाडीवर होत्या म्हणून. त्यातही सिलिकॉन बँक गेली आणि जगभरातल्या नवउद्यमींत एक शोककळा पसरली. त्याला कारणही तसंच आहे.

नवउद्यमींना त्यांच्या उद्योगासाठी कर्ज देताना बऱ्याचदा त्यांची उद्योगाची कल्पना हेच तारण असतं. त्यामुळे तशी जोखीम असते या नवउद्यमींना कर्ज देण्यात. बऱ्याचदा अनेक कल्पना कागदावर चांगल्या दिसतात. पण प्रत्यक्षात उतरवायला गेलं की त्या काही तितक्याशा चालत नाहीत. अशा प्रसंगी कर्ज बुडण्याचाच धोका अधिक. हा धोका ‘सिलिकॉन व्हॅली बँक’ आनंदानं पत्करायची. खरं तर सिलिकॉन व्हॅलीतल्या अनेक नवउद्यमींचा गुण बँकेला लागला की या आणि अशा बँकांमुळे सिलिकॉन व्हॅली परिसरात एकापेक्षा एक उत्तमोत्तम नवउद्यमी तयार होत गेले हा संशोधनाचा विषय. पण हे दोन्हीही एकमेकांना पूरक होते, हे निश्चित.

यातल्या यशस्वी नवउद्यमींसाठी एक विशेष शब्दप्रयोग केला जातो. युनिकॉर्न्‍स ! म्हणजे एक्कुलगे. कल्पनेतले एकिशगी, पंखवाले घोडे पण भूतलावरचे एक शिंग असलेले गेंडे. सदैव दुपारच्या झोपेतून उठवल्यासारखा भाव चेहऱ्यावर वागवणाऱ्या या प्राण्याला का यासाठी कामाला लावलं हे काही माहीत नाही. पण ते आहे खरं. तर हे एक्कुलगा विशेषण कोणासाठी वापरतात? ज्या नव्या कंपनीचं मूल्यांकन १०० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक आहे असे नवउद्यमी हे एक्कुलगे. एकदा का एखादा एक्कुलगा म्हणून जाहीर झाला की बाजारपेठेतल्या गुंतवणूकदारांची रीघ लागते त्याच्याकडे. मग चांगलं मूल्यांकन होतं त्याच्या कंपनीचं. पुढे आयपीओ. भांडवली बाजारात प्रवेश वगैरे वगैरे ओघानं आलं. तेव्हा सर्वाचा प्रयत्न असतो लवकरात लवकर आपल्या कंपनीला हे एक्कुलग्याचं शिंग फुटावं यासाठी.

आपले काही एक्कुलगे किती गाजले. मेक माय ट्रिप, ओला, फ्लिपकार्ट, इनमोबी.. अनेक घरांतली पोटं शनिवार-रविवार किमान एकदा वा अनेकदा ज्याच्यामुळे भरतात ते झोमॅटो वा स्विगी, उद्याच्या ज्ञानेश्वर वा आइनस्टाइन्सचा कारखाना घरोघरी वसवणारा बैजूज, मूळच्या चिनी पैशावर स्वदेशी व्यवहार आणि राष्ट्रवादाचे चलन चालवणारे पेटीएम वगैरे किती मान्यवर सांगावेत. एकापेक्षा एक यशस्वी. या नवनव्या भसाभसा  जन्माला येणाऱ्या एक्कुलग्यांचा आपल्या देशाला कोण अभिमान! वातावरण असं झालं की समग्र भरतभू जणू नवउद्यमींचं सूतिकागृहच बनली की काय, असं वाटावं! आता इतकं यश आपल्याला मिळतंय असं दिसत असल्यावर त्यामागे पंतप्रधानांचा वाटा नाही, असं कसं होईल. त्यांच्या असण्यामुळे तर आपला गाडा चाललाय हे आता सगळय़ांनाच माहितीये. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर या नवउद्यमींचं मोठं कौतुक केलं. सर्वार्थाने हे नवउद्यमी म्हणजे उद्याच्या भारताची आशा. या आशेतली अधिक मोठी आशा म्हणजे एक्कुलगे. युनिकॉर्न. नुसतं आमदार /खासदार होणं जसं पुरेसं नसतं तसंच नुसतं नवउद्यमी होणं पुरेसं नसतं. यातलं एक्कुलगा व्हायला हवं. भारतात हजारो नवउद्यमी आणि त्यातून शेकडो एक्कुलगे कसे अवघे गेल्या काही- अर्थातच २०१४ नंतरच्या-  वर्षांत तयार झाले हेही पंतप्रधानांनी अनेकदा सांगितलं. एकदा तर त्यांनी या नवउद्यमींतनं एक्कुलग्यांच्या विणीचा दरही सांगून टाकला. दर दहा दिवसाला एक या गतीनं आपल्याकडे युनिकॉर्न जन्माला आले असं पंतप्रधान म्हणाले. एका अर्थी हे आपल्या देशाच्या लोकसंख्या वाढीच्या दरासारखंच म्हणायचं. आता जणू आपण अमेरिका, स्टार्टअप नेशन म्हणून ओळखला जाणारा इस्रायल अशांनाही मागे टाकणार एक्कुलगा निर्मितीत, असं चित्र तयार झालं. कलाकार तगडा असेल तर चित्र चांगलंच रंगतं.

पण सिलिकॉन व्हॅली बुडाली आणि त्या चित्राचे रंग किती उडून गेलेत हे अचानक समोर आलं. आपल्या आवडत्या अभिनेत्रीला सकाळी सकाळी विनामेकप पाहिल्यावर कसा धक्का बसेल अनेकांना तसं या बँक बुडीमुळे झालं.

 म्हणजे असं की भारतात गेल्या तब्बल पाच महिन्यांत एकही एक्कुलगा जन्माला आलेला नाही, हे या बँक बुडीमुळे कळलं. आता काही लगेच या बँक बुडीला दोष देतील. पण ही बँक आत्ता बुडाली. परंतु आपल्याकडे गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून आजतागायत एकही एक्कुलगा प्रसवला गेलेला नाही. गतवर्षी २०२२ साली या भूमीवर फक्त २२ एक्कुलगे तयार झाले. त्याआधीच्या वर्षांत तर ही संख्या होती ४६. करोनाने रोखलेला उद्यमींचा प्रतिभा प्रवाह २०२१ साली जोमाने उसळला आणि एका वर्षांत ४६ एक्कुलगे आपल्याकडे दिसू लागले. पण नंतर मात्र हा वेग मंदावला. २०२२ साली आधीच्या वर्षांपेक्षा निम्म्याने कमी! आणि गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आजतागायत एकही नाही. या मार्च महिन्यात तर सिलिकॉन व्हॅली बुडाली. आता तर पाहायलाच नको. हा वेग आणखी कमी होणार. त्यामुळेही असेल बहुधा. पण आपले पंतप्रधान अलीकडे या विषयावर काही बोललेले नाहीत. दर दहा दिवसांत एक एक्कुलगा तयार करणाऱ्या या संभाव्य महासत्तेचा वेग अचानक कमी झाला. किती? तर दहा दिवसांला एक या पासून ते १५५ दिवसांत एकही नाही इतका कमी. इतकं कुटुंब नियोजन झालं नवउद्यमींच्या क्षेत्रात.

या काळात भारतीय अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी काय काय आपण बदलायला हवं याचीही चर्चा अनेकदा झाली. अनेकांनी सांगितलं, हे नवउद्यमी, त्यातले एक्कुलगे वगैरे सगळं ठीक. पण त्याच्या जोडीला पारंपरिक कारखानदारी, शेती वगैरे खऱ्या अर्थविकास मुद्दय़ांकडेही लक्ष द्यायला हवं. अगदी थोडय़ा काळात भव्य यश मिळवणाऱ्या नवउद्यमींतल्या एक्कुलग्यांचं कौतुक करावंच पंतप्रधानांनी. त्याची गरजही आहेच. आकर्षक, दिलखेचक छायाचित्र काढायचं तर पणती, निरांजन वगैरेतला प्रकाश पुरत नाही. डोळय़ासमोर अंधारी आणणारा, लक्कन प्रकाशणारा कॅमेऱ्याचा फ्लॅशच हवा. पण हा फ्लॅश काही सलग चालू ठेवता येत नाही. कायम प्रकाशासाठी स्थिर स्रोतच हवा.

म्हणून आता ही नवी संकल्पना आलीये. कॉक्रोच अ‍ॅप्रोच. युनिकॉर्न व्हर्सेस कॉक्रोच. एक्कुलग्यांपेक्षा झुरळंच बरी, असं आता या क्षेत्रात उघड म्हटलं जातंय. अणुबाँबच्या संहारातही झुरळं जिवंत राहिली (आणि तीही गाईच्या शेणाचं कवच नसताना..!), कीटकनाशक कितीही फवारा ती तात्पुरती मरतात. पण नवी पैदा होतात. उद्योग हे असे टिकाऊ हवेत, असं आता अर्थतज्ज्ञ म्हणतायत. आपल्याकडेही आता हा सूर लावला जाईलच.

फक्त एक्कुलग्यांप्रमाने दर दहा दिवसाला एक असं काही झुरळ जन्माचं कौतुकही होणार किंवा काय.. ते पाहायचं !

ता.क. आपल्या एकही एक्कुलग्याला अद्याप नफा कमावता आलेला नाही, ही बाबही लक्षात घ्यावी अशी.

girish.kuber@expressindia.com      

@girishkuber