मनुष्याचं समाजशील आणि विवेकी असणं हीच त्याच्या प्रगतिशीलतेची खूण, असं मानणारा व्होल्तेर ‘निसर्गावस्थे’ला दुर्भिक्षकाळ म्हणतो…
Paradise is where I am! – Voltaire
‘माझा लाडका पूर्वज अॅडम,
ईडन गार्डनमध्ये तू नक्की करत तरी काय होता? मूर्ख मानवजातीसाठी कष्ट उपसत होतास की लाडक्या ईव्हसोबत क्रीडा करत होतास? ईडन गार्डनमधील एकूणच तुम्हा दोघांच्या अवताराची कल्पना केली तर तुमची लांब, काळी, अस्वच्छ नखं, अस्ताव्यस्त केस, काळवंडलेली त्वचा असं काहीतरी असेल. हे वास्तव तुम्हा दोघांनासुद्धा मान्य करावं लागेल. निकोप, स्वच्छ जगणं नसेल तर प्रेम क्रीडा नसून फक्त लाज आणणारी गरज ठरत असतं. तसं अन्न, वस्त्र, निवारा अशा सगळ्या बाबतीत तुमचं जगणं प्राथमिकच होतं. हीच ती मनुष्याची निसर्गावस्था!
तर मित्रहो, आपले पूर्वज ‘निसर्गावस्थेत’होते. त्यामुळे ते निसर्गाजवळ होते. वास्तवात, आपले लाडके पूर्वज अज्ञानात जगत होते. ईडन गार्डनमधलं शुद्ध अज्ञान हा सद्गुण कसा काय असू शकतो! रेशमाचा तलमपणा आणि सोन्याची चमक त्यांना ठाऊक नव्हती. चांगली वाइन काय असते हे बिचाऱ्या ईव्हच्या गावीदेखील नव्हतं. तिथं सगळ्या गोष्टींचं दुर्भिक्ष असल्यानं ‘माझं’ , ‘तुझं’ काय असतं याविषयी ते अनभिज्ञ असणं साहजिक आहे. त्यामुळे ज्याला कुणाला अॅडमच्या बागेत किंवा हरवलेल्या सुवर्णयुगाच्या आठवणीत रमायचं असेल त्यानं खुशाल रमावं. पतित आणि शापित युग म्हणून धर्ममार्तंड्यांची वर्तमानकाळाविषयी कितीही ओरड असली तरी या निंदक काळाप्रति मी कृतज्ञ आहे. मी निसर्गाचा आभारी आहे की माझा जन्म या काळात झाला. स्वच्छ, सौंदर्यपूर्ण, कलासक्त, विलासी, वैभवशाली प्रगत जगणं मला प्रिय आहे. मानवी प्रयत्नांतून फुलून समृद्ध झालेला हा इहवादी स्वर्ग आणि त्यातील आनंद मला प्रिय आहे. खरंतर, ही प्रत्येक प्रामाणिक माणसाची भावना असते.
आपल्या आजच्या तथाकथित ‘शापित’युगात पॅरिस, लंडन किंवा रोममध्ये प्रामाणिक माणसाचं राहणीमान कसं असतं हे जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या घरात प्रवेश करा. तुमच्या नजरेस सुंदर कलाकुसरीच्या गोष्टी पडतील ज्या अनेक हातांच्या कष्टपूर्वक सहकार्यातून निर्माण झालेल्या आहेत. खरं तर, मानवी जीवनाला समृद्ध करण्याच्या प्रयत्नातूनच टोकाच्या ध्रुवावर जगणारी माणसं संपर्कात येऊन एकूणच जगणं वैभवशाली झालेलं आहे. गरजेपोटी माणसांचं, वस्तूंचं आणि विचारांचं एकत्र येणं (commerce) यातूनच मानवी प्रगती झाली आहे.’
उपरोक्त मजकूर व्होल्तेरनं १७३६ मध्ये लिहिलेल्या Le mondain या दीर्घ कवितेचं सार आहे. या विडंबनपर दीर्घ कवितेत ख्रिास्ती धर्मशास्त्रातलं ईडन गार्डन, ग्रीक मिथकांतलं सुवर्णयुग आणि चांगुलपणाचं मूर्तिमंत उदाहरण समजला जाणारा ‘निसर्गावस्थेतील माणूस’( le bonsauvage) या संकल्पनांविरुद्ध आधुनिकतेची बाजू १८व्या शतकात मांडली आहे. मनुष्याला इतर प्राण्यांपासून वेगळं करणारं व्यवच्छेदक लक्षण कोणतं? मुळात मनुष्याची निर्मिती इतर प्राण्यांच्या तुलनेत श्रेष्ठतम आहे की विशिष्ट टप्प्यावर मनुष्यानं इतर प्राणीसृष्टीपासून निर्णायक फारकत घेऊन स्वतंत्र वाटचाल सुरू केली? मनुष्य एकाच वेळी निसर्गावस्थेत आणि इतिहासात सापडणारी वस्तू आहे का? या मूलभूत प्रश्नांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे धार्मिक आणि धार्मिकेतर तत्त्वज्ञानांना अपरिहार्यपणे भिडावं लागतं. प्रबोधनपर्वात या फिलॉसफिकल अॅन्थ्रपॉलॉजीच्या प्रश्नांभोवती अनेकविध सिद्धान्त सूत्रबद्ध करण्यात आले. हा समृद्ध सैद्धान्तिक ऊहापोह सर्वसामान्य वाचकांपर्यंत नेऊन सार्वजनिक चर्चा घडवून आणण्यासाठी व्होल्तेर लोकप्रिय शैलीत साहित्य निर्मिती करतो.
प्रस्तुत लेखात Le mondain आणि Candide या साहित्यकृतीच्या मदतीनं फिलॉसफिकल अॅन्थ्रपॉलॉजीतल्या प्रश्नांचा परामर्श घेतला जाईल.
अभिजात जग आणि सर्वसामान्यांचं जग यांत १८ व्या शतकात मोठी दरी होती. साहजिकच हा सामाजिक भेद अभिरुचीच्या ( le goû t) क्षेत्रात प्रतिबिंबित होत असे. पण त्यादरम्यान, सर्वसामान्य जगाच्या पोटातून तिसरं बूर्ज्वा अर्थात मध्यमवर्गीय जग जन्माला येऊन वेगानं विस्तार पावत होतं. साक्षरतेचं प्रमाण वाढून प्रगल्भ सार्वजनिक अवकाशात विविध विचारचौकटींचा टकराव होऊन सार्वजनिक मत तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. सार्वजनिक अवकाशाच्या गतिशास्त्राविषयी अंतर्दृष्टी असलेल्या व्होल्तेरला कल्पना होती की, सार्वजनिक मत कितीही क्षणभंगुर असलं तरी त्याच्या क्षणिकतेतसुद्धा जगाला कलाटणी देण्याची शक्ती असते. त्यामुळे व्होल्तेरचं शिक्षण आणि एकूणच ऊठबस अभिजात वर्तुळात असली तरी तो सार्वजनिक अवकाशाचं महत्त्व ओळखून होता. त्याच्या साहित्यात स्पष्टपणे अभिजात आणि लोकप्रिय अशा दोन शैली आढळतात. त्यानं Oedipus, Zaire सारखी नाटकं आणि Henriade सारखं महाकाव्य अभिजात शैलीत; तर Micromegas, Zadig, Candide सारख्या विडंबनपर तत्त्वज्ञानात्मक कथा हलक्याफुलक्या, रोचक शैलीत लिहिल्या. कालौघात त्याचं अभिजात साहित्य विस्मृतीत लोटलं गेलं. पण त्याच्या लोकप्रिय तत्त्वज्ञानात्मक कथा आणि कविता अभिजात साहित्य म्हणून मान्यता पावल्या. त्यांची शैली लोकप्रिय असली तरी आशय मात्र अभिजात आहे.
वयाच्या ४२ व्या वर्षी व्होल्तेरनं पाश्चात्त्य नागरी सभ्यतेनं साधलेल्या बौद्धिक आणि भौतिक प्रगतीचा गौरव करणारी Le mondain ही कविता लिहिली आहे. ‘प्राचिनांच्या आणि आधुनिकांच्या ऐतिहासिक भांडणा’त आक्रमकपणेआधुनिकतेची बाजू घेणारी ही कविता स्फोटक आणि डिवचणारी आहे. या कवितेत व्होल्तेरनं जाणीवपूर्वक धर्मशास्त्र, मिथकशास्त्र आणि प्राचिनांच्या साहित्यातल्या ‘आदर्श जगा’च्या संकल्पनांची सरमिसळ केलीय. एकूणच भूतकाळाचं श्रेष्ठत्व / प्रामाण्य नाकारून वर्तमानाला सत-तत्त्व आणि प्रामाण्य बहाल केलंय.
नंतर वयाच्या ६५ व्या वर्षी व्होल्तेर Candide or Optimism ही तत्त्वज्ञानात्मक कथा लिहून मानवी प्रकृतीच्या स्वरूपाची सविस्तर चर्चा घडवून आणतो. मनुष्याला आशावादी राहण्यासाठी काही ठोस आधार आहे का, या महत्त्वाच्या प्रश्नाभोवती ही कथा रचली आहे. Candide मध्ये मानवी प्रकृतीविषयक ख्रिास्ती संकल्पनांसह पास्काल, लाइबनिच, हॉब्स, रुसो, जॉन लॉक इत्यादी तत्त्वज्ञांच्या संकल्पना अभिव्यक्त करण्यात आल्या आहेत. व्होल्तेर त्याच्या अनुभववादी, विवेकवाद आणि प्रगतीवादाचा वापर संदर्भबिंदू म्हणून करून विरोधी सिद्धान्ताचं व्यंगात्मक चित्रण करतो.
ख्रिास्ती धारणेनुसार अॅडम अज्ञानी होता तोपर्यंत ईडन गार्डनमध्ये आनंदाने नांदत होता. पण जिज्ञासा जागृत होऊन त्याने ज्ञानाचं आणि स्वातंत्र्याचं फळ चाखलं म्हणून त्याचं पतन झालं. त्यामुळे, लोकयात्रा म्हणजे आद्या पित्याच्या पापाच्या शिक्षेचं प्रायश्चित्त करणं. खरंतर, ख्रिास्ती विचारविश्वात मानवी प्रकृतीची संकल्पना एकजिनसी नाही. प्रोटेस्टंटांची मानवी प्रकृतीविषयक संकल्पना ऐहिक जीवनाचं पूर्णत: अवमूल्यन करणारी नसून किमान आशावादाची शक्यता प्रदान करते. कॅथोलिक चर्चच्या आतही १७ व्या शतकात जेजुइट आणि जॉन्सेनिस्ट या दोन प्रवाहांत अनेक मूलभूत मतभेद होते. पास्कालसारख्या जॉन्सेनिस्टची मानवी प्रकृतीविषयक संकल्पना अतिशय निराशावादी आहे. ‘मनुष्य मुळातच अतिशय दुर्बल असल्यानं मनुष्याचं पापी जीवन आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यानं केलेले प्रयत्न यात तुलनाच होऊ शकत नाही. मनुष्याचे प्रयत्न नेहमी तोकडे ठरतील. त्यामुळे मुक्तीसाठी मनुष्याला ईश्वरी कृपाप्रसादावरच (Grace) अवलंबून राहावं लागणार’ . जेजुइटांच्या संकल्पनेत लवचीकता असल्याने मुक्तीच्या बाबतीत ईश्वरी प्रसादासह मानवी प्रयत्नांना महत्त्व दिलं आहे.
खरंतर, Candide मध्ये व्होल्तेर प्रामुख्यानं लाइबनिच आणि रुसोला लक्ष्य करतो. लाइबनिचचा उल्लेख ‘ईश्वराचा वकील’असाही केला जातो. कारण ‘ईश्वरानं असंख्य सदोष जगांच्या शक्यतांना बाजूला सारून दोषरहित सर्वोच्च जगाची निवड केली’ – अशी त्याची मांडणी. ईश्वर चूक करत नसल्यानं हे जग चुकीचं असूच शकत नाही. त्यामुळे लोक जगाला नाव ठेवत असतील तर चूक जगाची नसून चूक त्यांच्या दृष्टीतच आहे… जगातल्या प्रत्येक मनुष्य आणि वस्तूचं किमान प्रयोजन आणि पूर्वनिर्धारित स्थान आहे. ते ओळखून जगायला सुरुवात केल्यास ईश्वरी न्याय ( Theodicy) ज्ञात होऊन जीवन आनंदी होईल- असं लाइबनिचचं म्हणणं .
व्होल्तेरच्या दृष्टीनं लाइबनिच ईश्वराचा वकील नसून प्रस्थापित व्यवस्थेचा तत्त्वज्ञ आहे. कारण लाइबनिचच्या दृष्टीनं, जग बदलण्याचा प्रयत्न म्हणजे ईश्वरी न्यायाच्या विरोधात जाणं.
तरुण वयात व्होल्तेरच्या विचारांनी प्रभावित झालेल्या, पण नंतर व्होल्तेरशी मरेपर्यंत हाडवैर बाळगणाऱ्या रुसोच्या मानवी प्रकृतीविषयक संकल्पनेलाही व्होल्तेर Candide मध्ये उतरवतो. रुसोच्या मांडणीत निसर्गावस्थेतला आदिम माणूस म्हणजे साक्षात चांगुलपणा ( Bonsauvage). मनुष्याचं निसर्गावस्थेतून बाहेर पडून इतिहास प्रवेश करणं म्हणजे स्वत:चं पतन ओढवून घेणं ; म्हणून मनुष्यानं निसर्गाकडे परत माघारी वळून आपलं नितळ आणि पारदर्शक चरित्र मिळवावं. थोडक्यात, रुसोच्या दृष्टीनं मानवी इतिहास उन्नतीचा नसून मानवी प्रकृतीच्या अवनतीचा आहे. कारण ‘माणूस भ्रष्ट आणि विकृत होत गेला’. परिणामी, १८व्या शतकाल्या पॅरिस, लंडनसारख्या नागरी सभ्यतेतला माणूस म्हणजे मानवी भ्रष्टाचाराचा आणि विकृतीचा पुरावा आहे.
Le mondain आणि Candide या दोन साहित्यकृतींचा तौलनिक परामर्श घेतल्यावर लक्षात येतं की त्याच्या तरुणपणाच्या निखळ आशावादाची जागा निराशावादी छटांचा यथार्थवादी आशावाद घेतो. पण दुसऱ्या बाजूला, Passé iste मानसिकतेच्या लोकांमध्ये भूतकाळाविषयी कितीही भावनिक उमाळे फुटत असतील तरी व्होल्तेर भूतकाळाला ‘दुर्भिक्षाचा काळ’ मानतो. तो ‘गोल्डन एज सिन्ड्रोम’चं विडंबन करून मानवी सभ्यतेनं साधलेल्या प्रगतीवर विश्वास व्यक्त करतो. अर्थात, व्होल्तेरचा अनुभववादी, विवेकवाद मनुष्याच्या स्थितिशील, सारतत्त्ववादी संकल्पनेला वावच देत नाही. मनुष्य मुळात असा आहे किंवा तसा आहे, सारखी मूलतत्त्ववादी विधानं त्यामुळे बाद ठरतात. व्होल्तेरच्या मांडणीत मनुष्याचं समाजशील आणि विवेकी असणं त्याच्या प्रगतिशीलतेची खूण आहे. त्यामुळे निरंतर अर्थपूर्ण आणि कृतिशील राहून ऐहिक बागेची मशागत करण्यातच मानवी आनंद आहे, असं तो कथेच्या शेवटी नमूद करतो.
