सत्यजित राय यांचा ‘फेलूदा’, शरदेन्दु बंदोपाध्याय यांचा ‘व्योमकेश बक्षी’, सुनील गंगोपाध्याय यांचा ‘काकाबाबू’.. अशा थोर बंगाली प्रतिभावंतांनी रहस्यकथामाला लिहून एकेका ‘डिटेक्टिव्ह’चे पात्र जगात आणले. अशा अजरामर बंगाली गुप्तचरांमध्ये समरेश मजुमदार यांचा ‘अर्जुन’देखील आहे. साहित्य अकादमी पुरस्कार (१९८४) मिळवणारी ‘कालबेला’ ही मजुमदारांची कादंबरी रहस्यमय नव्हती, ती ‘उत्तराधिकार’, ‘कालपुरुष’ व ‘मूषलकाल’ या सामाजिक कादंबऱ्यांच्या चतुष्टय़ाचा दुसरा भाग होती. त्यांच्या रहस्यकथा आणि अन्य कथा वा कादंबऱ्या, निवडक कथांचे संग्रह, आवृत्त्या मिळून एकंदर ३१२ पुस्तके प्रकाशित झाली! बंगालीतले हे अत्यंत लोकप्रिय, तरीही ‘साहित्य अकादमी’ची मोहोर उमटलेले लेखक वयाच्या ७९ व्या वर्षी आठ मे रोजी निवर्तले.
एवढी पुस्तके, इतकी लोकप्रियता यांमागचे त्यांच्या साहित्यातच सहज शोधता येणारे कारण म्हणजे, त्यांनी एकमेकांसमोर उभी केलेली सशक्त पात्रे आणि या पात्रांचा कस लावणारे प्रसंग! रहस्यकथांमधला अर्जुन वयाने सतरा-अठरा वर्षांचा. बुद्धी हेच एकमेव शस्त्र वापरणारा आणि समाज पोखरणाऱ्या काळ्या धंद्यांचा थांग लावणारा. या ‘टीनएजर’ची समाजाकडे पाहण्याची असोशी आणि ‘पण का घडते असे?’ हे कुतूहल खुद्द समरेशदांनी आयुष्यभर जपले. त्यामुळेच नक्षलवादी आणि मध्यमवर्ग यांच्या संबंधांतले ताणेबाणे त्यांनी ‘कालबेला’तून उलगडले. या कादंबरीत अनिमेश खात्यापित्या घरातला, पण नक्षलवादाकडे वळला आहे, त्याला समजून घेऊनही माधवीलता स्वत:चे निराळे अस्तित्व जपते आहे. त्याआधीच्या ‘उत्तराधिकार’मध्ये जमीनदारीच्या काळातले आजोबा आणि नव्या विचारांचा नातू आहे. ‘बुनो हंश’ या कादंबरीत १९७० च्या दशकात मोठीच समस्या बनलेल्या ‘स्मगिलग’च्या धंद्याकडे साधेसुधे तरुणही कसे ओढले गेले याचे चित्रण आहे, तर ‘सताकहोन’मध्ये एकमेकींशी जुळलेल्या सात कथा आहेत.
दार्जीलिंग-पायथ्याशी जलपैगुडी येथे १९४२ साली जन्मलेल्या आणि तिथेच शालेय शिक्षण घेतलेल्या समरेश यांनी कोलकात्याच्या ’स्कॉटिश चर्च कॉलेज’मधून इंग्रजी साहित्यात बीए केले. महाविद्यालयीन काळात तेथील राजकीय-सामाजिक जीवनातली चक्रीवादळे त्यांनी जवळून पाहिलीच, पण जलपैगुडीच्या परिसरातलाही बदललेला काळ उघडय़ा डोळय़ांनी निरखला. त्याच सुमारास चारू मजुमदार यांची चळवळ का वाढली आणि सरकारी दमनापुढे या चळवळीला कशी नांगी टाकावी लागली हेही पाहाताना, हा काळ जगणारी पात्रेच आपल्या शब्दांचे आणि ‘म्हणण्या’चे वाहक होऊ शकतात, हे समरेश मजुमदारांच्या लक्षात आले. १९६७ मध्ये पहिल्या कथेला प्रसिद्धी तर ‘दौड’ ही पहिली कादंबरी १९७६ मध्ये, लगेच १९७९ सालात या ‘दौड’ वर चित्रपट अशी त्यांची लेखनयात्रा सुरू झाली. त्यांच्या एकंदर आठ कथा/ कादंबऱ्यांवर बंगालीत चित्रपट निघाले, त्यांपैकी तीन चित्रपटांचे पटकथा लेखनही त्यांनी केले होते. पुढे काही कथांची चित्रवाणी रूपांतरेही झाली. पण अलीकडेच, ‘चित्रपटासारखे दृश्यमाध्यम आधी ललितसाहित्यावर अवलंबून होते, तसे आता नाही’ ही शहाणीवही त्यांनी मुखर केली होती.