सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिखाऊ राजकारण कधीही केले नाही. आपल्या कृतीविषयी कमालीची निष्ठा आणि तितकाच सत्याचा आग्रह धरण्याची धडाडी त्यांच्याकडे होती. मात्र काँग्रेस वा भाजप या दोघांनाही  इतिहासाच्या वास्तवात रस नाही, असे आज दिसते. नाकर्ती पिढी ज्याप्रमाणे वाडवडिलांच्या नावे मिशीला तूप लावून हिंडते तसे या दोन्ही पक्षांचे झाले आहे..
स्वत:ची पुण्याई नसेल तर व्यक्ती वा संस्था यांना इतिहासात आधार शोधावा लागतो. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने सध्या मोदी यांनी जो धुरळा उडवून दिला आहे, त्यातून हेच दिसते. या साऱ्या प्रकरणात मोदी जेवढे दोषी ठरतात तेवढय़ाच वा कदाचित कांकणभर अधिक, दोषाचे माप काँग्रेसच्या पदरातदेखील घालावयास हवे.
या सगळ्या राग सरदारी नाटय़ास सुरुवात झाली ती पटेल यांच्या भव्य स्मारकाच्या निमित्ताने मोदी यांनी हिंदी नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीपासून. मुळात हे असले कोणाचे स्मारक उभारणे.. मग ते सरदारांचे असो, शिवाजी महाराजांचे वा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे.. विद्यमान नेतृत्वाची दिवाळखोरी दर्शवते. ही असली स्मारके उभारली की कावळे-चिमण्यांना विधीसाठी नवी जागा मिळते यापलीकडे काहीही साध्य होत नाही, हा इतिहास आहे. एरवी ऊठसूट इतिहासाचा आधार घेणाऱ्यांनी या ताज्या इतिहासाकडूनही काही शिकायला हवे. तसे ते शिकायची कोणाचीच इच्छा नसल्यामुळे सर्वच स्मारकीय राजकारणाच्या प्रेमात पडलेले दिसतात. यात विकासाच्या राजकारणाचा दावा करणारे मोदी हेही अपवाद नाहीत. तेव्हा या स्मारकाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी सरदार पटेल आणि पंडित नेहरू यांच्यातील संघर्षांचे वर्णन करताना अतिरेक केला आणि पं. नेहरू हे सरदारांच्या अंत्ययात्रेसदेखील गेले नाहीत, असे ठोकून दिले. वास्तव तसे नाही. ते लगेचच स्पष्ट झाले. मोदी हे स्वत:ला तंत्रज्ञान- विज्ञानप्रेमी म्हणवतात. तेव्हा असे असताना हे असले विधान ठोकून देण्याआधी त्यांच्या तंत्रज्ञान सल्लागारांनी साधे गुगल करायचा सल्ला जरी मोदी यांना दिला असता तरी इतकी लाजिरवाणी अवस्था आली नसती. मोदी यांच्याकडे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचा ताफा आहे, असे म्हणतात. तरीही त्यांनी इतकेदेखील केले नाही आणि मोदी तोंडघशी पडले. नंतर पुन्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत मोदी यांनी हा राग सरदारी आळवला. त्याची काहीच गरज नव्हती. या सगळ्यामुळे जी काही आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवली जात आहे, ती पाहता या सर्वच नेत्यांच्या बौद्धिक वयाविषयी शंका घेता येऊ शकेल. तेव्हा या सगळ्याचा मुळापासून समाचार घ्यावयास हवा.
मोदी हे देशास काँग्रेसमुक्त होण्याची गरज व्यक्त करतात. त्यांनी केलेला तो पण आहे. परंतु त्यातील विरोधाभास हा की देशास काँग्रेसपासून मुक्त करण्यासाठी त्यांना गरज लागली आहे ती एका काँग्रेस नेत्याचीच याकडे कसे दुर्लक्ष करणार? देशाला काँग्रेसमुक्त करण्यासाठी काँग्रेसनेत्याचाच आधार शोधून, तेच पहिले पंतप्रधान व्हावयास हवे होते असे मोदी यांनी म्हटले आहे. तेव्हा आपल्या परिवारातील एकही नेता राष्ट्रीय पातळीवर मिरवण्याजोगा नाही, असे मोदी यांना वाटते असा अर्थ होऊ शकेल.  सरदार वल्लभभाई पटेल हे हिंदू होते आणि त्यासाठी त्यांना गर्व से कहो.. असे काही म्हणावयाची गरज वाटली नव्हती. त्याच वेळी हेही तितकेच खरे की सरदारांनी आपले हिंदूपण लपवण्याचाही प्रयत्न कधी केला नाही. पण हिंदू आहेत म्हणून हिंदुमहासभा आदी पक्ष, संघटनांना पाठीशी घालावे असे पटेल यांना कधीही वाटले नाही. त्याच वेळी हिंदू आहोत म्हणून मुसलमानांचा द्वेष करावा असे त्यांचे राजकारण नव्हते. फाळणीच्या जखमा ताज्या असताना, मुसलमानांच्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी सरदार पटेल यांना दिल्लीतील निजामुद्दीन दग्र्यात जाण्यात कमीपणा वाटला नाही, ही बाबही मोदी यांना इतिहास शिकवणाऱ्यांनी सांगण्याची गरज आहे. एखाद्या समारंभात इस्लामी ढंगाची टोपी घातली म्हणून आपला धर्म बाटेल अशी भीती वाटणाऱ्यांपैकी सरदार कधीच नव्हते. त्याच वेळी गुजरात दंग्यांनंतर पोळलेल्या मुसलमानांसाठी आपण काय केले याचाही विचार मोदी यांनी करून पाहण्यास हरकत नसावी. सरदारांनी असले दिखाऊ राजकारण कधी केले नाही. १८ जुलै १९४८च्या श्यामा प्रसाद मुखर्जी यांना लिहिलेल्या पत्रात सरदार पटेल यांनी या संदर्भात हिंदू संघटनांचे दोष निदर्शनास आणून दिले होते आणि त्यानंतर दोन महिन्यांनी सरसंघचालकांनाही त्यांनी पत्र लिहून खडसावले होते. रा. स्व. संघ नेत्यांच्या भाषणात विखार कसा ओतप्रोत भरलेला आहे हे नमूद करताना पटेल यांनी काही स्वयंसेवकांनी गांधीहत्या साजरी केली असावी, असा संशयदेखील व्यक्त केला होता. याच संदर्भात त्यांनी पुढे संघावर बंदी घातली. ही झाली या प्रश्नाची एक बाजू. ती समोर आल्याने मोदी यांचा पोकळ अभिमान उघड होतो. दुसरी बाजू काँग्रेसजनांचा दांभिकपणा उघड करणारी आहे.
केवळ पं. नेहरू यांना वाटते म्हणून संघावरील बंदी पटेल यांनी कायम ठेवली असे झालेले नाही. आपण जे काही करीत आहोत त्याविषयी कमालीची निष्ठा आणि तितकाच कमालीचा सत्याचा आग्रह धरण्याची धडाडी सरदारांकडे होती. म्हणूनच पं. नेहरू यांना १९४० साली लिहिलेल्या पत्रात पटेल यांनी अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनास विरोध दर्शवला होता, हे काँग्रेसजन सोयीस्करपणे विसरतात. आपला देश निधर्मी आहे आणि पाकिस्तानप्रमाणे तो चालवता येणार नाही. या देशातील प्रत्येक मुसलमानास तो प्रथम भारतीय आहे, याचा विसर पडता नये, इतक्या स्पष्ट शब्दांत सरदारांनी आपले मत पं. नेहरू यांच्यासमोर मांडले होते, याचीही नोंद घ्यावयास हवी. विद्यमान व्यवस्थेत समस्या ही आहे की, प्रत्येक मुसलमान हा पाकिस्तानवादी आहे असे एका गटास वाटते तर दुसऱ्या गटास आपणच मुस्लिमांचे तारणहार आहोत, असे दाखवावयाचे असते. सरदारांचा या दोन्ही प्रकारच्या राजकारणास विरोध होता या वास्तवाकडे काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही सोयीस्करपणे डोळेझाक करावयाची आहे. या पाश्र्वभूमीवर सरदारांना आपल्या परिवारात ओढण्याचा प्रयत्न भाजपला का करावासा वाटतो आणि काही प्रमाणात त्यास पाठिंबाही का मिळतो?
कारण काँग्रेसच्या क्षुद्र राजकारणात दडलेले आहे. देशात जे जे काही थोर झाले ते फक्त   पं. नेहरू आणि परिवारानेच केले अशी मांडणी काँग्रेसजनांची राहिलेली आहे. काँग्रेसची ही लबाडी उबग आणणारी आहे, यात शंका नाही. एक साधे उदाहरण यासाठी पुरेसे ठरावे. स्वातंत्र्यानंतर बहुतांश काळ देशात काँग्रेसचे राज्य राहिलेले आहे आणि या काळात अनेक योजना या सरकारांनी सुरू केल्या. यातील बहुसंख्य योजनांना नावे आहेत ती पं. नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आदींची. काँग्रेसने महिलांसाठी अनेक योजना आणल्या. यातील किती योजनांना सरोजिनी नायडू वा अ‍ॅनी बेझंट वा अरुणा असफ अली आदींची नावे देण्यात आली? गांधी- नेहरू परिवार म्हणजेच देश आणि त्यांचे कर्तृत्व म्हणजेच इतिहास अशी काँग्रेसची मांडणी राहिलेली आहे.
या सगळ्यातील वास्तव हे की काँग्रेस वा भाजप या दोघांनाही इतिहासाच्या वास्तवात रस नाही. नाकर्ती पिढी ज्याप्रमाणे वाडवडिलांच्या नावे मिशीला तूप लावून हिंडते तसे या दोन्ही पक्षांचे झाले आहे. समर्थ रामदासांनी ‘सांगे वडिलांची कीर्ती, तो येक मूर्ख’ असे म्हणून ठेवले आहे ते यांना लागू पडावे.