काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमधील बंगळुरू महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयाने काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. देशात काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांपैकी कर्नाटक हे मोठे राज्य, पण या राज्याच्या राजधानी शहरात काँग्रेसला शिरकाव करता आला नाही. राजस्थान आणि मध्य प्रदेशामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपाठोपाठ बंगळुरूमधील पराभव हा काँग्रेससाठी चिंतेची बाब आहे. ‘व्यापम’ घोटाळ्यावरून मध्य प्रदेश तसेच ललित मोदी प्रकरणावरून राजस्थान या भाजपची सत्ता असलेल्या दोन राज्यांमध्ये भाजपच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. या दोन मुद्दय़ांवरून काँग्रेसने संसदेच्या पावसाळी अधिवेशन गोंधळ घालून कामकाज बंद पाडले होते. व्यापम आणि ललित मोदी प्रकरणे म्हणजे भाजप सरकारच्या काळातील मोठे घोटाळे, असे चित्र काँग्रेसने निर्माण केले होते. पण राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांमधील पालिका निवडणुकांमध्ये मतदारांनी भाजपलाच साथ दिली. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांच्या खासदारपुत्राच्या मतदारसंघांमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीच्या नेतृत्वाला आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या वसुंधरा राजे यांच्या बालेकिल्ल्यातच काँग्रेसने मुसंडी मारल्याने भाजपचे दिल्लीतील धुरिण नक्कीच खूश असणार. काँग्रेसने या दोन्ही राज्यांमध्ये घोटाळ्यांचे मोठे चित्र उभे केले, पण मतदारांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. बंगळुरू महापालिकेत (बृहत् बंगळुरू महानगरपालिके) भाजपचीच सत्ता होती. मुंबईप्रमाणेच बंगळुरूमध्ये नागरी प्रश्न सुटलेले नाहीत. तरीही मतदारांनी भाजपवरच विश्वास व्यक्त केला. राष्ट्रीय आणि स्थानिक प्रश्नांची गल्लत करता येत नसली तरी दिल्लीपासून गल्लीपर्यंत मतदार अजूनही काँग्रेसला स्वीकारायला तयार नाहीत हे या निकालांवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी  झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवातून काँग्रेस अद्यापही सावरलेली नाही. महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड, जम्मू आणि काश्मीर, दिल्ली या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पराभवांची मालिका कायम राहिली. मध्यंतरी दोन महिन्यांच्या सुटीत आत्मचिंतन करून परतलेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना जरा सूर गवसू लागला. आपली  जुनी प्रतिमा बदलून गांधी आक्रमक होऊ लागले. संसदेतील चर्चेत सहभागी होऊ लागले. पण त्यांचे नेतृत्व अद्यापही जनता स्वीकारण्यास तयार नाही हेच निकालांवरून बघायला मिळते. वास्तविक मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसकडे भरपूर मालमसाला होता. पण मतदारांना अजूनही काँग्रेसबद्दल विश्वास वाटत नाही. पराभवातून काँग्रेसचे नेते अजून काही शिकलेले नाहीत. राज्यात भाजपच्या मंत्र्यांवर आरोप झाले, पण पावसाळी अधिवेशनात सभागृहात काँग्रेसने हे प्रकरण उपस्थित केले ते शेवटच्या दिवशी. राजकारणात जनतेची  नाडी ओळखणे महत्त्वाचे असते व नेमके त्यातच राहुल गांधी यांचे सल्लागार कमी पडतात. सत्ता गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले नैराश्य दूर करण्यात नेतृत्वाला यश मिळालेले नाही.राज्यात तर पक्षाला पालिका निवडणुकीत उमेदवार सापडले नव्हते. काँग्रेससाठी एकूणच दिवस वैऱ्याचे आहेत व ते लगेचच दूर होण्याचीही शक्यता दिसत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress lost bengaluru municipal corporation polls
First published on: 26-08-2015 at 04:57 IST